संसाराला
अनादि आणि अनंत ही दोन विशेषणे वापरली आहेत. संसाराला सुरुवातही नाही आणि शेवट सुद्धा नाही. तो अनादि आहे, त्याला सुरुवात नाही, कारण या
संसाराचे उपादान कारण अविद्या आहे. अविद्या
ही अनादि आहे. म्हणूनच कोणत्याही
वस्तूचे अज्ञान केव्हा निर्माण झाले ? हे
सांगता येत नाही. उदा. माझ्यामध्ये फ्रेंच
भाषेचे अज्ञान केव्हापासून निर्माण झाले, हे सांगता येत नाही. म्हणून अज्ञान हे अनादि आहे. अज्ञानाला निश्चित सुरुवात नाही.
जसे
कारण तसे कार्य, या न्यायाने अज्ञानाचे कार्य असणारा संसार सुद्धा अनादि आहे. म्हणूनच संसाराला सुरुवात कोठून झाली ? हे सांगता येत नाही. जसे, वृक्ष प्रथम की बीज प्रथम ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. तसेच संसार केव्हा निर्माण झाला ? हे सांगता येत नाही.
तसेच,
येथे संसाराचे दुसरे विशेषण अनंत हे आहे. ज्याचा
अंत, नाश होत नाही, त्याला ‘अनंत’ असे म्हणतात. संसार हा अनंत आहे. अनेक शरीरे जन्माला आली आणि मरण पावली, परंतु
शरीराचा नाश म्हणजे संसाराचा नाश नव्हे. आपण
मरण पावलो की, सर्व संसारामधून, दुःखांच्यामधून मुक्त होऊ, अशी आपली कल्पना असते.
परंतु
जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कर्मांनी, कोणत्याही
साधनेने या संसाराचा ध्वंस होणे शक्य नाही. तोपर्यंत हा संसार अनंत आहे. अशा या अनादि आणि अनंत संसाराचे हनन करणे,
निरास करणे हेच प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.
- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment