Tuesday, January 8, 2013

गुण उपासना म्हणजे काय? What is Guna Upasana?




गुण उपासना म्हणजे काय?
What is Guna Upasana?

गुण उपासना म्हणजेच सत्त्वगुणाची उपासना होय.    शास्त्रामध्ये अनेक श्लोकांच्यामधून  दैवीगुणसंपत्तीचे वर्णन केलेले आहे. भगवान गीतेमध्ये या गुणांनाच “ज्ञान” असे म्हणतात.     कारण हेच गुण ज्ञानप्राप्तीचे साधन आहेत.     

निष्ठा, सेवा, समर्पण, त्याग, धैर्य, आत्मविश्वास, शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, नित्यानित्यवस्तुविवेक, तीव्र वैराग्य, तीव्र मुमुक्षुत्व यापैकी एका गुणाचा तरी उत्कर्ष झाला तरी त्याच्या आश्रयाला सर्व गुण येतात.

हे दैवी गुण साधकाचे मन अत्यंत शुद्ध, अंतर्मुख आणि एकाग्र करून त्याला क्रमाने परमोच्च अवस्थेपर्यंत नेतात.     दैवी गुणांच्या साहाय्यानेच साधकाला गुणांच्याही अतीत असणारे आनंदस्वरूप प्राप्त होते.     हे गुण आत्मसात करणे ही अत्यंत महत्वाची साधना आहे. यालाच “गुणउपासना” असे म्हणतात.     कोणतीही साधना करण्यासाठी बहिरंगाच्या तयारीपेक्षा अंतरंगाची तयारी आवश्यक आहे.     कारण श्रुति म्हणते –

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः | (अमृतबिंदु उपनिषद २)

आपले मनच बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. भगवान गीतेत आदेश देतात –

उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः || ( गीता अध्याय ६-५ )

साधकाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. स्वतःचे अधःपतन करवून घेऊ नये.     म्हणून अध्यात्म मार्गामध्ये साधनेसाठी, उपासनेसाठी आपणच आपल्या मनाला अधिकारी, अनुकूल बनविले पाहिजे.   अंतरंगामधून बदल हा झालाच पाहिजे.     त्यामध्ये कोणत्याही साधकाला स्वातंत्र्य नाही.     ही सत्वगुणाची उपासना आहे.


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती,  जून २००६
- Reference: "Upasana" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, June 2006


- हरी ॐ -

No comments:

Post a Comment