‘सत्य’ या शब्दाचा अर्थ भिन्न-भिन्न आहे. जो अपरा विद्येचा विषय कर्मफळाचे लक्षण सत्य
सांगितले, ते सत्य पारमार्थिक सत्य नसून सापेक्षित सत्य आहे. सत्य जरी म्हटले असेल, तरी सुद्धा ते सर्व कर्मफळ
नाशवान आणि अनित्य आहे. मग त्याला सत्य का
म्हटले ? अशी शंका येईल. यावर आचार्य सांगतात की, अविद्यावान
पुरुषाच्या दृष्टीने ते फळ सत्य आहे. त्याला
ते फळ सत्य वाटते. त्याच्याशिवाय दुसरे
काहीही सत्य नाही. ऐहिक भोग आणि पारलौकिक
भोगांनाच तो सत्य मानतो.
याठिकाणी सत्य हा शब्द परा विद्येचा विषय
आहे. ते पारमार्थिक, निरतिशय स्वरूपाचे
सत्य आहे. मग सत्य म्हणजे काय ? त्रिकाले अपि तिष्ठति इति सत् | - भूत, भविष्य, वर्तमान या तीन्हीही
काळांच्यामध्ये जे अस्तित्वामध्ये असते, ज्याचा कधीही, कोणत्याही कारणाने निरास
होऊ शकत नाही, त्याला ‘सत्’ म्हणतात. याउलट जे विचाराने निरास होते, जे
विवेकाने निरास होते, त्याला ‘असत्’ असे
म्हणतात. म्हणून इंग्रजीमध्ये फार सुंदर
म्हणतात – That which cannot stand for enquiry is unreal. ज्याचा ज्याचा निरास
होतो, ती प्रत्येक वस्तु मिथ्या आहे.
भगवान गीतेमध्ये सिद्धान्त मांडतात -
नासतो विद्यते भावो नाभवो विद्यते सतः |
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः
|| (गीता अ. २-१६)
असतः भावः न विद्यते | हा पहिला सिद्धान्त
आहे आणि दुसरा सिद्धान्त – सतः अभावः न विद्यते
| जी वस्तु असत्, मिथ्या आहे, त्या वस्तूला
कधीही सत्ता, वस्तुस्तिथि, अस्तित्व नसते आणि जी वस्तु सत् आहे, त्या वस्तूचा कधीही अभाव नसतो. म्हणजेच
सत्य वस्तु ही नित्य अस्तित्वामध्ये असते आणि असत्य वस्तु कधीही अस्तित्वामध्ये
नसते. म्हणून ती दिसली, भासली तरी
सुद्धा ती सत्य असेलच असे सांगता येत नाही. तर उलट जे जे दिसते, इंद्रियांना अनुभवायला
येते, मनाला, बुद्धीला जाणता येते, ते सर्वच विवेकाने निरास होते.
- "मुण्डकोपनिषत् " या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati,
1st Edition, March 2007
- हरी ॐ–