Saturday, January 12, 2013

बुद्धी - शरीररूपी रथाचा सारथी Intellect - The Charioteer




            आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु |
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च || ( कठोपनिषद १-३-३ )

मी स्वतः रथस्वामी असून शरीर रथ आहे.   या रथाचे सारथ्य करणारी बुद्धी ही सारथी आहे. रथस्वामीला त्याच्या इच्छेप्रमाणे निश्चित स्थळापर्यंत जावयाचे असेल तर सारथी अत्यंत कुशल, निष्णात व दक्ष पाहिजे. त्याचे रथावर तसेच, रथाच्या घोड्यांच्यावर नियंत्रण पाहिजे. घोडे स्वभावतःच अवखळ असतात. त्यामुळे त्यांच्यावर नियमन करण्यासाठी सारथ्याला हातामध्ये लगाम पाहिजे. यापैकी काहीही कमी असेल तरी रथस्वामी त्याच्या साध्यापर्यंत जाऊ शकणार नाही. 

त्याचप्रमाणे आपले शरीर हेच रथाप्रमाणे वाहन-उपकरण आहे. शरीररूपी रथाला इंद्रियरुपी घोडे लावलेले आहेत. आपली सर्व इंद्रिये घोड्यांप्रमाणे प्रमाणे स्वैर,छश्रुंखल आहेत. बुद्धी ही रथाचा सारथी आहे आणि इंद्रियांच्यावर नियंत्रण करण्यासाठी मनरूपी लगाम आहे. रथस्वामीला – जीवाला त्याच्या साध्यापर्यंत, पूर्णतेपर्यंत जावयाचे असेल तर जीवनामध्ये बुद्धीचे स्थान सर्वोच्च आहे.

म्हणुनच साधकाने सतत सदसदविवेकबुद्धीने विचार करावा. खरोखरच आपल्या जीवनाचे प्रयोजन काय? आपल्या जीवनाचे अंतिम साध्य काय? केवळ विषयप्राप्ती आणि विषयभोग हेच जीवन नसून याच्याही पलिकडे काहीतरी आहे. असत्, नाशवान विषयांचा त्याग करून जीवनात शाश्वत सत्य शोधणे, निरतिशय आनंदाची प्राप्ती करणे हेच जीवनाचे साध्य आहे.
     

 - "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती,  जून २००६
- Reference: "Upasana" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, June 2006


- हरी ॐ -

No comments:

Post a Comment