Showing posts with label Sanskar. Show all posts
Showing posts with label Sanskar. Show all posts

Tuesday, March 5, 2019

संस्कारवर्ग आणि वृद्धाश्रम | Behavior Classes and Old-age Homes




प्राचीन काळामध्ये गुरुकुल परंपरा होती.  गुरुकुल परंपरा हा आपल्या हिंदु संस्कृतीचा आत्मा आहे.  परंतु काळाच्या ओघात आधुनिकतेच्या नावाखाली गुरुकुल परंपरेचे आपल्या समाजातून उच्चाटन झाले.  यामुळे सांप्रतच्या समाजामध्ये स्वधर्म, आपली दिव्य संस्कृती, आपल्या परंपरा या सर्वांचे घोर अज्ञान आहे.  

अन्य धर्मांचे निरीक्षण केले तर दिसते की, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीस कुराण माहीत असते, प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीस बायबल माहीत असते, परंतु आपल्यापैकी कित्येकांना वेद-उपनिषदे यांचे अज्ञान आहे.  आपल्या या ग्रंथांची नावे सुद्धा माहीत नसणे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे गुरुकुल परंपरेचा व संस्कारांचा अभाव !  म्हणून आज ठिकठिकाणी संस्कारवर्ग वाढत आहेत.  

संस्कारवर्गांच्याबरोबर वृद्धाश्रमांची संख्या ही वाढत आहे.  आपल्या शरीरामध्ये नऊ महिने जी माता गर्भाला आपला अविभाज्य भाग म्हणून संभाळते, जन्मल्यानंतर डोळ्यात तेल घालून संगोपन करते, वेळप्रसंगी स्वतः उपवाशी राहून आपल्या मुलाला भरवून त्याच्या डोळ्यातील आनंद निरखते, त्या आईला वेळ आल्यावर जो मुलगा घरात अडचण झाली म्हणून विभक्त करून घराच्या बाहेरील बाल्कनीमध्ये, अत्यंत दयनीय अवस्थेत तिची व्यवस्था करतो, किंवा तिथेही अडचण होते म्हणून वेळात वेळ काढून वृद्धाश्रमात जाऊन तिची नावनोंदणी करतो व परदेशातून दर महिन्याला तिच्या नावे कागदाच्या चेकवर सही करून पाठवितो, त्या मुलाला काय म्हणावे ?  सुशिक्षित, आधुनिक, प्रगत, विकसित यापैकी कोणती पदवी द्यावी ?  

ज्या भूमीत धरणीला सुद्धा मातृत्व प्रदान करून तिला परकियांच्या श्रुंखलांच्यामधून मुक्त करण्यासाठी – वंदे मातरम् !  म्हणत हजारो क्रांतीवीरांनी, भारतमातेच्या सुपुत्रांनी स्वतःला मृत्यूच्या दरीत हसत-हसत लोटून दिले, त्याच भूमीत मातृत्वाच्या अत्यंत पवित्र पदाला इतकी अवकळा यावी, यापेक्षा अधिक दैवदुर्विलास तो कोणता ?  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ –




Tuesday, January 22, 2019

वेदांत आणि तथाकथित आधुनिकता | Vedanta and So-called Modernity




वेदांच्यामधील, उपनिषदांच्यामधील ज्ञान हे केवळ समाजाच्या ठराविक वर्गासाठी नाही किंवा केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या जिज्ञासूला सांगितलेले नाही किंवा आयुष्यात उतारवयात श्रवण करावयाचे नसून वेदांनी आपले ज्ञानभांडार विश्वामधील मनुष्य म्हणून जीवन जगणाऱ्या माणसांच्यासाठी खुले केलेले आहे.  वेदांत हा रुक्ष विषय नसून आपल्या जीवनाशी अत्यंत निगडित असे हे ज्ञान आहे.  मानवी जीवनाशी घनिष्ट संबंध असणारे वेदांताइतके दुसरे कोणतेही शास्त्र असूच शकत नाही.  

वेदांतशास्त्र म्हणजे पलायनवाद नसून उलट जीवनाला आनंदाने सामोरे कसे जावे, जीवन परिपूर्ण कसे करावे, याचे practical ज्ञान देणारे वेदांतशास्त्र आहे.  आजच्या शिक्षणक्रमामध्ये जर हे शास्त्र समाविष्ट होऊन तरुण पिढीच्या वाचनात हे शास्त्र येऊन काही प्रमाणात आचरणात आले तर समाजामधील कितीतरी समस्या सुटण्याची शक्यता आहे.  आध्यात्मिक ज्ञान ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञानाची हाक आहे.  याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा.  

आपण आधुनिकतेच्या नावावर आपली थोर जीवनमूल्येच पायदळी तुडविलेली आहेत.  वेदांना कालबाह्य ठरवून वेदांना जीवनातून काढून टाकलेले आहे.  वेद आपल्या जीवनात स्थित असले असते, तर आज लहान मुलांच्या मुखांमध्ये अश्लील गाण्यांऐवजी – मातृदेवो भव !  पितृदेवो भव !  असे वेदध्वनि उमटले असते.  त्यावेळी त्यांना – तू आईला नमस्कार कर, असे सांगण्याची वेळच आली नसती.  

संस्कार म्हणजेच – सम्यक् क्रियन्ते इति |  जे मनुष्यावर प्रयत्नपूर्वक, यथार्थपणे केले जातात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात.  आपले जीवन ज्ञानाबरोबर आचार-उच्चारांनीही सुसंस्कृत, सुसंपन्न व्हावे, यासाठी श्रुतीने आई-वडिल-आचार्य असे तीन संबंध सांगितले आहेत.  जीवनामध्ये हे तिन्हीही संबंध असावेत.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ –