वेदांच्यामधील,
उपनिषदांच्यामधील ज्ञान हे केवळ समाजाच्या ठराविक वर्गासाठी नाही किंवा केवळ
सर्वसंगपरित्याग केलेल्या जिज्ञासूला सांगितलेले नाही किंवा आयुष्यात उतारवयात
श्रवण करावयाचे नसून वेदांनी आपले ज्ञानभांडार विश्वामधील मनुष्य म्हणून जीवन
जगणाऱ्या माणसांच्यासाठी खुले केलेले आहे. वेदांत हा रुक्ष विषय नसून आपल्या जीवनाशी
अत्यंत निगडित असे हे ज्ञान आहे. मानवी
जीवनाशी घनिष्ट संबंध असणारे वेदांताइतके दुसरे कोणतेही शास्त्र असूच शकत नाही.
वेदांतशास्त्र
म्हणजे पलायनवाद नसून उलट जीवनाला आनंदाने सामोरे कसे जावे, जीवन परिपूर्ण कसे
करावे, याचे practical ज्ञान
देणारे वेदांतशास्त्र आहे. आजच्या शिक्षणक्रमामध्ये जर हे शास्त्र समाविष्ट
होऊन तरुण पिढीच्या वाचनात हे शास्त्र येऊन काही प्रमाणात आचरणात आले तर समाजामधील
कितीतरी समस्या सुटण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक
ज्ञान ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञानाची हाक आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा.
आपण
आधुनिकतेच्या नावावर आपली थोर जीवनमूल्येच पायदळी तुडविलेली आहेत. वेदांना कालबाह्य ठरवून वेदांना जीवनातून काढून
टाकलेले आहे. वेद आपल्या जीवनात स्थित
असले असते, तर आज लहान मुलांच्या मुखांमध्ये अश्लील गाण्यांऐवजी – मातृदेवो भव !
पितृदेवो भव ! असे वेदध्वनि उमटले असते. त्यावेळी त्यांना – तू आईला नमस्कार कर, असे
सांगण्याची वेळच आली नसती.
संस्कार
म्हणजेच – सम्यक् क्रियन्ते इति | जे मनुष्यावर प्रयत्नपूर्वक,
यथार्थपणे केले जातात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात. आपले जीवन ज्ञानाबरोबर आचार-उच्चारांनीही
सुसंस्कृत, सुसंपन्न व्हावे, यासाठी श्रुतीने आई-वडिल-आचार्य असे तीन संबंध
सांगितले आहेत. जीवनामध्ये हे तिन्हीही
संबंध असावेत.
- "कठोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment