ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच
आहे. नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो
नृप I अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II (श्रीमद्
भागवत) अव्यय, अप्रमेय, निर्गुण,
निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार
होतो. पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.
केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या
उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा
या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.
सत्य म्हणजे यथार्थ वचन होय. जसे आहे तसे बोलणे होय. सत्य बोलणे हा मनुष्याचा आद्य धर्म आहे. सत्याच्या आधारानेच या पृथ्वीला धारण केले जाते.
सत्याच्या सामर्थ्यानेच सूर्य तप्त होतो, अग्नि
जाळण्यास समर्थ होतो, असे सत्याचे महत्त्व अवर्णनीय आहे. म्हणून मनुष्याने जीवनभर सत्याने वागावे.
सत्याचा कधीही त्याग करू नये.
ईश्वराने अनेक तीर्थे निर्माण केली.
तीर्थांच्यामध्ये स्थानमहात्म्य असते. त्या त्या ठिकाणी जो श्रद्धापूर्वक जाईल आणि दानधर्मादि
आचरण करेल त्याला अगणित पुण्यफळ प्राप्त होते. तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन नव्हे. तीर्थयात्रेत आपले मन अत्यंत शुद्ध हवे. तसेच आपले आचरणही अतिशय शुद्ध व स्वच्छ हवे. तीर्थाच्या ठिकाणी केलेले पाप हे वज्रलेपाप्रमाणे
होते. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर
दुसऱ्याशी भांडण करणे, वैषयिक चर्चा करणे, निंदा-नालस्ती करणे, चोरी करणे, ईश्वराप्रति
अश्रद्धेचा भाव निर्माण करणे ही भयंकर पापे आहेत.
मात्र जो अतिशय श्रद्धेने तीर्थयात्रा करेल,
तेथे दानधर्मादींचे आचरण करेल, ईश्वराचे नामस्मरण करेल, त्यालाच तीर्थयात्रा फलदायी
होऊन ईश्वराच्या अस्तित्वाची विशेषत्वाने अनुभूति येऊ शकेल. तीर्थयात्रेला बाहेर पडल्यामुळे निदान काही प्रमाणात
साधकाचे मन रोजच्या व्यवहारापासून, संसाराच्या आसक्तीपासून निवृत्त होऊ शकेल.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–