Showing posts with label Nihilism. Show all posts
Showing posts with label Nihilism. Show all posts

Tuesday, March 24, 2026

शून्यवादाचे खंडन | Negation Of Nihilism

 




बौद्धवादी म्हणतात की, ज्ञान व स्मृति म्हणजेच जागृतपदार्थ व स्वप्नपदार्थ हे निरास्पद म्हणजे आश्रयरहित आहेत.  परंतु ज्याप्रमाणे दोरीच्या आश्रयाशिवाय सापाचा भ्रम होऊच शकत नाही.  तसेच, परब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय कल्पित विश्वाची निर्मिती शक्यच नाही.  अध्यास होण्यासाठी अधिष्ठानाची नितांत आवश्यकता असते.  हा पहिला भाग व दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अध्यस्त पदार्थ मिथ्या असून अधिष्ठान सत्य असते.

 

या न्यायाने ज्ञान व स्मृति म्हणजे जागृतपदार्थ व स्वप्न पदार्थ हे दिसत असतील तर त्यांना काहीतरी अधिष्ठान हे असलेच पाहिजे.  बौद्धांच्या म्हणण्याप्रमाणे ते पदार्थ आश्रयरहित-निरास्पद आहेत.  परंतु जागृतपदार्थ व स्वप्न पदार्थ यांना परब्रह्मस्वरूप आत्मचैतन्य हेच अधिष्ठान आहे.  यामधून आचार्यांनी बौद्ध व तत्सम असणाऱ्या शून्यवादी वगैरे मतांचे पूर्णतः खंडन करून शून्यवादाचा निरास केला आहे.  जसे प्रसिद्ध श्रुति म्हणते –

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते |  सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति |

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति |  सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |          (श्रीगणपति अथर्वशीर्ष)

 

संपूर्ण जग हे परमात्मस्वरूपामधूनच निर्माण होते, त्यामध्येच अस्तित्वात असते व त्यामध्येच लय पावते.  त्या स्वरूपामध्येच संपूर्ण विश्वाची प्रचीति येते.  म्हणून ते आत्मचैतन्यस्वरूप हेच संपूर्ण विश्वाचे अधिष्ठानस्वरूप आहे.

 

थोडक्यात ज्ञानस्मृतीचा म्हणजे जागृत व स्वप्न यामधील सर्व पदार्थांचे अधिष्ठान चैतन्यस्वरूप असून त्यामध्येच हे सर्व अनंत भेद निर्माण होतात.  या संपूर्ण अध्यासाला जाणणारे, प्रकाशमान करणारे तेच चैतन्य आहे.  म्हणून दृश्य सर्व पदार्थ हा अध्यास असून अधिष्ठानस्वरूप आत्मदेव, आत्मचैतन्य हेच एकमेव सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त सर्वच मिथ्या, वितथ, अध्यस्त, भासमान, असत् स्वरूपाचे आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ–



Monday, March 17, 2025

शून्यवादाचे खंडन | Disproving Nihilism

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी खांबाचा दृष्टांत दिला आहे.  या श्लोकामधून शून्यवादाचे खंडन केले आहे.  दृश्य विश्वाचा प्रलय झाला की, काहीच शिल्लक राहत नाही.  म्हणजे शून्य शिल्लक राहते, असे काही लोक म्हणतात.  परंतु असे म्हणणे युक्तिसंगत नाही.  हे सिद्ध करण्यासाठीच येथे खांबाचा दृष्टांत दिला आहे.  

 

"हे रामा !  जसे एखादा कुशल कारागीर एका लाकडी खांबामध्ये चित्र कोरण्यापूर्वी तो ते चित्र त्या खांबामध्ये प्रथम कल्पनेने पाहतो.  चित्र त्या खांबामध्ये असतेच.  त्याचप्रमाणे रामा !  विश्व निर्माण होण्यापूर्वी सुद्धा ते विश्व त्याच्या करणामध्येच अस्तित्वात असतेच.  म्हणून रामा !  विश्वाचे कारण असणारे परमात्मतत्त्व सत् स्वरूपाने अस्तित्वामध्ये असते.  ते तत्त्व निश्चित शून्य नसून सत् तत्त्व आहे, हेच येथे सिद्ध होते."

 

जसे आपण अनेक वेळेला सोने आणि अलंकार हे विधान ऐकतो.  त्यामध्ये आपण म्हणतो की, नाम-रूपाचा म्हणजेच अलंकारांचा नाश होतो, पण सोन्याचा मात्र कधीही नाश होत नाही.  या दृष्टांतामध्ये आणखी सखोल विचार केला तर समजते की, वस्तुतः अलंकारांचा सुद्धा नाश होत नाही.  अलंकार निर्माण होतात सोन्यामधून, सोन्यामध्ये अस्तित्वात असतात आणि नाश झाल्यानंतर सोन्यामध्येच जातात.  म्हणजेच नाश झाल्यानंतर अलंकार हे सोन्यामध्येच अस्तित्वात आहेत.  म्हणजेच सोनेही आहे आणि त्यामध्ये अलंकारही आहेत.

 

याचा अर्थच कारणही आहे आणि कार्यही आहे.  फक्त लय पावल्यानंतर आपल्याला नामरूपात्मक अलंकार दिसत नाहीत.  पण म्हणून अलंकार नाहीत, असे सिद्ध होत नाही.  म्हणजेच सोनेही आहे आणि अलंकारही आहेत.  याप्रमाणे येथे शून्यवादाचे पूर्ण खंडन होते.  म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे म्हणतात - तथा विश्वं स्थितं तत्र तेन शून्यं न तत्पदम् |  विश्वाचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा विश्व त्याच्या करणामध्ये स्थित असते.  म्हणून ते पद म्हणजेच विश्वाचे कारण कधीही शून्य होऊ शकत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–