परब्रह्म
हे प्रत्यक्षात निर्विकार, निर्विशेष स्वरूपाचे असल्यामुळे त्यामध्ये
विश्वनिर्मिती हा विकार होऊच शकणार नाही. मग
हे अध्यस्त, कल्पित विश्व निर्माण झालेच कसे?
भगवान
भाष्यकार म्हणतात – हे सर्व विश्व त्रिगुणात्मक अविद्येच्या साहाय्याने ‘मी’ च
संवित् स्वरूप असलेल्या प्रत्यक् चैतन्यामध्ये कल्पित केलेले आहे. श्रुति म्हणते – इन्द्रो
मायाभिः पुरुरूप ईयते | परमात्मा मायेच्या साहाय्याने
बहुरूपला, विश्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजेच मायाउपाधियुक्त परब्रह्मानेच हे
विश्व निर्माण केले.
निर्मितीसाठी
दोन घटकांची आवश्यकता आहे – निमित्तकारण आणि उपादानकारण. या दोन कारणांशिवाय विश्वामधील कोणत्याही
वस्तूची निर्मिती होत नाही. उदा. घटाच्या निर्मितीमध्ये घटाचा कर्ता कुंभार निमित्तकारण
आहे आणि ज्याच्यामधून घट निर्माण केला ती माती त्या घटाचे उपादानकारण होते. याचप्रमाणे विश्व सुद्धा घटाप्रमाणे कार्य
असल्यामुळे विश्वनिर्मितीला सुद्धा या दोन कारणांची आवश्यकता आहे. म्हणून शास्त्र म्हणते की, त्रिगुणात्मक माया
हे विश्वाचे उपादानकारण आहे आणि परब्रह्म हे निमित्तकारण आहे.
घटपटादि
निर्मितीमध्ये घटाचे उपादानकारण माती आणि घटाचा कर्ता निमित्तकारण कुंभार हे
दोन्हीही घटक भिन्न आहेत, वेगळे आहेत परंतु विश्व निर्मितीमध्ये मात्र हे दोन्हीही
घटक भिन्न असूच शकत नाहीत कारण विश्वनिर्मितीपूर्वी विश्वाचा अभाव असल्यामुळे
निर्विशेष, निरवयव परब्रह्माशिवाय कशाचेच अस्तित्व नव्हते. इतकेच नव्हे तर देश, कालावधी कल्पनाही नव्हती. म्हणून कुंभार ज्याप्रमाणे एखाद्या
बाह्यस्थानामध्ये उपलब्ध असलेली माती आणून घट निर्माण करतो, त्याप्रमाणे परब्रह्म
विश्वाचे उपादानकारण बाहेरून आणू शकणार नाही कारण – वस्त्वन्तराभावात् | परब्रह्माशिवाय अन्य
कोणत्याही वस्तूचे अस्तित्वच नसते. त्यामुळे विश्वाचे
उपादान कारण हे विश्वाच्या निमित्त कारणापासून – परब्रह्मापासून भिन्न असू शकणार
नाही.
- "मनीषा
पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment