Showing posts with label Composure. Show all posts
Showing posts with label Composure. Show all posts

Tuesday, August 1, 2017

मनाचे औदसीन्य – भाग २ | Composure of Mind – Part 2


‘औदासीन्य’ याचा दुसरा अर्थ – दोन पक्षात परस्परविरोधी मतप्रणाली असताना साधकाने पूर्ण औदासीन्य म्हणजे तटस्थ वृत्ति ठेवावी.  कोणत्याही वृत्तीच्या आहारी जाऊ नये.  म्हणजे कोणत्याच पक्षाची बाजू घेऊ नये.  वितंडवादात भाग घेऊ नये कारण कोणतीही गोष्ट पूर्ण योग्य किंवा पूर्ण अयोग्य आहे हे परमेश्वरालाही ठरविता येणे अशक्य आहे.  कोणत्या निकषावर योग्य अयोग्य ठरविणार ?  

स्थल, काल आणि व्यक्तिपरत्वे प्रत्येक गोष्टीबाबत योग्य अयोग्याच्या कल्पना बदलत जातात.  म्हणूनच आपले स्वतःचे मत प्रदर्शित केले, तर ते मत एका पक्षाला प्रिय तर दुसऱ्या पक्षाला अप्रिय होते.  त्यातून कधीही न संपणारा वितंडवाद चालू राहतो.  तेवढ्यासाठी तटस्थवृत्तीने Wait and watch हे ब्रीदवाक्य साधकाने डोळ्यासमोर ठेवावे.  Let it happen and allow things to happen या दृष्टिकोनातून उदासीन वृत्ति ठेवावी.  

अशी उदासीन वृत्ति ठेवली नाही, तर त्यातून साधकाच्या मनात रागद्वेष निर्माण होतात.  वादातून कोणताच बोघ न होता उलट वितंडवाद सुरु होतो व त्यातून क्रोध निर्माण होऊन त्याच्या मनाचा तोल सुटतो.  आपण कोणाला, कुठे, काय बोलत आहोत ?  याचे तारतम्य साधकाला राहणार नाही.  त्याहीपुढे काम, क्रोध इत्यादि विकारांबरोबर वाहात जाऊन विनाकारण मनाची चंचलता, क्षोभ वाढतात.  



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ –


Tuesday, July 25, 2017

मनाचे औदसीन्य – भाग १ | Composure of Mind – Part 1


औदासीन्यमभिप्स्यताम् |  
साधकामध्ये भावनावशतेने औदासीन्याचा उद्रेक नसावा.  औदासीन्य हा साधकाचा स्थायी भाव झाला पाहिजे. त्यासाठी त्याने सतत अभ्यास करावा.  उदासीन वृत्ति म्हणजे समतोल वृत्ति होय !  उदासीनवृत्ति म्हणजे सुतकीपणा (Indifference) नव्हे.  सुखदुःखाच्या अनुभवात Indifferent राहणे नव्हे, कारण सुखदुःखाचे आघात मृत्युपर्यंत होताच राहणार.  मनुष्याला सुखदुःखामुळे अनुक्रमे हर्ष व विषाद सतत अनुभवाला येतात.  दोन विरोधी वृत्तीत मन सतत हेलकावे खात रहाते.  प्रसंग कधीच टाळता येत नाहीत, बदलता येत नाहीत किंवा थांबविताही येत नाहीत.  माणसे व प्रसंग हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.

म्हणून साधकाचा पुरुषार्थ काय ?  मनाच्या आंदोलनातून, खाली-वर होणाऱ्या हेलकाव्यातून त्याने मुक्त व्हावे यासाठी साधना आहे.  साधकाने हर्ष व विषाद या विकारांच्या आहारी न जाता उदासीन राहण्याचा अभ्यास केला पाहिजे.  त्यासाठी त्या प्रसंगांना खुबीने व चातुर्याने तोंड दिले पाहिजे.  सतत तटस्थ राहण्याचा अभ्यास केला पाहिजे.  सर्व प्रकारच्या प्रसंगात समत्वबुद्धि ठेवण्याचा अभ्यास केला पाहजे.  मनाची समतोल वृत्ति हीच खरी परिपक्वता आहे.  

श्रवण, मनन साधनेतही चांगले व वाईट प्रसंग येणारच.  परमेश्वर साधकांच्या श्रद्धेची परीक्षा घेतो.  जे श्रद्धा, भक्ति, निष्ठेच्या जोरावर कोणत्याच प्रसंगाने विचलित होत नाहीत, तेच साधक पुढे जातात.  एकापेक्षा एक जास्त बिकट प्रसंग हे साधकाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी लावलेले Filters आहेत.  चोहोबाजूंनी संकटांनी घेरले जाऊनही जो साधक आत्मज्ञानप्राप्तीपासून जराही परावृत्त होत नाही तोच आत्मविद्येसाठी अधिकारी होतो, कारण संकटातही त्याची परमेश्वर व जीवन यावरील दृढ श्रद्धा टिकून रहाते.  

साधकाने दुःख निवारणार्थ परमेश्वराला प्रार्थना करू नये.  प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता जबरदस्त आत्मबलाने व आनंदाने हसत जीवनात पुढे जाणे हीच साधकाला साधना करावयाची आहे.  हे मनाचे सामर्थ्य हा त्याचा स्वभाव बनला पाहिजे.  त्याने मनाची तटस्थ व अलिप्त वृत्ति आत्मसात केली पाहिजे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ –