Tuesday, August 29, 2023

साक्षी आणि उत्पत्तीकरता | Witness and Creator

 



यस्य सन्निधिमात्रेण प्रधानादिप्रवृत्तिः सः अध्यक्षः |  ज्याच्या केवळ अस्तित्वाने राजसभागृहामध्ये प्रधानादि सर्व लोक कार्यान्वित होतात तो राजा किंवा अध्यक्ष होय.  राजाच्या केवळ अस्तित्वाने सर्व लोक त्यांच्या त्यांच्या विशिष्ट कर्मामध्ये प्रवृत्त होतात.  राजाशिवाय कोणताही व्यवहार चालू शकत नाही.  म्हणून सर्व सभा राजावर अवलंबून असते.  राजा मात्र कोणत्याही व्यापारामध्ये ढवळाढवळ न करता तटस्थ आणि अलिप्त असतो.

 

त्याप्रमाणे परमात्म्याच्या केवळ सान्निध्याने प्रकृति चराचर विश्वाची निर्मिती करते.  येथे एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, परमात्मा निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही.  त्यामुळे विश्वाच्या निर्मितीची शक्यता नाही.  विश्व निर्माण करणे म्हणजे विकार होणे होय.  तसेच त्रिगुणात्मक प्रकृति स्वतः जड, अचेतन असल्यामुळे ती स्वतःच्या कर्तृत्वाने विश्वाची निर्मिती करू शकत नाही.  मग प्रश्न आहे विश्वाची निर्मिती कशी होते ?  यासाठी येथे – मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् |

 

माझ्या अध्यक्ष स्वरूपाने म्हणजेच मायेमध्ये पडलेल्या कूटस्थ, साक्षी, चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त झाल्यामुळे मायेला सत्ता आणि स्फूर्ति म्हणजे चेतना प्राप्त होते, हे मायाउपहित चैतन्य त्रिगुणांच्यामधून चर-अचर, स्थावर-जंगम आदि सर्व विश्व आणि भूतामात्रे निर्माण करते.  याठिकाणी ‘सूयते’ हा शब्द स्थिति आणि संहार या अन्य दोन क्रिया सुद्धा दर्शवितो.  याचा अर्थ त्रिगुणात्मक प्रकृति निर्माण करते, तीच स्थिति करते आणि सर्वांचा संहार करते.

 

मायाउपाधियुक्त परब्रह्मामधून म्हणजेच आत्मचैतन्यामधून आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथिवी ही क्रमाने पंचमहाभूते निर्माण होऊन त्यानंतर औषधी आणि अन्न निर्माण झाले.  अन्नामधून अन्नरसमय पुरुष म्हणजेच स्थूल शरीर निर्माण झाले.  त्याच्याही आत क्रमाने प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय पुरुष निर्माण होऊन त्या सर्वांच्या आगदी आत तोच परमात्मा प्रत्यगात्मस्वरूपाने आहे.  तोच प्रकृतीच्या उत्पत्तिस्थितिलय वगैरे कर्मामध्ये साक्षीचैतन्य स्वरूपाने राहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ