हे राघवा ! हे संसाररूपी अरण्य असून त्यामध्ये मनोरूपी बीजापासून
सप्तलोकरूपी पल्लव उत्पन्न होतात व त्यांच्यावर शुभाशुभरूपी सुखदुःखात्मक फळे येतात.
म्हणजे भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यं
हे सात लोक व त्या लोकांच्यामध्ये प्राप्त होणारी चांगली-वाईट सुखदुःखात्मक फळे या
सर्वांचे कारण मन आहे. या सर्वांच्यापासून
मुक्त व्हावयाचे असेल, तर राघवा ! प्रथम संकल्पांचा त्याग कर. संकल्पांचा त्याग केलास तर तुला सर्व सिद्धि देणारे
संकल्परहित साम्राज्य प्राप्त होईल.
म्हणून संकल्परहित आत्मचैतन्यस्वरूप साम्राज्यामधील
सिंहासनावर आरूढ वाहावयाचे असेल तर तू संकल्पांचा निःशेष त्याग कर. अग्नीची धग पूर्णतः नाहीशी करावयाची असेल तर त्या
अग्नीमधून जळत असणारी लाकडे पूर्णतः बाहेर काढली पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्याला ब्रह्मपद प्राप्त करावयाचे
आहे, त्याने आपल्या मनातून कामना - संकल्परुपी इंधन बाहेर काढले पाहिजे. तरच संकल्परहित झालेले ते मन हळूहळू शांत होऊ शकेल
आणि त्या मनामध्ये निरतिशय आनंदाचा अनुभव येईल.
जोपर्यंत मन संकल्परहित होत नाही, तोपर्यंत या
चिदाकाशामध्ये अज्ञानी जीवाला नानाविध असणारी असंख्य ब्रह्माण्डे भिन्न-भिन्न रूपाने
दिसतच राहतात. अशा या मनानेच जणु काही आपल्या
संकल्परुपी ऐश्वर्याने कोट्यावधी ब्रह्माण्डे उत्पन्न करून स्वतःच स्वतःवर शोकमोहादि
अनर्थपरंपरा ओढवून घेतली आहे. मनानेच संसार
उत्पन्न करून जीव त्या संसारामध्ये बद्ध झाला आहे. हे राघवा ! यावर आता एकच उपाय आहे, तू या संकल्पांचा त्याग कर.
मनामधील आसक्ति दूर कर. आत्मतृप्तिरूपी ऐश्वर्याने या मनावर विजय मिळव. राघवा ! संकल्प हे खरे ऐश्वर्य नसून आत्मतृप्ति हेच खरे ऐश्वर्य
आहे. म्हणून संतोष हा परमगुण आहे. आत्मतृप्त पुरुष अनासक्त मनाने आपल्या मनावर विजय
मिळवतो.
याप्रमाणे जे चित्त संकल्परहित झाले आहे,
अशा परमपावन तसेच अत्यंत समबुद्धीने युक्त असणाऱ्या, शांत झालेल्या, अहं-ममकारादि भावना
निरास झालेल्या चित्तामध्येच आत्मज्ञान उदयाला येते. हे राघवा ! याप्रमाणे ज्ञानाने सर्व दृश्याचा तसेच जन्म, मृत्यु
वगैरेदि कल्पनांचा, अहं-मम प्रत्ययांचा निरास झाला की, जे अज, नित्य, शाश्वत, चिरंतन,
निर्विशेष, निरतिशय पद शिल्लक राहते, ते श्रेष्ठ पद तुला प्राप्त होवो !
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–

