Tuesday, August 8, 2023

कुतूहल आणि विकल्प | Curiosity & Doubtfulness

 अज्ञानी लोक सतत विषयचिंतन करीत असल्यामुळे प्रत्येक विषयाबद्दल त्यांच्या मनात नको इतकी जिज्ञासा आणि कुतूहल असते.  हे काय ?  ते काय ?  येथे नवीन काय मिळते ?  तेथे काय मिळते ?  नवीन प्रकार, नवीन फॅशन हे शोधण्यातच त्यांचे आयुष्य जाते.  याउलट ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये विषयांचे थोडेही कौतुक नसते.  त्याच्यासमोर काहीही ठेवा, तो त्या विषयाचा आवश्यक तितका उपयोग करेल आणि नंतर तो विषय बाजूला ठेवून देईल.  याचे कारण त्याला निश्चित माहीत असते की, विश्वामध्ये जे जे दृश्य व निर्मित आहे ते सर्वच नाशवान, अनित्य व मिथ्या स्वरूपाचे आहे.  एक ना एक दिवस हे सर्व नष्ट होणार आहे.  म्हणून त्याला कोणत्याही विषयाचे आकर्षण वाटत नाही.  विषय असतील तरी आणि नसतील तरी तो आनंदाने राहतो.

 

अज्ञानी मनुष्याच्या मनात मात्र सतत सर्व शंकाच असतात.  ईश्वर, गुरु, शास्त्र, स्वतःचे जीवन, दुसरी माणसे अशा सर्वांच्याविषयी शंका असतात.  खरेच ईश्वर आहे का ?  असेल तर कोठे आहे ?  कसा आहे ?  वेदशास्त्र खरे आहे का ?  हे गुरु मला ज्ञान देऊ शकतील का ?  मी हे करू शकेन का ?  ही व्यक्ति चांगली आहे की वाईट आहे ?  आता मी काय करावे ?  हे करावे की करू नये ?  अशा एक नव्हे दोन नव्हे, तर अनेक शंका क्षणाक्षणाला अज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात.  या शंका, विकल्प, संशय त्याला स्वस्थ बसू देत नाहीत.  तो सतत अस्थिर, उद्विग्न व विक्षिप्त असतो.  शेवटी या संशयी पुरुषाचा विनाश होतो.

 

ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये मात्र शास्त्र, ईश्वर, गुरु यांच्याबद्दल एकही विकल्प किंवा शंका नसते.  त्यामुळे तो नितांत श्रद्धेने गुरुमुखातून शास्त्राचे श्रवण करतो.  अनन्य भक्तीच्या भावाने ईश्वराला शरण जाऊन ईश्वरावर निर्भर होऊन राहतो.  यामुळे तत्त्वाचे स्वरूप त्यालाच यथार्थ, सम्यक व निःसंशय समजलेले असते.  यथार्थ ज्ञानामुळे त्याला परमपदाचा साक्षात् अनुभव येतो.  म्हणून ज्ञानी लोक विश्वामध्ये एखाद्या सम्राटाप्रमाणे राहतात.  ब्रह्मा-विष्णु-महेश ज्याप्रमाणे आप्तकाम-पूर्णकाम होऊन राहतात, तसेच हे ज्ञाननिष्ठ, नरोत्तम पुरुष या जगतामध्ये राहतात.  त्यांची बुद्धि ज्ञानाने अत्यंत विशुद्ध झाल्यामुळेच ते आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर होतात.  स्वस्वरूपाच्या साम्राज्यावर ते आरूढ होतात.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ