आचार्य
तीन प्रकारचे भोग व तीन प्रकारचे भोक्ते यांचे वर्णन करीत आहेत. जागृतावस्थेत ‘स्थूल पदार्थ’, स्वप्नावस्थेत ‘सूक्ष्म
पदार्थ’ तर सुषुप्ति अवस्थेत ‘आनंद’ अशा या भोग्य वस्तु असतात. वस्तुतः हे एकच भोग्य असून ते
स्थूल-सूक्ष्म-आनंद या तीन प्रकारामध्ये विभागले जाते. तसेच, यांचा भोक्ता सुद्धा वस्तुतः एकच असून तो
विश्व-तैजस-प्राज्ञ या तीन नामांनी निर्देशित होतो. म्हणूनच “तो मी आहे” अशा एकत्व प्रत्ययाने
जीवाला अनुभव येतो.
जागृत
पुरुषच म्हणतो, “मी स्वप्न पाहिले”, “मी झोपलो होतो”, असे जीवाला नित्य अनुसंधान
होते. विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील
द्रष्टत्व हे समान आहे. हे तिघेही त्या
त्या जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्थांचे द्रष्टे आहेत. हे तीन द्रष्टे असतील तरीही तिन्हीही
अवस्थांचा द्रष्टा ‘मी’ एकच आहे. उपाधिभेदांच्यामुळे
एकाच आत्म्याला ही तीन नावे मिळतात. म्हणूनच
विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील द्रष्टत्व समान आहे.
याप्रमाणे
जागृत-स्वप्न-सुषुप्ति यामधील तीनही भोग व तीनही भोक्ते स्वस्वरूपाच्या, तत्त्वाच्या
दृष्टीने एकच आहेत, असे जो जाणतो, म्हणजेच भोक्ता व सर्व भिन्न-भिन्न असणाऱ्या
भोग्य पदार्थांना जाणतो. तो भोग्य
वस्तूंचे भोग घेऊनही त्यामुळे लिप्त, स्पर्शित होत नाही. कारण सर्व भोग्य पदार्थ हे एकाच भोक्त्याचे
भोज्य आहे. म्हणजेच सर्व भोग हे भोक्त्याच्या
भोगाचे विषय झाले व भोक्ता हा विषयी झाला. म्हणूनच विषयांच्यामुळे विषयी हा लिप्त होत
नाही, हा सिद्धांत आहे.
विषयी
भोक्ता हा भोग्य विषयांच्यापासून नित्य भिन्न स्वरूपाचा आहे, या ज्ञानाने धीर,
विवेकी, तत्त्वज्ञानी पुरुष भोग घेऊनही त्या भोगांच्यामुळे कधीही लिप्त होत नाही. तत्त्वज्ञानी पुरुष सर्व
भोगांच्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूपाने राहतो.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment