ब्रह्मज्ञानाची प्राप्ति झाल्यानंतर या विश्वामध्ये बोलण्यासारखे काहीच शिल्लक राहात नाही. अन्यवस्त्वन्तराभावात् | परब्रह्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंचा आत्मज्ञानाने निरास होतो. त्यामुळे मिथ्या विश्वाविषयी काय बोलणार ? रज्जुमधून जो सर्प कधीही निर्माण झाला नाही, अशा मिथ्या सर्पाची चर्चा निरर्थक आहे. त्याचप्रमाणे परब्रह्मस्वरूप हे एकच सत्य आहे. या विश्वात घडून घडून काय घडणार ? उत्पत्ति, विनाश आणि त्यामध्ये घडामोडी ! त्याची चर्चा करून काहीच साध्य होणार नाही. उलट साधकाचे मन मात्र बहिर्मुख, विषयाभिमुख, अस्थिर होते.
म्हणूनच ब्रह्मज्ञानी पुरुष विश्वाबद्दल तर बोलत
नाहीच आणि ब्रह्मस्वरूपाबद्दलही बोलत नाही. मौन हे परब्रह्माचे स्वरूप आहे. भगवान भाष्यकार म्हणतात - मौनव्याख्याप्रकटितपरब्रह्मतत्त्वं युवानम् | (श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम् ). मौनरूपी व्याख्यानामधून गुरु शिष्याला परब्रह्मस्वरूपाचे
ज्ञान प्रदान करतात. येथे आत्मा हाही मौनस्वरूप,
आत्मस्वरूपाचे ज्ञान देणाऱ्या आचार्यांनीही मौन धारण केलेले आहे आणि आचार्यांचा उपदेश,
व्याख्यानही 'मौन' हेच आहे.
ईश्वरदर्शनाच्या इच्छेने एक मनुष्य एका साधु
पुरुषाकडे जातो आणि म्हणतो, "साधु महाराज ! मला ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे. तो कोठे आहे ? कसा आहे ? त्याचे स्वरूप काय आहे ? याचे ज्ञान हवे आहे." यावर साधु महाराज हसतात आणि शांत बसतात. हा मनुष्य आतुरतेने उत्तराची प्रतीक्षा करीत असतो.
पाच मिनिटे होतात. दहा मिनिटे होतात, पंधरा-वीस-पंचवीस-तीस-अर्धा तास
जातो. ही शांतता त्या मनुष्याला सहन होत नाही.
त्याचे शरीर, मन अस्वस्थ होते. तो वैतागून, चिडून पुन्हा विचारतो, "परमेश्वर
कोठे आहे ? याचे उत्तर मला हवे आहे."
यावर साधु पुरुष उत्तर देतात - "बाळा, तुझ्या प्रश्नाला माझ्या मौनामधून
मी तत्क्षणीच उत्तर दिलेले आहे. तुला ते समजले
नाही. त्याला मी काय करू ? मौन हेच परमेश्वराचे खरे स्वरूप आहे. परमेश्वर हा स्वतःच मौनस्वरूप आहे. मौन म्हणजेच शांती !"
Silence is the Truth. Truth is the
Silence. Awareful Silence is the nature
of myself. ज्यावेळी वाणीची व्यर्थ बडबड संपेल, वाणी, मन शांत होईल तेथेच परमेश्वराचे
अस्तित्व जाणवेल. तेथेच निरतिशय, नीरव शांतीचा,
आनंदाचा अनुभव येईल. म्हणूनच ज्ञानी पुरुष
हा मौनी, मौनस्वरूप म्हणजेच शांतस्वरूप, आनंदस्वरूप आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–