Monday, January 14, 2013

विवेकशक्ति - मनुष्याचे वरदान | Conscience - Human gift


खरे तर मनुष्याप्रमाणे पशूंना, पक्ष्यांना इतकेच नव्हे तर वृक्ष, लता, वेली यांनाही बुद्धी आहे, असे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. परंतु सर्वांना जरी बुद्धी असेल तरी बुद्धीचा जास्तीत जास्त विकास फक्त मनुष्यामध्ये झालेला आहे. म्हणूनच मनुष्यामधील अंत:करणाच्या सर्व faculties चा आविष्कार झालेला दिसतो.

यामुळे पशुपक्ष्यादी सर्वाना बुद्धी असेल, थोडीफार बाह्य विश्वाची जाणीव असेल तरीही माझे जीवन मी उत्कर्षित करावे, ही स्वाभाविक प्रवृत्ति दिसत नाही. विकासाची प्रवृत्ति फक्त  मनुष्यामध्ये आहे.  याचे कारण मनुष्याच्या  अंत:करणामध्ये तीन अत्यंत दुर्मिळ शक्ति दिसतात.

१. इच्छाशक्ति
२. क्रियाशक्ति
३. ज्ञानशक्ति

या तीन शक्तींच्यामुळेच मनुष्यामध्ये विकासाची सहजस्वाभाविक प्रवृत्ति दिसते. या तीन शक्ति हेच मनुष्याच्या जीवनाचे विकासाचे साधन आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान व्यक्तिमत्व विकासाचे रहस्य सांगतात,

      उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादायेत् |
      आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: || (गीता अ. ६-५ )

'हे अर्जुना ! मनुष्याने स्वत:च स्वत:चा उद्धार करावा. स्वत: स्वत:चे अध:पतन करवून घेवू नये. कारण मनुष्य हा स्वत:च स्वत:चा शत्रू व स्वत:च स्वत:चा मित्रही आहे.'

म्हणून प्रत्येक मनुष्याने सत्-असत् बुद्धीच्या सहाय्याने स्वत:चे जीवन विकसित करवे. भगवान सर्वप्रथम आत्मानं न अवसादायेत् | असा आदेश देतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे. जीवनाचा विकास करीत असताना स्वत:नेच स्वत:ला कधीही कमी लेखू नये. स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण करू नये म्हणजेच नकारात्मक विचार (negative thinking) करू नये.

प्रत्येक मनुष्याला विकास करण्यासाठी विवेकशक्ति हे साधन दिलेले आहे. अत्यंत निकृष्ठ अवस्थेपासून परमोच्च अवस्थेपर्यंत जाण्यासाठी बुद्धी हीच साधन होते. किंवा तीच बुद्धी काही वेळेला मनुष्याला उत्कृष्ट अवस्थेपासून अध:पतितही करू शकते. खालून वर जाणे अत्यंत कठीण आहे. परंतु वरून खाली यायला वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य जीवनाचे अवमूल्यन होण्यास वेळ लागत नाही. यासाठीच मनुष्याने अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या विवेकशक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्यासाठीच मनुष्याला तीन दुर्मिळ शक्ति दिलेल्या आहेत.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, द्वितीय आवृत्ती,  ऑगस्ट २०
- Reference: Translated book "Personality Development" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 2nd Edition, August 2008

No comments:

Post a Comment