साधकाने एकांतवास करावा. जे स्थान स्वभावतःच पवित्र, शुद्ध असेल किंवा संस्काराने शुद्ध केलेले असेल, झाडून, पुसून
स्वच्छ केलेले असेल तसेच जे स्थान सर्पव्याघ्रादिरहित आहे, अशा शुद्ध, स्वस्थ, निर्भय स्थानी जावे. अरण्य, नदीकाठ, मंदिर, आश्रम, पर्वत, गुहा वगैरेदि एकांतस्थाने आहेत. आज आपण बाह्य विषय, व्यक्ति, अन्य जवळचे लोक यांच्या
सान्निध्यात राहिल्यामुळे मनामध्ये सतत त्यांचेच विचार येतात. एकांतवासात गेल्यामुळे प्रथम विषय आणि
व्यक्तींचा संपर्क एकदम कमी होतो. रागद्वेषांचा
प्रभाव कमी होतो. यामुळे मन काही प्रमाणात
विषयांच्यामधून, प्रसंगांच्यामधून
निवृत्त होण्यास मदत होते.
दुसरी गोष्ट म्हणजे एकांतवासात गेल्यामुळे
त्या स्थानमाहात्म्याच्या प्रभावाने आपल्या मनामध्येही बदल होऊन मन काही
प्रमाणात शुद्ध, पवित्र, सात्त्विक होते. मनामधील
वाईट वृत्ति नाहीशा होऊन मन प्रसन्न, अंतर्मुख होऊन ज्ञानसाधनेमध्ये अधिक एकाग्र होते. तिसरी गोष्ट म्हणजे - दैनंदिन जीवन जगत असताना
आपण सतत आपले मन कोठेतरी गुंतविण्याचा प्रयत्न करीत असतो. एखादा छंद, काम, व्यक्ति, प्रसंग आणि काहीच नसेल तर, दूरदर्शन (T.V.) यामध्ये आपण स्वतःला गुंतवून
ठेवतो. परंतु एकांतवासामध्ये मन
गुंतविण्यासाठी अन्य साधनच उपलब्ध नसते. तरीही
आपण जगू शकतो, हे
एकांतवासातच आपल्याला समजते. त्यामुळे
मनाची 'dependence' ही
वृत्ति कमी होते. त्याचवेळी मन पूर्णतः
एकाग्र होते. साधनेसाठी पूर्णपणे उपलब्ध
होते.
चवथी गोष्ट एकांतवास म्हणजे आत्मनिरीक्षण
करण्याची फार मोठी संधी आहे. व्यवहारामध्ये
राहून आपले मन कधीही उपलब्ध होत नाही. परंतु एकांतामध्ये अन्य विषय, वस्तु, व्यक्ति
नसल्यामुळे आपण एकटे बसलो की, एका
क्षणात आपण अस्वस्थ होतो. आपण आपल्या
मनाला सामोरे जाऊ शकत नाही. आपले मन काय
आहे, हे आपणास एकांतवासामध्येच
समजते. You
have to face your own mind. यामुळे एकांतवासामध्येच मनाची ताकद, शक्ति, सामर्थ्य
वाढते. अशा प्रकारे एकांतवासामध्येच
आपल्या मनामधील विषयासक्ति, कामना, चिंता, विवंचना, रागद्वेषादि
दोष, कामक्रोधादि विकार कमी होऊन
आत्मनिरीक्षण केले जाते. आत्मपरीक्षणाच्या
साधनेमुळे मन अत्यंत शांत, प्रगल्भ
(mature) विकाररहित, अंतर्मुख होऊन ज्ञानसाधनेसाठी योग्य, अनुकूल, अधिकारी होते. म्हणून
साधकाने एकांतवास करावा.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

