Sunday, January 26, 2020

काळात हरविलेले आयुष्य | Life Lost in Time
कालबद्ध जीवनामध्ये मनुष्य अनेक विषय पाहतो.  त्यामधील काही विषय, काही भोग किंवा काही व्यक्ति त्याला आकर्षित करतात.  त्यामधूनच त्याच्या मनात त्या-त्या विषयांच्या कामना म्हणजेच भोगेच्छा निर्माण होतात.  पैसा मिळविणे, ऐहिक समृद्धी, भरभराट करणे, प्रजोत्पत्ति करणे, मुलांचे संगोपन करणे, त्यांना मोठे करणे, इतकेच आपल्याला आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य वाटते.  

अध्यात्ममार्गामध्ये थोडीशी आवड निर्माण झाली की, मनुष्य या मार्गामध्ये प्रवेश करतो.  स्वतःला साधक म्हणून घेतो.  शास्त्र ऐकून खूप साधना करावी, खूप जप करावा, खूप भजन पूजन करावे, असे वाटते.  परंतु मनुष्य विचार करतो की, सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहे.  जरा कामाचा ताण कमी झाला की, आपण साधना करू. सध्या नोकरी आहे.  रिटायर झालो की, साधना करू.  कोणी-कोणी तर खास साधनेसाठी लवकरच रिटायर होतात.  

मग वाटते मुले खूप लहान आहेत, ती थोडीशी मोठी झाली की साधना करू.  नंतर मुलांचे शिक्षण झाले की करू.  मुलांना नोकरी लागून ते स्थिरस्थावर झाले की मग करू. नंतर मग वाटते, आता बास् !  शेवटचे कर्तव्य शिल्लक आहे.  मुलांचे विवाह पार पडले की सुटलो.  मग अध्यात्मच करायचे.  मुलांचे विवाह ही होतात.  घरात सुनबाई येतात.  परंतु मुक्त होण्याऐवजी माणसे त्यावेळी संसारामध्ये जास्तच अडकतात.  मग वाटते की, सूनबाई नवीन आहेत.  त्यांना आपल्या चालीरीति सर्व काही शिकवायला हव्यात.  तोपर्यंत नातू येतात.  मग तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अगदी व्यस्त होऊन जाते.  मग तो साधक म्हणतो की, आता नातवांना सांभाळणे हेच आमचे कर्तव्य आहे.  बस्स !  तिथेच साधना संपते.  साधनेचा संकल्प संपतो.  

आपल्याला वाटते की, ही सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणे, इतकेच आपले जीवन आहे.  परंतु ही सर्व कर्तव्ये पूर्ण करता-करता मनुष्याचे आयुष्य निघून जाते.  मृत्यु समोर येतो, तरी कर्तव्ये संपत नाहीत.  मृत्यु समोर दिसला तरीही मनुष्याच्या इच्छा संपत नाहीत.  एका क्षणामध्ये कालरूपी मृत्यु झडप घालतो व मनुष्याचे जीवन, सर्वस्व हिरावून नेतो.  काळाला दयामाया नसते.  काळामध्ये उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, लहान-वृद्ध असा कोणताही भेद नसतो.  प्रत्येकाला वेळ आली की काळ गिळंकृत करतो.  - "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015- हरी ॐ

No comments:

Post a Comment