बौद्धवादी म्हणतात की, ज्ञान व स्मृति
म्हणजेच जागृतपदार्थ व स्वप्नपदार्थ हे निरास्पद म्हणजे आश्रयरहित आहेत. परंतु ज्याप्रमाणे दोरीच्या आश्रयाशिवाय
सापाचा भ्रम होऊच शकत नाही. तसेच, परब्रह्माच्या
अधिष्ठानाशिवाय कल्पित विश्वाची निर्मिती शक्यच नाही. अध्यास होण्यासाठी अधिष्ठानाची नितांत आवश्यकता
असते. हा पहिला भाग व दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अध्यस्त पदार्थ मिथ्या असून अधिष्ठान सत्य
असते.
या न्यायाने ज्ञान व स्मृति म्हणजे
जागृतपदार्थ व स्वप्न पदार्थ हे दिसत असतील तर त्यांना काहीतरी अधिष्ठान हे असलेच
पाहिजे. बौद्धांच्या म्हणण्याप्रमाणे ते
पदार्थ आश्रयरहित-निरास्पद आहेत. परंतु जागृतपदार्थ
व स्वप्न पदार्थ यांना परब्रह्मस्वरूप आत्मचैतन्य हेच अधिष्ठान आहे. यामधून आचार्यांनी बौद्ध व तत्सम असणाऱ्या
शून्यवादी वगैरे मतांचे पूर्णतः खंडन करून शून्यवादाचा निरास केला आहे. जसे प्रसिद्ध श्रुति म्हणते –
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं
जगदिदं त्वत्तस्तिष्ठति |
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि
प्रत्येति | (श्रीगणपति
अथर्वशीर्ष)
संपूर्ण जग हे परमात्मस्वरूपामधूनच निर्माण
होते, त्यामध्येच अस्तित्वात असते व त्यामध्येच लय पावते. त्या स्वरूपामध्येच संपूर्ण विश्वाची प्रचीति
येते. म्हणून ते आत्मचैतन्यस्वरूप हेच
संपूर्ण विश्वाचे अधिष्ठानस्वरूप आहे.
थोडक्यात ज्ञानस्मृतीचा म्हणजे जागृत व
स्वप्न यामधील सर्व पदार्थांचे अधिष्ठान चैतन्यस्वरूप असून त्यामध्येच हे सर्व
अनंत भेद निर्माण होतात. या संपूर्ण
अध्यासाला जाणणारे, प्रकाशमान करणारे तेच चैतन्य आहे. म्हणून दृश्य सर्व पदार्थ हा अध्यास असून
अधिष्ठानस्वरूप आत्मदेव, आत्मचैतन्य हेच एकमेव सत्य आहे. त्याव्यतिरिक्त सर्वच मिथ्या, वितथ, अध्यस्त, भासमान,
असत् स्वरूपाचे आहे.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, December 2016
- हरी ॐ–

