जन्म, मृत्यु, जरा, व्याधि यांच्यामध्ये दुःख आणि दोष पाहावेत, कारण त्याशिवाय मन त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. हे दोष कसे पाहावेत ? यावर
आचार्य सुंदर वर्णन करतात -
जरा म्हणजे वार्धक्यावस्था होय. जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत एक प्रकारचा
जोष, उमेद, उत्साह असतो. परंतु जसजसे वय वाढते, आयुष्याची संध्याकाळ येते, मनुष्य वार्धक्यावस्थेला येऊन पोहोचतो त्यावेळी इंद्रियांची शक्ति, सामर्थ्य कमी होऊन इंद्रिये शिथिल होतात. इंद्रियांच्या व्यापारामध्ये मंदपणा येतो. बधिरता येते. स्पष्ट ऐकू येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही, स्पष्ट दिसत नाही. शरीर कंप पावते. उठताना, बसताना, चालताना
तोल जातो. सर्व शरीर वार्धक्याने बलहीन
होते. शरीर व इंद्रियांच्यावर संयमन राहात
नाही. मनुष्य पूर्णतः परावलंबी होतो. स्वतःचे स्वतःला काहीच करता येत
नाही. टवटवीत, तजेलदार शरीर निस्तेज होते. चेहऱ्यावर
सुरकुत्या येतात. शरीराचे सौंदर्य नाहीसे
होऊन विद्रूपता येते. आचार्य जरावस्थेचे
खूप सुंदर वर्णन करतात - सर्व शरीर गलितगात्र होते. बुद्धि भ्रष्ट होते. मुख दंतरहित होते. हातामध्ये काठी येते. तरीही मनुष्याच्या आशा, अपेक्षा, वासना संपत नाहीत.
यामुळे अन्य लोक अपमान, तिरस्कार करतात. ज्या
घरात आपण स्वाभिमानाने जगलो, त्याच
घरात आपण पोरके होतो. स्वतःच्या घरी दूरचा
पाहुणा मी । अशी आपली अवस्था होते. ज्यांना आपण जन्म दिला, आयुष्यभर खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले, ती आपली मुले, आपले
रक्ताचे नातेवाईक आपल्याशी त्रयस्थासारखे वागतात. आपलीच आपल्या घरात अडचण होते. आपली स्वतःचीच मुले आपल्याला वृद्धाश्रमामध्ये
ठेवतात. म्हणूनच सद्य समाजामध्ये
कुटुंबसंस्था विस्कळीत झालेली आहे. आपली
मुले आपल्या मृत्यूची वाट पाहतात. आपण
पूर्णतः परावलंबी, पराधीन
होतो. आपल्यासाठी कोणालाही वेळ नसतो. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी
संपते. सर्वजण आपल्यापासून शरीराने व
मनानेही दुरावतात.
त्याचबरोबर वार्धक्य आले की, सतत मृत्यूची भीति निर्माण होते. या भूतलावरील आपले अस्तित्व संपत आलेले आहे, या कल्पनेनेच मनुष्य निराश, दुःखी होतो. गतकाळाचे सतत स्मरण होऊन
मनुष्य अत्यंत उद्विग्न होतो. याप्रमाणे 'जरावस्था' अत्यंत दुःखदायक व दोषयुक्त
आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

