Tuesday, December 1, 2020

मायेचे पाच प्रतिबंध | Five Roadblocks to Realization

 


परब्रह्मस्वरूपावर त्रिगुणात्मक मायेचे आवरण आलेले आहे.  अशा या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे, कारण ही माया अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण करते.  

 

१) विषय हाच पहिला प्रतिबंध आहे.  मनुष्य सुखासाठी पूर्णतः विषयांच्यावरच अवलंबून राहातो.  विषयांच्यामध्येच आसक्त होऊन तो विषयांचा गुलाम होतो.  विषय त्याला बद्ध करतात.  मनुष्य या विषयांच्या आकर्षणामधून सुटू शकत नाही.

२) विषयांच्या उपभोगांचा त्याग केला तरी इंद्रिये स्वस्थ बसू देत नाहीत.  बुद्धिमान, विवेकी पुरुषांची इंद्रिये सुद्धा त्याच्या मनाला खेचून विशायांच्याकडे नेतात.  त्यावेळी सर्व तत्त्वज्ञान, विवेक संपतो व मनुष्य इंद्रियांच्या स्वभावाप्रमाणे स्वैर, उच्छृंखल वर्तन करतो.  

३) इंद्रियांच्यावर काही प्रमाणात संयमन केले, तरीही मन हा तिसरा प्रतिबंध आहे.  विषयांसाठी मन व्याकूळ होते.  विषय मिळाले नाहीत तर ते चिडखोर, क्रोधाविष्ट होते.  असे मन शास्त्रश्रवणामध्ये एकाग्र, तल्लीन, तन्मय होऊ शकत नाही.  नव्हे शास्त्रश्रवणासाठी मन उपलब्धच होत नाही.  

४) विषयांचे आकर्षण कमी केले, इंद्रिये व मन यांचे काही प्रमाणात नियमन केले, तरीही अंतःकरणामध्ये विषयांच्या सूक्ष्म भोगवासना असतात.  वरवरच्या स्थूल कामना गळून पडल्या की, या सूक्ष्म भोगवासना उफाळून बाहेर येतात.  संकल्प निर्माण करतात.  मनाला अस्वस्थ, व्याकूळ करतात आणि पुन्हा विषयभोगामध्येच प्रवृत्त करतात.  

५) या सर्व प्रतिबंधांना पार केले तरी सर्वात शेवटचा प्रतिबंध म्हणजे ‘अहंकार’ होय.  ज्ञानग्रहण करण्यामध्ये अहंकार आणि अहंकारामधून निर्माण झालेल्या कल्पना हा फार मोठा प्रतिबंध आहे.  त्यामुळे ज्ञान घेत असताना सतत द्वंद्व निर्माण होऊन ज्ञान आत्मसात होत नाही.  अहंकार मनुष्याला समर्पण होऊ देत नाही.

 

मायेने निर्माण केलेल्या अशा प्रतिबंधांच्यामुळे आपल्याजवळच तो आनंदाचा सागर असूनही आपल्याला त्याची प्रचीति येऊ शकत नाही.  अशी योगमाया अत्यंत सामर्थ्यशाली असून ती मोहजाल पसरते.  अनेक युक्त्या करते.  अनेक प्रकारांनी जीवांना भुलविते, खेळविते, नाचविते, नजरबंदी करते.  कोणालाही परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही.  जणु काही ती माया सर्व जीवांची परीक्षा घेते.  परमेश्वरच त्या मायेला परीक्षा घेण्याची आज्ञा देतो.  

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ