Showing posts with label Nature. Show all posts
Showing posts with label Nature. Show all posts

Tuesday, September 26, 2023

परमात्मस्वरूपाचा अनादर | Disrespect of My Nature

 



प्रत्येक जीवाचे खरे स्वरूप परमात्मस्वरूपच आहे.  परमात्मा दूर नसून आपले स्वतःचे स्वरूपच आहे.  परंतु मानवी शरीरामध्ये असलेले हे परमात्मस्वरूप मूढ, अविवेकी लोक अज्ञानाच्या आवरणामुळे जाणत नाहीत.  अहं शब्दाच्या लक्ष्यार्थाने निर्देशित केलेले माझे निरतिशय आनंद स्वरूप अज्ञानी लोक जाणत नाहीत.  याचे कारण अज्ञानाच्या आवरणामुळे बुद्धि भ्रमिष्ट होऊन अहंकाराच्या उन्मादामुळे त्यांना सद्गुरूंचा संग मिळत नाही.  त्यामुळे गुरुमुखामधून शास्त्राचे श्रवण करण्याची संधी त्यांना मिळत नाही.  त्यामुळे ते अज्ञानी लोक स्वबुद्धीला प्रमाण मानत असल्यामुळे ते प्रत्यक्ष, इंद्रियगोचर आहे त्यालाच सत्यत्व देतात.

 

शरीर, इंद्रियांच्या अतीत असलेले तसेच मन आणि बुद्धीच्याही अतीत असलेले स्वतःचे स्वरूप जाणत नाही.  इतकेच नव्हे तर, त्यांच्या हृदयामध्ये असलेले माझे अस्तित्व सुद्धा मान्य करीत नाहीत.  हाच माझा अनादर आहे, तिरस्कार आहे.  याच अज्ञानामुळे देहादि सर्व अनात्म्याचे धर्म माझ्यावर आरोपित करून जो “मी नाही” तो “मी आहे” असे म्हणतात.  अमानवी असणाऱ्या मला मानव म्हणून पाहतात.  जन्ममृत्युरहित असून सुद्धा जन्ममृत्यूने मर्यादित करतात.  “मी कर्ता”, “मी भोक्ता” असे समजतात.  “मी लहान आहे”, “मी मोठा आहे”, “मी अज्ञानी आहे”, “मी पापी आहे”, “मी बहिरा आहे”, मी आंधळा आहे”, “मी लंगडा आहे”, “मी म्हातारा आहे”, “मी मेलो” याप्रमाणे विपरीत भाव निर्माण करतात.

 

मानवी शरीराचा आश्रय घेऊन मी अवतार घेत असल्यामुळे अज्ञानी जीव फक्त माझे मानवी शरीरच पाहतात.  त्यापलीकडे असलेले जन्ममृत्युरहित, नित्य, कूटस्थ, असंग, निरुपाधिक सच्चिदानंद स्वरूप जाणत नाहीत.  ते शरीरालाच सत्यत्व देत असल्यामुळे माझ्या सगुण रुपालाच महत्व देतात.  मी शरीराने अन्य जीवांच्यासारखा असल्यामुळे त्यांच्यामधीलच मी एक आहे असे मानतात.  त्यामुळे माझे – परमेश्वराचे स्वरूप न जाणता एक मानव आहे असेच म्हणतात.  मला मानवी शरीराने मर्यादित करतात.  यामुळे त्या अवतारामधील ईश्वरत्व न पाहाता मनुष्यत्व पाहिले जाते.  मनुष्यत्व पाहिले की तेथे रागद्वेष आपोआपच निर्माण होतात.  सर्व मानवी मर्यादा येतात.  यामुळे अवतारामध्ये परमेश्वराला किंवा अवतारी पुरुषाला सुद्धा आपण कमी लेखतो.  त्याची अवहेलना, निंदा करतो.  तिरस्कार करतो.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 26, 2017

प्रकृती आणि परमात्मा | Nature and the Supreme Being



त्रिगुणात्मक प्रकृति, त्या प्रकृतीमधून निर्माण होणारी कर्मे व त्यांची सुखदुःखादि फळे या सर्वांचा परमात्मा “साक्षी” आहे.  तो स्वतः काहीच करीत नाही. त्यामध्ये कर्तृत्व-कारयितृत्व, सुखदुःख, पापपुण्यात्मक कर्म-कर्मफळ काहीच नाही.  तर तो स्वतः अविकारी स्वरूपाचा असून कूटस्थसाक्षीचैतन्यस्वरूपाने राहातो.  काय करावे व काय करू नये हे तो ठरवीत नसून प्रकृतीलाच सर्व काही स्वातंत्र्य आहे.  तो या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या सर्व व्यापारापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी आहे.  

नाटकदीपवत् |  नाटकगृहातील दीप जसा नाटकामधील सर्व प्रसंगांचा साक्षी असतो.  तो कोणत्याही प्रसंगाने, घटनेने स्पर्शित, लिप्त न होता अखंडपणे प्रकाशस्वरूपाने, साक्षीस्वरूपाने राहातो.  परमात्मा हा प्रकृतीच्या सर्व क्रिया चालू असतील तरी स्वतः मात्र अविकारी, उपद्रष्टा राहातो. स्वस्वरूपामध्ये अनायासाने, सुखाने, काहीही न करता व न करविता स्वस्थ राहातो.  जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे, हे सिद्ध होते.  ही अविद्यालक्षणाने युक्त असलेली त्रिगुणात्मक प्रकृति सर्व जीवांच्या अंतःकरणावर अज्ञानाचे आवरण घालते.  यामुळे मोहीत झालेले सर्व जीव कर्मप्रवृत्त होवून कर्म-कर्मफळामध्ये बद्ध होतात.  

भगवान म्हणतात – दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |  (गीता अ. ७-१४)
हे अर्जुना  !  या त्रिगुणात्मक असणाऱ्या माझ्या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे.  ही दैवी म्हणजेच ईश्वराची माया, योगमाया अलौकिक, अनाकलनीय आहे.  ही मायाशक्ति विश्वाची, सर्व जीवांची निर्मिती करते, त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण घालून अनेक प्रकारचे मोह निर्माण करून जीवांना भुरळ पाडते.  हीच माया जीवाच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, रागद्वेष, कामक्रोधादि विकार निर्माण करते.  जीवाला विषयाभिमुख व विषयासक्त करून बंधनामध्ये अडकविते.  म्हणजे स्वभावच जीवाला संकल्प निर्माण करून कर्मप्रवृत्त करतो व कर्मफळाने बद्ध करतो.  परंतु आत्मा मात्र प्रकृतीचा, प्रकृतीच्या गुणांचा, सर्व कर्मांचा, कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सुखदुःखादि अनुभवांचा साक्षी आहे.  तो या कशानेही बद्ध, स्पर्शित होत नाही.  तो नित्य, अविकारी स्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, February 14, 2017

स्वातंत्र्य आणि प्रकृतीचा स्वभाव | Freedom and Force of Own Nature


प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुरूप त्या त्या कर्माचे फळ – सुखदुःख अनुभवण्यासाठी जन्माला येतो.  यामुळे जीवन जगत असताना त्याला स्वातंत्र्य असेल तरी सर्व व्यवहार त्याच्या वासना नियमित करतात.  उदा.  एखादी गाय खुंटीला बांधली असेल तरी दोर जितका लांब आहे तितक्याच अंतरापर्यंत ती भ्रमण करू शकेल.  तितकेच तिला स्वातंत्र्य आहे.  परंतु नकळत तो दोर गायीच्या स्वातंत्र्यावर नियमन करीत असतो.  ती गाय एका ठराविक सीमेच्या पलीकडे जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येक जीव आपापले संस्कार घेऊन जन्माला येतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतो.  सर्व विश्व त्याचे परिभ्रमणाचे क्षेत्र आहे.  कोठे जावे आणि काय करावे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.  परंतु नकळत त्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या स्वातंत्र्यावर नियमन करतो.  कोठे जावे किंवा जाऊ नये, काय करावे किंवा करू नये हे प्रत्येक मनुष्य त्याच्या विचाराने ठरवीत असेल तरी सुद्धा त्याचे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणेच तो कर्म करतो.

म्हणून भगवान म्हणतात की, सर्व भूतमात्र अनेक प्रकारच्या कर्मांचे कारण असलेल्या रागद्वेषात्मक प्रकृतीला प्राप्त होतात आणि रागद्वेषांच्या संस्कारानुरूप अनेक प्रकारचा व्यापार-चेष्टा व्यवहार करतात.  यामुळे प्रकृतीच्या अधीन असलेले हे सर्व प्राणी एक क्षणभर सुद्धा तूष्णी म्हणजे शांत अवस्थेमध्ये राहू शकत नाहीत.  प्रत्येक जीव त्याच्या स्वभावाप्रमाणे जातो.  कितीही चांगल्या वातावरणामध्ये एखाद्याला ठेवले तरी सुद्धा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो.  कितीही समजावून सांगितले किंवा विनवण्या केल्या तरी त्याला समजत नाही. तो डोळ्याने पाहातो एक आणि समजतो फार वेगळेच !  यात कोणाचा दोष आहे ?  अन्य व्यक्तीला दोष देवून काय उपयोग ?  दोष असेल तर तो त्याच्या स्वतःच्या स्वभावाचा आहे.  त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा आहे.  तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागणार !  एकाच प्रसंगामध्ये दोन व्यक्ति असतील तरी दोघांच्या प्रतिक्रिया भिन्नभिन्न असतात, कारण प्रत्येकाची प्रकृति भिन्नभिन्न स्वभावाची आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ