अरे रामा ! तू स्वतःच अत्यंत शुद्ध, स्वच्छ, सर्वव्यापी व सर्वत्र
स्फुरण पावणारा आहेस. त्यामुळे हे रामा ! तुझ्यामध्ये कुठली आली आहेत सुख-दुःखे ? किंवा तुझ्यामध्ये जन्म-मरण तरी कसे असू शकेल ? तुला कोणी बंधूच नसल्यामुळे तुला बांधवांच्यापासून
दुःख तरी कसे काय मिळेल ? दुःखच नसेल तर तुझ्या
शोकाचे कारण काय ?
आत्म्याव्यतिरिक्त दुसरी वस्तुच
अस्तित्वात नसल्यामुळे अशा या अद्वितीय आत्म्यामध्ये तुला कोण बरे बांधव असणार ? आणि तुला हे देह दिसून त्यांना तू बांधव म्हणत असशील
तर रामा ! ते देह म्हणजे केवळ परमाणूंचे रचलेले
ढीग आहेत ! ते देशकालांनी बद्ध
आहेत. त्यामुळे देहरूपी परमाणूंचे हे ढीग अनेक
वेळेला उत्पन्न होतात व नाश पावतात.
परंतु आत्मा मात्र उत्पन्नही होत नाही अथवा नाशही
पावत नाही. याप्रमाणे आत्मा अविनाशी असताना
"माझा मृत्यु होईल" असा शोक तू का बरे करतोस ? मृत्युरहित, स्वच्छ, निर्मल असणाऱ्या आत्म्यामध्ये
'विनाश' ही गोष्टच संभवत नाही. जसे मातीचा
घट फुटला तरी त्याच्या आतील घटाकाश फुटत नाही. त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत
नाही.
हे रामा ! जसे मृगजळाची नदी सुकून गेली तरी सूर्यप्रकाश नष्ट
होत नाही. त्याचप्रमाणे देह नष्ट झाला तरी
आत्मा नष्ट होत नाही. अरे रामा ! भ्रांतिरूप व अत्यंत निरर्थक असणारी वासना तुझ्यामध्ये
उत्पन्नच कशी काय होते ? कोणतीही इच्छा
ही अत्यंत भ्रममूलक आहे. अद्वय आत्म्याव्यतिरिक्त
येथे दुसरी वस्तु अस्तित्वातच नाही. असे असताना
हा अद्वय आत्मा दुसऱ्या कोणत्या वस्तूची इच्छा करू शकेल ? कारण येथे या जगात आत्म्याव्यतिरिक्त किंचित् सुद्धा
वस्तु अस्तित्वात नाही.
आत्म्याशिवाय दुसरे काही श्राव्य
(ऐकण्यासारखे), स्पृश्य (स्पर्श करण्यासारखे), दृश्य (पाहण्यासारखे), रस्य (चव घेण्यासारखे),
घ्रेय (गंधग्रहण करण्यासारखे) नाही. हे रामा
! जे ऐकावे, ज्याला स्पर्श करावा, जे पाहावे,
ज्याचा अस्वाद घ्यावा किंवा ज्याचा गंध ग्रहण करावा, अशी दुसरी वस्तुच येथे नाही. आकाशामध्ये जशी शून्यता असावी, त्याप्रमाणे
सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, अव्यक्त असणाऱ्या आत्म्यामध्येच या सर्व शक्ति स्थित आहेत.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–

