Showing posts with label Alertness. Show all posts
Showing posts with label Alertness. Show all posts

Tuesday, September 20, 2016

वासनांचा क्षय कसा करायचा? | How to Reduce Stored Desires?


‘वासना’ म्हणजे काय ?  मागचा पुढचा सारासार विचार न करता सहज स्वाभाविक उत्स्फूर्त निर्माण होणाऱ्या दंभदर्पादि वृत्तींचे जे कारण ते म्हणजे चित्तामध्ये असलेले संस्कार होत.  या संस्कारांनाच ‘वासना’ म्हणतात.

ज्यावेळी बुद्धि सावधान, दक्ष असते त्यावेळी सारासार विवेक जाणीवपूर्वक केला जातो.  त्यामुळे चित्तामध्ये सुप्त असलेल्या कामक्रोधादि वृत्ति व्यक्त होत नाहीत.  सावधानता आणि विवेकयुक्त बुद्धि कामक्रोधादि वृत्तींना व्यक्त होऊ देत नाही.  परंतु बुद्धीतील विवेक, अंतरिक जाणीव आणि सावधानता कमी होते, त्यावेळी पूर्वाभ्यासाने संस्काररूपाने चित्तामध्ये संग्रहित केलेल्या सुप्त वासना उफाळून वर येतात आणि कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींच्या रूपाने व्यक्त होतात.  यामुळे चित्तामध्ये विक्षेप, क्षोभ, संताप निर्माण होऊन निदिध्यासनेमध्ये प्रतिबंध निर्माण करतात.  म्हणून साधकाने या आसुरी वासनांचा क्षय करण्याचा सतत अभ्यास केला पाहिजे.  म्हणजेच ‘मनोनाश’ केला पाहिजे.

म्हणून साधकाने चित्ताची उपशमा करण्यासाठी प्रथम दंभदर्पादि वृत्तींचे कारण म्हणजेच आसुरी वासनांचा क्षय केला पाहिजे.  आसुरी वासनांचा क्षय म्हणजेच दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष केला पाहिजे.  विवेकाच्या साहाय्याने अमानित्वादि दैवी गुणांचा उत्कर्ष होऊन ते आत्मसात होतात त्यावेळी बाह्य विषयांच्या सान्निध्याने अंतःकरणामध्ये कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींचा विकार निर्माण होत नाही.  म्हणजेच मन रागद्वेषरहित, कामक्रोधादिवृत्तिरहित होते.

जसे अग्नीमध्ये टाकलेले इंधन भस्मसात झाल्यानंतर अग्नीची उष्णता, दाह कमी होऊन तो शांत होतो व अग्नीची उपशमा होते, तसे अनेक जन्मामध्ये केलेल्या अमानित्वादि दैवी गुणांच्या अभ्यासाच्या संस्काराने चित्तामध्ये असलेल्या दंभदर्पादि सुप्त आसुरी वासनांचा क्षय होऊन चित्त शांत होते. चित्ताची उपशमा होते.  असे मन निदिध्यासानेसाठी योग्य आणि अनुकूल होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012




- हरी ॐ –

Thursday, September 25, 2014

कर्मशून्यतेचे परिणाम | Results of Inaction


जिज्ञासु साधकाने शास्त्रप्रमाणानुसार आपापल्या अधिकाराप्रमाणे श्रौतस्मार्तादि कर्मे करावीत, असा आदेश देताना त्याचवेळी भगवान सांगतात – कर्म ज्यायो ह्यकर्मणः |  कर्म न करण्यापेक्षा किंवा कर्मशून्यतेपेक्षा कर्म करणे हे निश्चितच श्रेयस्कर, कल्याणकारक आहे.

कर्म न करण्यामुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात.
१) स्वकर्तव्य न करण्यामुळे प्रत्यवाय दोष निर्माण होतो.
२) शरीरामध्ये तमोगुण प्रबल होवून जडत्व वाढते.

तसेच, अंतःकरणामध्येही तमोगुणवृत्तीचा उत्कर्ष होवून आलस्य, निद्रा, प्रमाद, निष्काळजीपणा, कर्म न करण्याची वृत्ति निर्माण होते. इतकेच नव्हे तर, अंतरिक सावधानता आणि एकाग्रता नाहीशी होते. मन अत्यंत सुंद होते आणि तामोगुण जितका वाढतो तितक्या प्रमाणात विवेक-वैराग्य-शमदमादिषट्कसंपत्ति किंवा सत्त्वगुण तसेच, मनाची सूक्ष्मता, ग्रहणशक्ति नाहीशी होते आणि मन अधःपतित होते. तसेच, रागद्वेषादि विकारांचा उत्कर्ष होतो.  

यामुळे मनुष्य परमपुरुषार्थापासून च्युत होतो. शरीरपातानंतरही त्याला सुखप्राप्ति होत नाही. उलट, अनेक प्रकारच्या प्रत्यवाय दोषांच्यामुळे आणि तमोगुणाच्या प्राबल्यामुळे नरकप्राप्ति आणि अधोयोनिप्राप्त होते. स्वधर्म व स्वकर्तव्यापासून मनुष्य च्युत होवून अधर्माचरणामध्ये प्रवृत्त होतो. असे कर्म चित्तशुद्धीचे साधन होणार नाही.

म्हणून असे कर्म करावे की, ज्यामुळे अहंकार, रागद्वेष, स्वार्थ, लोभ वगैरेदि दोष हळुहळू कमी होतील आणि मन शुद्ध व निर्मळ होवून सत्त्वगुणप्रधान होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ –