Showing posts with label Doubt. Show all posts
Showing posts with label Doubt. Show all posts

Tuesday, December 5, 2023

तीन प्रकारच्या शंका | Three Types of Doubts

 



प्रामुख्याने शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या शंका किंवा संशय सांगितले जातात.  प्रमाणशंका, प्रमेयशंका आणि प्रमाशंका.  जे लौकिक आणि मूर्ख अज्ञानी लोक आहेत, त्यांना मरेपर्यंत सारख्याच क्षणाक्षणाला शंका निर्माण होतात.  त्यांचे मन सतत संशययुक्त असते.  स्वतःच्या बुद्धीला शास्त्र समजत नाही, कारण वेदांतशास्त्र हे बुद्धीच्याही अतीत आहे.  त्यामुळे असा मनुष्य वेदांतशास्त्राबद्दलच शंका घेतो.  त्याला हे शास्त्र अत्यंत रुक्ष, बोजड, अवघड वाटते.  त्याला त्या वेदांतशास्त्रामध्ये काही रस वाटत नाही, कारण त्याने कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो.  आपली बुद्धि अत्यंत प्राकृत आणि स्थूल आहे.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे जे डोळ्यांना दिसते, तेच फक्त सत्य अशी सवय लागल्यामुळे मनावर तेच संस्कार झालेले आहेत.  मनुष्य स्वतःचे म्हणणे सोडायला कधीही तयार नसतो.

 

दुसरी शंका म्हणजे प्रमेयविषयक शंका होय.  प्रमेय म्हणजेच या शास्त्रामाधून प्रतिपादित केलेला जो ज्ञेय विषय आत्मा, याबद्दलच अनेक शंका आहेत.  आत्मा अस्ति न वा |  आत्मा खरोखरच आहे की नाही ?  वर्षानुवर्षे आत्मस्वरूपाचे ज्ञान घेतात आणि आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका विचारतात.  अशा लोकांना कधीही शांति, समाधान प्राप्त होत नाही.  

भगवान म्हणतात – संशयात्मा विनश्यति |              (गीता अ. ४-४०)

संशयी पुरुषाचा नाश होतो.  त्याला आत, अंतरंगामध्ये स्थिरता, शांति आणि समाधान मिळत नाही.  याचे कारण श्रद्धेचा अभाव आहे.

 

आणि तिसरी शंका म्हणजेच प्रमाविषयक शंका होय.  प्रमा म्हणजेच ज्ञान.  साधकाला आत्मज्ञानाविषयीच शंका निर्माण होतात.  “खरोखरच या ज्ञानाने मला मोक्ष मिळेल का ?  या ज्ञानाचे फळ निरतिशय आनंदाची प्राप्ति मला होईल का ?  या ज्ञानामध्ये इतके सामर्थ्य आहे का ?”  अशा शंका निर्माण होतात.  परंतु शास्त्रकार सांगतात – आत्मज्ञान हे स्वतःच फलस्वरूप आहे.  हे ज्ञान श्रवण करीत असतानाच त्याचा अनुभव येतो.  मन जर शुद्ध, परिपक्व, रागद्वेषरहित असेल, एकाग्र, तल्लीन, तन्मय जर असेल, तर ज्ञानाची अनुभूति श्रवण करतानाच आली पाहिजे, इतके या ज्ञानाचे सामर्थ्य आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, August 8, 2023

कुतूहल आणि विकल्प | Curiosity & Doubtfulness

 



अज्ञानी लोक सतत विषयचिंतन करीत असल्यामुळे प्रत्येक विषयाबद्दल त्यांच्या मनात नको इतकी जिज्ञासा आणि कुतूहल असते.  हे काय ?  ते काय ?  येथे नवीन काय मिळते ?  तेथे काय मिळते ?  नवीन प्रकार, नवीन फॅशन हे शोधण्यातच त्यांचे आयुष्य जाते.  याउलट ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये विषयांचे थोडेही कौतुक नसते.  त्याच्यासमोर काहीही ठेवा, तो त्या विषयाचा आवश्यक तितका उपयोग करेल आणि नंतर तो विषय बाजूला ठेवून देईल.  याचे कारण त्याला निश्चित माहीत असते की, विश्वामध्ये जे जे दृश्य व निर्मित आहे ते सर्वच नाशवान, अनित्य व मिथ्या स्वरूपाचे आहे.  एक ना एक दिवस हे सर्व नष्ट होणार आहे.  म्हणून त्याला कोणत्याही विषयाचे आकर्षण वाटत नाही.  विषय असतील तरी आणि नसतील तरी तो आनंदाने राहतो.

 

अज्ञानी मनुष्याच्या मनात मात्र सतत सर्व शंकाच असतात.  ईश्वर, गुरु, शास्त्र, स्वतःचे जीवन, दुसरी माणसे अशा सर्वांच्याविषयी शंका असतात.  खरेच ईश्वर आहे का ?  असेल तर कोठे आहे ?  कसा आहे ?  वेदशास्त्र खरे आहे का ?  हे गुरु मला ज्ञान देऊ शकतील का ?  मी हे करू शकेन का ?  ही व्यक्ति चांगली आहे की वाईट आहे ?  आता मी काय करावे ?  हे करावे की करू नये ?  अशा एक नव्हे दोन नव्हे, तर अनेक शंका क्षणाक्षणाला अज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात.  या शंका, विकल्प, संशय त्याला स्वस्थ बसू देत नाहीत.  तो सतत अस्थिर, उद्विग्न व विक्षिप्त असतो.  शेवटी या संशयी पुरुषाचा विनाश होतो.

 

ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये मात्र शास्त्र, ईश्वर, गुरु यांच्याबद्दल एकही विकल्प किंवा शंका नसते.  त्यामुळे तो नितांत श्रद्धेने गुरुमुखातून शास्त्राचे श्रवण करतो.  अनन्य भक्तीच्या भावाने ईश्वराला शरण जाऊन ईश्वरावर निर्भर होऊन राहतो.  यामुळे तत्त्वाचे स्वरूप त्यालाच यथार्थ, सम्यक व निःसंशय समजलेले असते.  यथार्थ ज्ञानामुळे त्याला परमपदाचा साक्षात् अनुभव येतो.  म्हणून ज्ञानी लोक विश्वामध्ये एखाद्या सम्राटाप्रमाणे राहतात.  ब्रह्मा-विष्णु-महेश ज्याप्रमाणे आप्तकाम-पूर्णकाम होऊन राहतात, तसेच हे ज्ञाननिष्ठ, नरोत्तम पुरुष या जगतामध्ये राहतात.  त्यांची बुद्धि ज्ञानाने अत्यंत विशुद्ध झाल्यामुळेच ते आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर होतात.  स्वस्वरूपाच्या साम्राज्यावर ते आरूढ होतात.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Monday, July 9, 2018

छिन्नद्वैधा | Going Beyond the Doubts




शास्त्राचे श्रवण केल्यानंतर मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत असतात.  प्रथम आत्म्याच्या अस्तित्वाविषयीच शंका येते.  आत्मा आहे की नाही?  आत्मा आहे असे मानले तर त्यावर पुन्हा शंका येते.  आत्मा असेल तर तो चैतन्यस्वरूप आहे की जडस्वरूप आहे?  चैतन्यस्वरूप असेल तर तो नित्य आहे की अनित्य आहे?  तो नित्य आहे असे मानले तर तो देह-इंद्रिय-प्राण-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान या सर्वांपासून भिन्न आहे की अभिन्न आहे?  समजा, आत्मा हा या देहादिपासून भिन्न आहे, असे मानले तर त्याचा देहादि उपाधीशी संबंध आहे की नाही?  देहादि उपाधीशी त्याचा संबंध नाही असे मानले तर तो कर्तृत्वादि धर्मांनी युक्त आहे की नाही?  तो आत्मा कर्ता-भोक्ता नाही, असे मानले तरी तो स्वतः असंग स्वरूपाचा आहे की नाही?  तो असंग आहे असे मानले तर देहादि उपाधीने केलेल्या कर्माने तो लिप्त, स्पर्शित होतो की नाही?  तो सर्व कर्मांच्यापासून अभिन्न आहे की नाही?  

आत्मा ब्रह्मस्वरूपापासून अभिन्न असेल तर माझ्यामध्ये जीवब्रम्हात्मैक्य ज्ञान उदयाला आले आहे की नाही?  जर हे ज्ञान उत्पन्न झाले असेल तर ते यथार्थ आहे की नाही?  समजा, हे ज्ञान यथार्थ आहे असे मानले तर ते ज्ञान मुक्तीचे साधन आहे की नाही?  समजा, ते ज्ञान मोक्षसाधन आहे असे मानले तरी सुद्धा त्या ज्ञानप्राप्तीनंतर मला जीवनमुक्ति आहे की नाही?  समजा, त्या ज्ञानाने मी मुक्त झालो तरी या शरीराचा नाश झाल्यानंतर मला विदेहकैवल्यावस्था आहे की नाही?  म्हणजेच मला पुनर्जन्म आहे की नाही?  

अशा प्रकारचे अनेक, अनंत संशय आहेत.  हे सर्व संशय ज्ञानाने नष्ट होवून त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचे ज्ञान यथार्थ, सम्यक, संशयविपर्यरहित होते.  तेच यति या जीवनामध्ये जीवन्मुक्तावस्था प्राप्त करतात आणि शरीरपातानंतर विदेहकैवल्यावस्था प्राप्त करतात.  ब्रम्हात्मैक्यज्ञानामुळे अज्ञानजन्य असणाऱ्या सर्व कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सर्व संचित, आगामी कर्मांचा नाश होतो.  श्रुति म्हणते – जीवब्रम्हात्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होवून जीव मुक्त होतो.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ