Saturday, January 19, 2013

प्राण शरीरात प्रवेश कसा करतो? (How soul enters body?)

अथ हैनं कौसल्याश्र्चाSSश्वलायान: पप्रच्छ |
भगवन्कुत एष प्राणो जायते कथमायात्यस्मित्रशरीर
आत्मानं व प्रविभज्य कथं प्रतिष्ठते केनोत्क्रमते
कथं बाह्यमभिधत्ते कथमध्यात्ममिति || १ ||

अन्वय - अथ ह एनं कौसल्य: चा आश्र्वलायन: पप्रच्छ | भगवन् ! एष प्राण: कुतः जायते, अस्मिन् शरीरे कथं आयाति आत्मानं प्रविभज्य वा कथं प्रतिष्ठते, केन उत्क्रमते, कथं बाह्यं अभिधत्ते, कथं अध्यात्मं इति |

शब्दार्थ - यानंतर पिप्पलाद मुनींना आश्र्वलायनाचा पुत्र कौसल्य प्रश्न विचारतो की, हे भगवन् !   हा प्राण कोणत्या करणापासून उत्पन्न होतो ? हा प्राण या शरीरामध्ये कसा येतो ? तसेच तो प्राण स्वत:चे विभाजन करून या शरीरामध्ये कसा राहतो ? तो प्राण कोणत्या कारणाने उत्क्रमण पावतो ? तसेच तो प्राण बाह्य तसेच आभ्यन्तर शरीराला कसे धारण करतो?  

विवरण - यावर आचार्य म्हणतात -
प्राण हा निर्मिती कार्य असल्यामुळेच प्राणाविषयी अन्य सर्व प्रश्न ओघानेच अपेक्षित आहेत. प्राण कोणत्या करणामधून निर्माण होतो ? उत्पन्न झालेला प्राण या शरीरामध्ये कोणत्या वृत्तिविशेषाने प्रवेश करतो ? कोणत्या कारणास्तव प्राण शरीरग्रहण करतो ? शरीरामध्ये प्रवेश केल्यावर प्राण स्वत:चे विभाजन करून कोणत्या प्रकारे या शरीरात राहतो ? तसेच, तो प्राण कोणत्या विशेष वृत्तीने शरीराच्या बाहेर उत्क्रमण करतो ? तो प्राण अधिभूत व अधिदैव विषयांना कसे धारण करतो ? तसेच, देहेन्द्रियादी अध्यात्म शरीराला कसे धारण करतो ? या श्रुतीमध्ये - कथं अध्यात्मम् | यानंतर 'धारयति' म्हणजेच 'धारण करणे' ही क्रिया शेष आहे.  म्हणजेच 'धारण करतो' हा अर्थ येथे श्रुतीमध्ये गृहीत धरावा. 

याप्रकारे आश्र्वलायनाचा पुत्र कौसल्याने पिप्पलाद मुनींना असे प्रश्न विचारल्यानंतर पिप्पलाद मुनि या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रारंभ करतात. [ ते आपण पुढील ब्लॉगमध्ये पाहू. ]



- "प्रश्नोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती, २६ एप्रिल २०१२ (आदि शङ्कराचार्य जयंती)
- Reference: "Prashnopanishad" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, 26 April 2012 (Adi Shankaracharya Jayanti)







No comments:

Post a Comment