Tuesday, December 26, 2017

प्रकृती आणि परमात्मा | Nature and the Supreme Beingत्रिगुणात्मक प्रकृति, त्या प्रकृतीमधून निर्माण होणारी कर्मे व त्यांची सुखदुःखादि फळे या सर्वांचा परमात्मा “साक्षी” आहे.  तो स्वतः काहीच करीत नाही. त्यामध्ये कर्तृत्व-कारयितृत्व, सुखदुःख, पापपुण्यात्मक कर्म-कर्मफळ काहीच नाही.  तर तो स्वतः अविकारी स्वरूपाचा असून कूटस्थसाक्षीचैतन्यस्वरूपाने राहातो.  काय करावे व काय करू नये हे तो ठरवीत नसून प्रकृतीलाच सर्व काही स्वातंत्र्य आहे.  तो या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या सर्व व्यापारापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी आहे.  

नाटकदीपवत् |  नाटकगृहातील दीप जसा नाटकामधील सर्व प्रसंगांचा साक्षी असतो.  तो कोणत्याही प्रसंगाने, घटनेने स्पर्शित, लिप्त न होता अखंडपणे प्रकाशस्वरूपाने, साक्षीस्वरूपाने राहातो.  परमात्मा हा प्रकृतीच्या सर्व क्रिया चालू असतील तरी स्वतः मात्र अविकारी, उपद्रष्टा राहातो. स्वस्वरूपामध्ये अनायासाने, सुखाने, काहीही न करता व न करविता स्वस्थ राहातो.  जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे, हे सिद्ध होते.  ही अविद्यालक्षणाने युक्त असलेली त्रिगुणात्मक प्रकृति सर्व जीवांच्या अंतःकरणावर अज्ञानाचे आवरण घालते.  यामुळे मोहीत झालेले सर्व जीव कर्मप्रवृत्त होवून कर्म-कर्मफळामध्ये बद्ध होतात.  

भगवान म्हणतात – दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |  (गीता अ. ७-१४)
हे अर्जुना  !  या त्रिगुणात्मक असणाऱ्या माझ्या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे.  ही दैवी म्हणजेच ईश्वराची माया, योगमाया अलौकिक, अनाकलनीय आहे.  ही मायाशक्ति विश्वाची, सर्व जीवांची निर्मिती करते, त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण घालून अनेक प्रकारचे मोह निर्माण करून जीवांना भुरळ पाडते.  हीच माया जीवाच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, रागद्वेष, कामक्रोधादि विकार निर्माण करते.  जीवाला विषयाभिमुख व विषयासक्त करून बंधनामध्ये अडकविते.  म्हणजे स्वभावच जीवाला संकल्प निर्माण करून कर्मप्रवृत्त करतो व कर्मफळाने बद्ध करतो.  परंतु आत्मा मात्र प्रकृतीचा, प्रकृतीच्या गुणांचा, सर्व कर्मांचा, कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सुखदुःखादि अनुभवांचा साक्षी आहे.  तो या कशानेही बद्ध, स्पर्शित होत नाही.  तो नित्य, अविकारी स्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

No comments:

Post a Comment