अध्यात्मशास्त्राचे श्रवण करताना जो जो उपदेश
आरंभ केला जातो, तसेच प्रमाण-प्रमेय विषयक ज्या-ज्या सर्व दृष्टि आहेत, हे सर्व ज्ञान
साधकाला आत्मतत्त्वाचा अनुभव येईपर्यंतच उपयोगी असते. त्यानंतर हा सर्व उपदेश, या सर्व शास्त्रदृष्टि,
हे ज्ञान या सर्वांची उपशमा होते. कारण आत्मानुभूतीनंतर
उपदेशाचे प्रयोजन सुद्धा संपते.
श्रीवसिष्ठ मुनि येथे श्रीरामांना उपदेश देण्यापूर्वीच
त्या ज्ञानाचे स्वरूप व प्रयोजन सांगतात. शास्त्र
ऐकताना साधकाला शास्त्राची दृष्टि समजणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्राचे शाब्दिक ज्ञान समजणे सोपे आहे. संस्कृत येत असेल तर शब्दार्थ, अन्वयार्थ लावून आपल्याला
थोडेफार समजू लागते. "यत् दृष्टं तत्
नष्टम् |" असे युक्तिवादही बुद्धीला
समजू लागतात. परंतु श्रुति आणि युक्ति समजल्यानंतर
अनुभव येणे महत्त्वाचे आहे. अनुभव नसेल तर
त्या शाब्दिक पांडित्यामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणून शास्त्रामध्ये श्रवण, मनन, निदिध्यासना अशा
तीन साधना सांगितल्या जातात.
श्रवणामधून शास्त्राचे शाब्दिक ज्ञान
होते. मननामधून त्या ज्ञानाविषयीच्या शंका
नष्ट होतात आणि निदिध्यासनेने ते ज्ञान दृढ होऊन त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त होते. ज्ञाननिष्ठा प्राप्त होऊन साधकाला
ज्यावेळेस 'मी' स्वतःच आनंदस्वरूप आहे, अशी अनुभूति येते, त्यावेळी मग शाब्दिक ज्ञानाचेही
प्रयोजन संपते. शास्त्राचे सर्व आरंभ, शास्त्रबुद्धि
या सर्वांची उपशमा होते. कारण 'मी' स्वतःच
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म आहे, ही अनुभूति आली की, शास्त्राचे प्रयोजनच संपते.
आदि शंकराचार्य म्हणतात (आत्मबोध) –
अज्ञानकलुषं जीवं ज्ञानाभ्यासात्
विनिर्मलं | कृत्वा ज्ञानं स्वयं नश्येत् जलं
कतकरेणुवत् || आत्मस्वरूपाच्या
अज्ञानामुळे अहंकारादि प्रत्ययांनी कलुषित झालेला जीव ज्ञानाभ्यासामुळे अज्ञानाचा नाश
होऊन अत्यंत शुद्ध, विकाररहित होतो. त्यामुळे
जसे कतकरेणु प्रथम सर्व पाणी शुद्ध करून नंतर स्वतः सुद्धा नाश पावतो, त्याचप्रमाणे
ज्ञानाने जीवाच्या अज्ञानउपाधीचा नाश होऊन जीव स्वतःच परब्रह्मस्वरूप होतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–