Sunday, January 20, 2013

उपासनेमुळे स्वर्गप्राप्ती मिळते का? (True meaning of Upasana)






अनेक साधक अनेक संदर्भांच्यामध्ये उपासना, ध्यान, Meditation, समाधी असे अनेक शब्द वापरतात. परंतु या शब्दांचा नक्की अर्थ काय, हे समजले पाहिजे. आत्मसाक्षात्कार, अनेक प्रकारच्या सिद्धी, चमत्कार किंवा मेल्यानंतर स्वर्गप्राप्ति यापैकी कोणतेही उपासनेचे प्रयोजन नाही. उपासनेचे प्रयोजन एकच – मल, विक्षेप आणि आवरण हे तिन्हीही दोष नाहीसे करून चित्ताची शुद्धी, तल्लीनता, तन्मयता, एकाग्रता प्राप्त करून स्वस्वरूपाची प्राप्ती करणे.

शास्त्रकार व्याख्या करतात –
उपासनं नाम यथा शस्त्रम् उपास्यस्य अर्थस्य विषयीकारणेन समीपम् उपगम्य तैलधारावत् समान प्रत्यय प्रवाहेण दीर्घकालं यत् आसनं तत् उपासनम् आचक्षते |  
उपासना यामध्ये दोन शब्द आहेत. उप + आसनम् | उप म्हणजे जवळ आणि आसनम् म्हणजेच बसणे. उपासना म्हणजे जवळ बसणे. जवळ जाणारा मी म्हणजेच साधक आहे आणि ज्याच्या जवळ जावयाचे तो ईश्वर आहे. मी ईश्वराजवळ जाणे म्हणजेच उपासना. मी ईश्वराजवळ शरीराने जाऊ शकत नाही. त्यासाठी मन हे साधन आहे. म्हणून उपासनेमध्ये तीन घटक येतात –

१) उपासना करणारा मी ‘उपासक’.
२) ज्याची उपासना करायची तो ईश्वर ‘उपास्य देवता’.
३) ज्याच्या साहाय्याने उपासक उपास्य देवतेच्याजवळ जातो ते ‘साधन’.

याचे कारण आज मी – उपासक, व ईश्वर – उपास्य देवता, यांच्यामध्ये अंतर आहे. उपासना ही अशी एक साधना आहे की त्यामुळे हे अंतर कमी कमी होऊन शेवटी उपासक आणि उपास्य देवता यांच्यातील भेद नाहीसा होऊन मी त्या देवतेशी तन्मय, तद्रूप होतो. यालाच ‘उपासना’ असे म्हणतात.

उपास्य विषयाची वृत्ति निर्माण करून, मनाने त्याच्या जवळ जाऊन तेलाच्या संतत धारेप्रमाणे दीर्घकाळ त्या अवस्थेमध्ये राहणे म्हणजेच उपासना होय. येथे मनानेच मनाच्या साहाय्याने त्या देवतेच्या स्वरूपाशी तल्लीन झाले पाहिजे. म्हणून उपासना ही शारीरिक साधना अथवा इंद्रियांचा व्यापार नसून ही पूर्णतः मानसिक साधना आहे. म्हणून उपासनेसाठी मन हेच साधन आहे.

- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती,  जून २००६
- Reference: "Upasana" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, June 2006



'उपासना' या पुस्तकामधील आधीचा लेख 'गुण उपासना म्हणजे काय? (What is Guna Upasana?)' हाही आपणास आवडेल. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email  वरही कळवू शकता - धन्यवाद.

 - हरी ॐ

No comments:

Post a Comment