शास्त्रकार
मायेची व्याख्या करतात – अघटितघटना पटीयसी माया | जे अशक्य आहे, ते शक्य करण्याची शक्ति मायेमध्ये
आहे. जसे जादुगार जादूचे प्रयोग करीत
असताना प्रेक्षकांना जे नाही ते काढून दाखवितो व जे खरोखरच आहे, ते डोळ्यांना दिसत
नाही. तशीच मायेची अलौकिक शक्ति आहे. मायाच विश्वनिर्मिती करते. मायाच सर्व जीवांची निर्मिती करून जीवांना
जन्मानुजन्मे आपल्या चक्रामध्ये बद्ध करते.
पुराणामध्ये
खूप सुंदर गोष्ट आहे. नारदमहर्षि एकदा
भगवंतांना मायेविषयी प्रश्न विचारतात. “माया ही अलौकिक, अनाकलनीय, दुस्तर आहे. मोठमोठे ज्ञानी लोकही मायामोहीत होतात. मी तर आपला अनन्य भक्त आहे. त्यामुळे मला माया कधी दिसलीच नाही. पण मला
मायेचे स्वरूप समजावून घेण्याची इच्छा आहे.” यावर भगवान गूढ हसतात.
एकदा
नारदमहर्षि एका नदीमधून पाणी आणण्यास जातात. पाण्याचा स्पर्श होताक्षणीच त्यांना एकदम सुंदर
स्त्रीरूप प्राप्त होते. तिथे समोर एक
सुरूप राजा त्या स्त्रीरूप नारदांना दिसतो. दोघांचा विवाह होतो. संसार प्रारंभ होतो. सर्वसामान्य संसारी माणसाप्रमाणेच त्यांना मुले
होतात. संसार वाढतो. स्त्रीरूपामधील नारदमहर्षि सर्व गृहोचित कर्मे
करण्यात गढून जातात. पती-मुले-आप्त-भोग-नातू
या सर्वांच्यामध्ये आसक्त होऊन रममाण होतात. यामध्ये किती वर्षांचा काळ लोटला, हेही समजत
नाही. एकदा अचानक त्या राजाच्या राज्यावर
शत्रू आक्रमण करतात. राजाचा पराभव होतो. राजाची सर्व मुले युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त
होतात. त्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी
स्त्रीरूपातील नारदमुनि त्याच नदीच्या काठी येतात. पाण्याचा स्पर्श होतो. तत्क्षणी नारदांना पुन्हा पूर्ववत् पुरुषाचे,
नारदमुनींचे रूप प्राप्त होते. इथेच कथा
संपते.
हा
सर्व प्रकार पाहून नारदांना आश्चर्य वाटते. समोर भगवान उभे असतात. नारदमहर्षि प्रश्न विचारतात – प्रभो ! हे सर्व काय आहे ? भगवान हसून उत्तर देतात, “नारदा ! ही सर्व माया आहे. हा सर्व मायेचा प्रभाव आहे.” नारदांना समजायचे ते समजते. म्हणुनच आचार्य आदेश देतात – ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा | हे मूढबुद्धि मनुष्या ! हे सर्व मायाजन्य, मायाकार्य, अनित्य आहे,
असे जाणून तू ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश कर. बाह्य, मायिक विषयांच्या आसक्तीमधून तू पूर्णतः
निवृत्त हो, याचे कारण मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे.
- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
एप्रिल २०१५
- Reference: "BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015
- Reference: "BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment