प्रामुख्याने शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या
शंका किंवा संशय सांगितले जातात. प्रमाणशंका,
प्रमेयशंका आणि प्रमाशंका. जे लौकिक
आणि मूर्ख अज्ञानी लोक आहेत, त्यांना मरेपर्यंत सारख्याच क्षणाक्षणाला शंका
निर्माण होतात. त्यांचे मन सतत संशययुक्त
असते. स्वतःच्या बुद्धीला शास्त्र
समजत नाही, कारण वेदांतशास्त्र हे बुद्धीच्याही अतीत आहे. त्यामुळे असा मनुष्य वेदांतशास्त्राबद्दलच शंका
घेतो. त्याला हे शास्त्र अत्यंत रुक्ष, बोजड,
अवघड वाटते. त्याला त्या वेदांतशास्त्रामध्ये
काही रस वाटत नाही, कारण त्याने कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो. आपली बुद्धि अत्यंत प्राकृत आणि स्थूल आहे. यत् दृष्टं तत् सत्यम् | जे जे डोळ्यांना दिसते, तेच फक्त सत्य अशी सवय लागल्यामुळे मनावर तेच संस्कार
झालेले आहेत. मनुष्य स्वतःचे म्हणणे
सोडायला कधीही तयार नसतो.
दुसरी शंका म्हणजे प्रमेयविषयक शंका होय. प्रमेय म्हणजेच या शास्त्रामाधून प्रतिपादित
केलेला जो ज्ञेय विषय आत्मा, याबद्दलच अनेक शंका आहेत. आत्मा अस्ति न वा | आत्मा खरोखरच आहे की नाही ? वर्षानुवर्षे
आत्मस्वरूपाचे ज्ञान घेतात आणि आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका विचारतात. अशा लोकांना कधीही शांति, समाधान प्राप्त होत
नाही.
भगवान म्हणतात – संशयात्मा
विनश्यति | (गीता
अ. ४-४०)
संशयी पुरुषाचा नाश होतो. त्याला आत, अंतरंगामध्ये स्थिरता, शांति आणि
समाधान मिळत नाही. याचे कारण श्रद्धेचा
अभाव आहे.
आणि तिसरी शंका म्हणजेच प्रमाविषयक शंका
होय. प्रमा म्हणजेच ज्ञान. साधकाला आत्मज्ञानाविषयीच शंका निर्माण होतात. “खरोखरच या ज्ञानाने मला मोक्ष मिळेल का ? या ज्ञानाचे फळ निरतिशय आनंदाची प्राप्ति मला
होईल का ? या ज्ञानामध्ये इतके सामर्थ्य
आहे का ?” अशा शंका निर्माण होतात. परंतु शास्त्रकार सांगतात – आत्मज्ञान हे
स्वतःच फलस्वरूप आहे. हे ज्ञान श्रवण करीत
असतानाच त्याचा अनुभव येतो. मन जर
शुद्ध, परिपक्व, रागद्वेषरहित असेल, एकाग्र, तल्लीन, तन्मय जर असेल, तर ज्ञानाची अनुभूति श्रवण करतानाच
आली पाहिजे, इतके या ज्ञानाचे सामर्थ्य आहे.
- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- हरी ॐ–