Monday, March 17, 2025

शून्यवादाचे खंडन | Disproving Nihilism

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी खांबाचा दृष्टांत दिला आहे.  या श्लोकामधून शून्यवादाचे खंडन केले आहे.  दृश्य विश्वाचा प्रलय झाला की, काहीच शिल्लक राहत नाही.  म्हणजे शून्य शिल्लक राहते, असे काही लोक म्हणतात.  परंतु असे म्हणणे युक्तिसंगत नाही.  हे सिद्ध करण्यासाठीच येथे खांबाचा दृष्टांत दिला आहे.  

 

"हे रामा !  जसे एखादा कुशल कारागीर एका लाकडी खांबामध्ये चित्र कोरण्यापूर्वी तो ते चित्र त्या खांबामध्ये प्रथम कल्पनेने पाहतो.  चित्र त्या खांबामध्ये असतेच.  त्याचप्रमाणे रामा !  विश्व निर्माण होण्यापूर्वी सुद्धा ते विश्व त्याच्या करणामध्येच अस्तित्वात असतेच.  म्हणून रामा !  विश्वाचे कारण असणारे परमात्मतत्त्व सत् स्वरूपाने अस्तित्वामध्ये असते.  ते तत्त्व निश्चित शून्य नसून सत् तत्त्व आहे, हेच येथे सिद्ध होते."

 

जसे आपण अनेक वेळेला सोने आणि अलंकार हे विधान ऐकतो.  त्यामध्ये आपण म्हणतो की, नाम-रूपाचा म्हणजेच अलंकारांचा नाश होतो, पण सोन्याचा मात्र कधीही नाश होत नाही.  या दृष्टांतामध्ये आणखी सखोल विचार केला तर समजते की, वस्तुतः अलंकारांचा सुद्धा नाश होत नाही.  अलंकार निर्माण होतात सोन्यामधून, सोन्यामध्ये अस्तित्वात असतात आणि नाश झाल्यानंतर सोन्यामध्येच जातात.  म्हणजेच नाश झाल्यानंतर अलंकार हे सोन्यामध्येच अस्तित्वात आहेत.  म्हणजेच सोनेही आहे आणि त्यामध्ये अलंकारही आहेत.

 

याचा अर्थच कारणही आहे आणि कार्यही आहे.  फक्त लय पावल्यानंतर आपल्याला नामरूपात्मक अलंकार दिसत नाहीत.  पण म्हणून अलंकार नाहीत, असे सिद्ध होत नाही.  म्हणजेच सोनेही आहे आणि अलंकारही आहेत.  याप्रमाणे येथे शून्यवादाचे पूर्ण खंडन होते.  म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे म्हणतात - तथा विश्वं स्थितं तत्र तेन शून्यं न तत्पदम् |  विश्वाचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा विश्व त्याच्या करणामध्ये स्थित असते.  म्हणून ते पद म्हणजेच विश्वाचे कारण कधीही शून्य होऊ शकत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ