Showing posts with label Creator. Show all posts
Showing posts with label Creator. Show all posts

Tuesday, August 29, 2023

साक्षी आणि उत्पत्तीकरता | Witness and Creator

 



यस्य सन्निधिमात्रेण प्रधानादिप्रवृत्तिः सः अध्यक्षः |  ज्याच्या केवळ अस्तित्वाने राजसभागृहामध्ये प्रधानादि सर्व लोक कार्यान्वित होतात तो राजा किंवा अध्यक्ष होय.  राजाच्या केवळ अस्तित्वाने सर्व लोक त्यांच्या त्यांच्या विशिष्ट कर्मामध्ये प्रवृत्त होतात.  राजाशिवाय कोणताही व्यवहार चालू शकत नाही.  म्हणून सर्व सभा राजावर अवलंबून असते.  राजा मात्र कोणत्याही व्यापारामध्ये ढवळाढवळ न करता तटस्थ आणि अलिप्त असतो.

 

त्याप्रमाणे परमात्म्याच्या केवळ सान्निध्याने प्रकृति चराचर विश्वाची निर्मिती करते.  येथे एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, परमात्मा निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही.  त्यामुळे विश्वाच्या निर्मितीची शक्यता नाही.  विश्व निर्माण करणे म्हणजे विकार होणे होय.  तसेच त्रिगुणात्मक प्रकृति स्वतः जड, अचेतन असल्यामुळे ती स्वतःच्या कर्तृत्वाने विश्वाची निर्मिती करू शकत नाही.  मग प्रश्न आहे विश्वाची निर्मिती कशी होते ?  यासाठी येथे – मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् |

 

माझ्या अध्यक्ष स्वरूपाने म्हणजेच मायेमध्ये पडलेल्या कूटस्थ, साक्षी, चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त झाल्यामुळे मायेला सत्ता आणि स्फूर्ति म्हणजे चेतना प्राप्त होते, हे मायाउपहित चैतन्य त्रिगुणांच्यामधून चर-अचर, स्थावर-जंगम आदि सर्व विश्व आणि भूतामात्रे निर्माण करते.  याठिकाणी ‘सूयते’ हा शब्द स्थिति आणि संहार या अन्य दोन क्रिया सुद्धा दर्शवितो.  याचा अर्थ त्रिगुणात्मक प्रकृति निर्माण करते, तीच स्थिति करते आणि सर्वांचा संहार करते.

 

मायाउपाधियुक्त परब्रह्मामधून म्हणजेच आत्मचैतन्यामधून आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथिवी ही क्रमाने पंचमहाभूते निर्माण होऊन त्यानंतर औषधी आणि अन्न निर्माण झाले.  अन्नामधून अन्नरसमय पुरुष म्हणजेच स्थूल शरीर निर्माण झाले.  त्याच्याही आत क्रमाने प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय पुरुष निर्माण होऊन त्या सर्वांच्या आगदी आत तोच परमात्मा प्रत्यगात्मस्वरूपाने आहे.  तोच प्रकृतीच्या उत्पत्तिस्थितिलय वगैरे कर्मामध्ये साक्षीचैतन्य स्वरूपाने राहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Thursday, August 25, 2016

कल्पित विश्व निर्माण कसे झाले? | How Imaginary Cosmos was Created?


परब्रह्म हे प्रत्यक्षात निर्विकार, निर्विशेष स्वरूपाचे असल्यामुळे त्यामध्ये विश्वनिर्मिती हा विकार होऊच शकणार नाही.  मग हे अध्यस्त, कल्पित विश्व निर्माण झालेच कसे?
            
भगवान भाष्यकार म्हणतात – हे सर्व विश्व त्रिगुणात्मक अविद्येच्या साहाय्याने ‘मी’ च संवित् स्वरूप असलेल्या प्रत्यक् चैतन्यामध्ये कल्पित केलेले आहे. श्रुति म्हणते – इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते |  परमात्मा मायेच्या साहाय्याने बहुरूपला, विश्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजेच मायाउपाधियुक्त परब्रह्मानेच हे विश्व निर्माण केले.

निर्मितीसाठी दोन घटकांची आवश्यकता आहे – निमित्तकारण आणि उपादानकारण.  या दोन कारणांशिवाय विश्वामधील कोणत्याही वस्तूची निर्मिती होत नाही.  उदा. घटाच्या निर्मितीमध्ये घटाचा कर्ता कुंभार निमित्तकारण आहे आणि ज्याच्यामधून घट निर्माण केला ती माती त्या घटाचे उपादानकारण होते.  याचप्रमाणे विश्व सुद्धा घटाप्रमाणे कार्य असल्यामुळे विश्वनिर्मितीला सुद्धा या दोन कारणांची आवश्यकता आहे.  म्हणून शास्त्र म्हणते की, त्रिगुणात्मक माया हे विश्वाचे उपादानकारण आहे आणि परब्रह्म हे निमित्तकारण आहे.

घटपटादि निर्मितीमध्ये घटाचे उपादानकारण माती आणि घटाचा कर्ता निमित्तकारण कुंभार हे दोन्हीही घटक भिन्न आहेत, वेगळे आहेत परंतु विश्व निर्मितीमध्ये मात्र हे दोन्हीही घटक भिन्न असूच शकत नाहीत कारण विश्वनिर्मितीपूर्वी विश्वाचा अभाव असल्यामुळे निर्विशेष, निरवयव परब्रह्माशिवाय कशाचेच अस्तित्व नव्हते.  इतकेच नव्हे तर देश, कालावधी कल्पनाही नव्हती.  म्हणून कुंभार ज्याप्रमाणे एखाद्या बाह्यस्थानामध्ये उपलब्ध असलेली माती आणून घट निर्माण करतो, त्याप्रमाणे परब्रह्म विश्वाचे उपादानकारण बाहेरून आणू शकणार नाही कारण – वस्त्वन्तराभावात्परब्रह्माशिवाय अन्य कोणत्याही वस्तूचे अस्तित्वच नसते. त्यामुळे विश्वाचे उपादान कारण हे विश्वाच्या निमित्त कारणापासून – परब्रह्मापासून भिन्न असू शकणार नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Monday, September 9, 2013

श्री गणपति – उत्पत्तिस्थितिलयकर्ता | Lord Ganpati – Creator Protector & Destroyer




गणेश हा तत्त्वमस्यात्मक असल्यामुळे ‘ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ’ असे म्हटले आहे.  येथे श्रीगणेश गुरुस्वरूप असून आत्मज्ञानाचा उपदेश देऊन भक्तांचे अज्ञान आणि अज्ञानजन्य संसार ध्वंस करणारा आहे.  म्हणून सर्व मुमुक्षूंनी ज्ञानप्राप्तीसाठी श्रीगणेशाची उपासना करावी.  याप्रमाणे गजाननाचे स्वरूप प्रतिपादन केल्यानंतर तत्पद आणि त्वंपदाचा अधिक विचार करण्यासाठी श्रुति पुढे म्हणते –

त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |
त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |
त्वं सक्षादात्माऽसि नित्यम् |

‘ तूच केवळ सृष्टीचा उत्पत्तिकर्ता आहेस.  तूच केवळ सृष्टीला धारण करणारा, पालन करणारा किंवा रक्षण करणारा आहेस.  तूच सर्व विश्वाचा ध्वंस करणारा म्हणजेच प्रलय करणारा आहेस. ’

कर्ता, धर्ता व हर्ता यामध्ये तीन भिन्न प्रकारच्या क्रिया आहेत.  एक उत्पत्तीची, दुसरी स्थितीची आणि तिसरी ध्वंस करणारी क्रिया आहे.  विश्वामध्ये या तीन्हीही घटना अटळ आहेत.  या तीन्हीही क्रियांचा कर्ता कोण ?  या तिन्हींचे तीन भिन्न कर्ते नसून एक आहे हे दर्शविण्यासाठी ‘ त्वमेव केवलं ’ असे तीन्हीही ठिकाणी म्हटले आहे.

तुझ्याशिवाय अन्य कोणीही विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता नाही.  अन्य सर्व देवदेवतांचा आणि कर्त्याचा निरास केला आहे.  याचा अर्थ ओंकारस्वरूप तत्त्वमस्यात्मक असणारा निर्गुण, निराकार, निर्विशेष, कूटस्थसाक्षी चैतन्यस्वरूप असणारा, सर्व विश्वाला प्रकाशमान करणारा परब्रह्मस्वरूप गणेश विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ