हे रामा ! व्यवहारामध्ये आपणास दृष्टांत व दार्ष्टांत
हे स्पष्टपणे समजतात. कारण व्यवहारमधील दृष्टांतामध्ये
उपमान आणि उपमेय या दोन्हीही वस्तु दृश्य व निर्मित कार्य आहेत. व्यवहारामध्ये आपण ज्या वस्तूला उपमा देतो, ती उपमेय
वस्तु निर्मित असून नाशवान आहे. तसेच ज्याची
उपमा देतो, ती वस्तु सुद्धा निर्मित व नाशवानच आहे. त्या दोन्हींनाही निर्मितीचे कारण असून विश्वामधील
सर्व उपमान व उपमेय वस्तु या कार्य आहेत. म्हणून
कशाचीही कशालाही उपमा दिली तरी, ज्याची उपमा द्यायची तेही अनित्य व ज्याला उपमा द्यायची,
तो पदार्थही अनित्यच आहे. परंतु या सर्वांच्यामध्ये
परब्रह्मस्वरूप मात्र अपवाद आहे. परब्रह्मस्वरूपाला
कशाची उपमा द्यायची हा प्रश्नच आहे. कारण उपमेय
असणारे परब्रह्मस्वरूप निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक असून नित्य स्वरूपाचे आहे आणि
विश्वामधील सर्व उपमा या तर अनित्य आहेत.
म्हणून हे रामा ! तुला दृष्टांत देताना मलाही माहीत आहे की, परब्रह्मस्वरूप
हे नित्य आहे आणि त्या नित्य वस्तूचे ज्ञान देण्यासाठी मी अनित्य वस्तूच्या दृष्टांताचा
आधार घेणार आहे. असे असूनही रामा ! तुला परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी दृष्टांत
देणे आवश्यक आहे. म्हणून मी तुला जे जे
दृष्टांत देईन ते सर्व ऐकताना ते सर्व दृष्टांत, उदाहरणे, सर्व उपमा या एकदेशीय आहेत,
हे तू सतत लक्षात ठेव. त्यामुळे दृष्टांतामधील
काही विशिष्ट भागच दार्ष्टांतामध्ये लागू पडतो. तेवढा भागच घ्यावा आणि दृष्टांतामधील उरलेल्या भागाचा
त्याग करावा.
उदा. घट व मातीचा दृष्टांत शास्त्रामध्ये प्रसिद्ध
आहे. घट मातीमधून निर्माण होतो. मातीमध्ये अस्तित्वामध्ये असतो व नंतर मातीमध्येच
लय पावतो. घटाला उत्पत्ति-स्थिति-लय आहे. परंतु माती मात्र उत्पत्तिस्थितिलयरहित आहे. म्हणून शास्त्रकार सिद्ध करतात की, घट हा अनित्य
असून माती ही नित्य आहे. रामा ! हा जरी दृष्टांत असेल तरी येथे केवळ घटाच्या दृष्टीने
माती नित्य आहे, हे सांगण्यापुरतेच हा दृष्टांत दिलेला आहे. वस्तुतः माती सुद्धा विश्वामधील निर्मित पदार्थ असल्यामुळे
माती सुद्धा अनित्य आहे. त्यामुळे हा दृष्टांत
योग्य नाही, असा बुद्धिवाद कोणीही करू नये. तर येथे दृष्टांतामधील योग्य अंश ग्रहण करून मातीच्या
अनित्यत्वाच्या अंशाचा त्याग करावा आणि घटाच्या दृष्टीने माती या तत्त्वाचे जे नित्यत्व
सांगितले तेवढेच सार या घट-मातीच्या दृष्टांतामधून ग्रहण करावे. हा दृष्टांत केवळ तत्त्वाचे नित्यत्व समजण्यासाठी
आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

