Tuesday, May 25, 2021

भोगप्रवृत्तीमुळे सर्वनाश | Sense Gratification Leads to Destruction



 

आजपर्यंत विश्वामध्ये विषयांचे स्वैर, उच्छृंखल उपभोग घेऊन कोणीही मनुष्य सुखी, आनंदी, कृतकृत्य झाला नाही.  तर उलट भोगांच्यामुळे मनुष्यजीवन अधःपतित झाल्याचे दिसते.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी भोगप्रवृत्ति निर्माण होते, त्यावेळी मनुष्य प्रथम त्या विषयांची प्राप्ति करतो आणि येथेच्छ उपभोग घेतो.  त्यानंतर दुसरी कामना निर्माण करून तीही पूर्ण करतो.  याप्रमाणे सतत एकामधून दुसरी, तिसरी अशा अनंत कामना निर्माण करतो.  

 

जर सरळ मार्गाने आपली कामना पूर्ण झाली नाही तर मनुष्य वाममार्गाचे, अधर्माचरणाचे अनुसरण करतो.  त्याचवेळी त्याच्या मनात स्वार्थ, असूया, द्वेष, कपट, मत्सर वगैरे वृत्ति, कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर येतात.  तो स्वतःची कामना पूर्ण करण्यासाठी, स्वार्थ पूर्ण करण्यासाठी धर्म, सदाचार, न्याय, नीति झुगारून देतो.  विकारवश होऊन निंद्य, निषिद्ध कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रकारे विषयभोग मनुष्यामधील न्यायनिष्ठा, धर्मनिष्ठा, आचार-विचार-उच्चार यांचा नाश करून त्याला अधःपतित, स्वैर, पशुतुल्य बनवितात.  

 

म्हणूनच आज भोगवादी, चंगळवादी असणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्यामध्ये एका बाजुला प्रचंड मोठी, बुद्धीला थक्क करणारी वैज्ञानिक प्रगति आहे.  एका बाजूला डोळे दीपवणारी भोगसाधने आहेत.  बटन दाबले की, हातात सर्वकाही मिळते.  परंतु दुसऱ्या बाजूला सर्वांचे अंतरंग कामक्रोधादि भस्मासुरांनी पोखरून काढले आहे.  भोगवाद मनुष्याला कधीच शांति देऊ शकत नाही.  भोगवादाची परिणती युद्धांच्यामध्ये व महायुद्धांच्यामध्ये होऊन अंतिम दुःखामध्ये, अशांतीमध्ये होते.  हेच जगाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाने सिद्ध केलेले आहे.  

 

म्हणूनच हे यमराजा !  तू कितीही उपभोग दिलेस तरी ते अनित्य व दुःखस्वरूप आहेत.  भोग भोगण्यासाठी कितीही दीर्घायुष्य दिलेस तरी ते मुळातच नाशवान असल्यामुळे अल्पच आहे.  भोग भोगून इंद्रियेही गलितगात्र, तेजोहीन होतात.  परलोकही नाशवान आहे.  पुण्यसंचयाने ब्रह्मलोकापर्यंत गेले तरी पुण्यक्षयानंतर पुन्हा मर्त्यलोकातच यावे लागणार, हे निश्चित आहे.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ