Tuesday, February 14, 2017

स्वातंत्र्य आणि प्रकृतीचा स्वभाव | Freedom and Force of Own Nature


प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुरूप त्या त्या कर्माचे फळ – सुखदुःख अनुभवण्यासाठी जन्माला येतो.  यामुळे जीवन जगत असताना त्याला स्वातंत्र्य असेल तरी सर्व व्यवहार त्याच्या वासना नियमित करतात.  उदा.  एखादी गाय खुंटीला बांधली असेल तरी दोर जितका लांब आहे तितक्याच अंतरापर्यंत ती भ्रमण करू शकेल.  तितकेच तिला स्वातंत्र्य आहे.  परंतु नकळत तो दोर गायीच्या स्वातंत्र्यावर नियमन करीत असतो.  ती गाय एका ठराविक सीमेच्या पलीकडे जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येक जीव आपापले संस्कार घेऊन जन्माला येतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतो.  सर्व विश्व त्याचे परिभ्रमणाचे क्षेत्र आहे.  कोठे जावे आणि काय करावे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.  परंतु नकळत त्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या स्वातंत्र्यावर नियमन करतो.  कोठे जावे किंवा जाऊ नये, काय करावे किंवा करू नये हे प्रत्येक मनुष्य त्याच्या विचाराने ठरवीत असेल तरी सुद्धा त्याचे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणेच तो कर्म करतो.

म्हणून भगवान म्हणतात की, सर्व भूतमात्र अनेक प्रकारच्या कर्मांचे कारण असलेल्या रागद्वेषात्मक प्रकृतीला प्राप्त होतात आणि रागद्वेषांच्या संस्कारानुरूप अनेक प्रकारचा व्यापार-चेष्टा व्यवहार करतात.  यामुळे प्रकृतीच्या अधीन असलेले हे सर्व प्राणी एक क्षणभर सुद्धा तूष्णी म्हणजे शांत अवस्थेमध्ये राहू शकत नाहीत.  प्रत्येक जीव त्याच्या स्वभावाप्रमाणे जातो.  कितीही चांगल्या वातावरणामध्ये एखाद्याला ठेवले तरी सुद्धा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो.  कितीही समजावून सांगितले किंवा विनवण्या केल्या तरी त्याला समजत नाही. तो डोळ्याने पाहातो एक आणि समजतो फार वेगळेच !  यात कोणाचा दोष आहे ?  अन्य व्यक्तीला दोष देवून काय उपयोग ?  दोष असेल तर तो त्याच्या स्वतःच्या स्वभावाचा आहे.  त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा आहे.  तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागणार !  एकाच प्रसंगामध्ये दोन व्यक्ति असतील तरी दोघांच्या प्रतिक्रिया भिन्नभिन्न असतात, कारण प्रत्येकाची प्रकृति भिन्नभिन्न स्वभावाची आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment