Showing posts with label Unaffected. Show all posts
Showing posts with label Unaffected. Show all posts

Tuesday, March 24, 2020

तीन भोगावास्था | Three States of Consumption




आचार्य तीन प्रकारचे भोग व तीन प्रकारचे भोक्ते यांचे वर्णन करीत आहेत.  जागृतावस्थेत ‘स्थूल पदार्थ’, स्वप्नावस्थेत ‘सूक्ष्म पदार्थ’ तर सुषुप्ति अवस्थेत ‘आनंद’ अशा या भोग्य वस्तु असतात.  वस्तुतः हे एकच भोग्य असून ते स्थूल-सूक्ष्म-आनंद या तीन प्रकारामध्ये विभागले जाते.  तसेच, यांचा भोक्ता सुद्धा वस्तुतः एकच असून तो विश्व-तैजस-प्राज्ञ या तीन नामांनी निर्देशित होतो.  म्हणूनच “तो मी आहे” अशा एकत्व प्रत्ययाने जीवाला अनुभव येतो.  

जागृत पुरुषच म्हणतो, “मी स्वप्न पाहिले”, “मी झोपलो होतो”, असे जीवाला नित्य अनुसंधान होते.  विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील द्रष्टत्व हे समान आहे.  हे तिघेही त्या त्या जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्थांचे द्रष्टे आहेत.  हे तीन द्रष्टे असतील तरीही तिन्हीही अवस्थांचा द्रष्टा ‘मी’ एकच आहे.  उपाधिभेदांच्यामुळे एकाच आत्म्याला ही तीन नावे मिळतात.  म्हणूनच विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील द्रष्टत्व समान आहे.  

याप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति यामधील तीनही भोग व तीनही भोक्ते स्वस्वरूपाच्या, तत्त्वाच्या दृष्टीने एकच आहेत, असे जो जाणतो, म्हणजेच भोक्ता व सर्व भिन्न-भिन्न असणाऱ्या भोग्य पदार्थांना जाणतो.  तो भोग्य वस्तूंचे भोग घेऊनही त्यामुळे लिप्त, स्पर्शित होत नाही.  कारण सर्व भोग्य पदार्थ हे एकाच भोक्त्याचे भोज्य आहे.  म्हणजेच सर्व भोग हे भोक्त्याच्या भोगाचे विषय झाले व भोक्ता हा विषयी झाला.  म्हणूनच विषयांच्यामुळे विषयी हा लिप्त होत नाही, हा सिद्धांत आहे.  

विषयी भोक्ता हा भोग्य विषयांच्यापासून नित्य भिन्न स्वरूपाचा आहे, या ज्ञानाने धीर, विवेकी, तत्त्वज्ञानी पुरुष भोग घेऊनही त्या भोगांच्यामुळे कधीही लिप्त होत नाही.  तत्त्वज्ञानी पुरुष सर्व भोगांच्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूपाने राहतो.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ–

Saturday, February 28, 2015

गृहस्थाश्रम आणि ब्रह्मविद्या | Supreme Knowledge and Mundane Life



गृहस्थाश्रमामध्ये ब्रह्मविद्या अशक्य आहे का ?  असे असेल तर सर्व गृहस्थाश्रमी साधक या विद्येपासून परावृत्त होतील.  म्हणून भाष्यकार सांगतात की, ब्रह्मविद्या आणि गृहस्थाश्रम हे दोन विरोधी नाहीत तर ज्ञान आणि कर्म हे दोन विरुद्ध घटक असून त्यांचा समुच्चय शक्य नाही.  याचा अर्थ गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा ब्रह्मविद्या प्राप्त करणे शक्य आहे.  उलट याच दृष्टांताचा आधार घेऊन भाष्यकार सांगतात की, अंगिरस प्रभृति ऋषींनी गृहस्थाश्रमामध्येच ब्रह्मविद्या प्राप्त केलेली आहे.

संप्रदाय प्रवर्तक असणारा ब्रह्मज्ञानी पुरुष हा दुसऱ्या गृहस्थाश्रमी पुरुषाच्या दृष्टीने गृहस्थाश्रमी आहे.  परंतु ब्रह्मविद्येच्या दृष्टीने पाहिले तर गृहस्थाश्रम हा मिथ्या आहे.  म्हणजेच ब्रह्मविद्येमध्ये गृहस्थाश्रमाचा सुद्धा निरास होतो.  त्याच्या दृष्टीने जरी तो व्यावहारिक गृहस्थाश्रमी असेल, तरी सुद्धा तो सतत तत्त्वाचे चिंतन करीत असल्यामुळे आपोआप क्रमाने त्याच्या सर्व संसाराचा, गृहस्थाश्रमाचा निरास होतो.  ब्रह्मविद्येच्या दृष्टीने तो गृहस्थाश्रमी नसून साक्षात संन्यासीच आहे.

याप्रमाणे, ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने गृहस्थाश्रम व गृहस्थाश्रमाची कर्तव्यकर्मे हा फक्त एक भास आहे.  म्हणून ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने सर्व कर्मे – दग्धबीजवत् इति |  भाजलेल्या बीजामधून ज्याप्रमाणे पुन्हा वृक्षाची निर्मिती होत नाही, त्याप्रमाणेच ब्रह्मविद्येमुळे गृहस्थाश्रमामधील सत्यत्वबुद्धीचा निरास होतो.  त्यामुळे ती कर्मे ज्ञानी पुरुषाला बद्ध करू शकत नाहीत.  उलट ती कर्मे करूनही ज्ञानी पुरुष अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहतो.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ –