श्रीवसिष्ठ मुनींनी पुन्हा एकदा शूर पुरुषाची व्याख्या केली आहे. जो राजा स्वतः शास्त्रार्थाचे व लोकाचाराचे यथार्थ पालन करतो, ज्याचे राष्ट्र धर्मावर आधारलेले आहे, अशा राष्ट्राचा जो भक्त आहे, त्याला शूर असे म्हणावे. येथे श्रीवसिष्ठांनी जाणीवपूर्वक शूराचे लक्षण भक्ति हे सांगितले आहे. अन्यथा जगामध्ये शूरवीर, पराक्रमी लोक कमी नाहीत. अन्यायी, भ्रष्टाचारी, दहशतवादी, आतंकवादी हे लोक सुद्धा प्रचंड धाडसी पण आततायी आहेत. जीवावर उदार होऊन विध्वंस करणाऱ्या या अधर्मी लोकांच्यामध्ये सुद्धा शारीरिक बल आहे, पराक्रम आहे. परंतु त्यांना कोणी शूर किंवा पराक्रमी म्हणत नाही.
मात्र ज्या वीर योध्यांच्या हृदयामध्ये देशभक्ति
आहे, धर्मनिष्ठा आहे, जे स्वतः धर्मपरायण आहेत, अशा राष्ट्रभक्तांनाच शूर असे म्हणणे
योग्य आहे. भूमीला केवळ भूमी म्हणून
ना पाहता राष्ट्रभूमीला माता मानून त्यापुढे नतमस्तक होऊन त्या भूमीसाठी स्वतःच्या
प्राणांची आहुति देणारे भूमिपुत्र हेच खरे शूर आहेत. सामर्थ्य केवळ बाह्य शक्तीने किंवा शरीराने येऊ शकत
नाही. युद्धभूमीवर जावयाचे असेल, रणांगणावर
वीरश्रीचा संचार व्हावयाचा असेल तर अंतःकरणामध्ये धर्म, देश, राष्ट्र यांच्याबद्दल
नितांत भक्ति हवी. अधर्माबद्दल, अन्यायाबद्दल
प्रखर क्रोध हवा. तोच वीरपुरुष धर्मासाठी व
धर्माधीष्ठित राष्ट्रासाठी प्राणपणाने लढू शकेल.
म्हणून आपण धर्म व अधर्म, यापैकी कोणत्या पक्षामध्ये
आहोत ? याला महत्त्व आहे. आपल्यापुढे संपूर्ण इतिहासाची साक्ष आहे. राम-रावण युद्धामध्ये रावणाचा भाऊ असणाऱ्या विभीषणाने
रावणाचा म्हणजे अधर्माच्या पक्षाचा त्याग करून रामाच्या-धर्माच्या पक्षाचे अनुसरण केले.
म्हणून महापराक्रमी रावणापेक्षाही विभीषणाची
सत्कीर्ति अक्षय आहे. या भारतवर्षामध्ये जन्माला
आलेले भरत, रन्तिदेव आदि अनेक राजे हे महाबलाढ्य असून धर्मनिष्ठ व राष्ट्रभक्त होते.
जेथे भक्ति असते तेथेच निष्ठा असते. म्हणून वीर योध्यांमध्ये धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल
व राष्ट्राबद्दल एकनिष्ठा व भक्ति असणे, हे वीर योध्याचे प्रमुख लक्षण आहे.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–