Tuesday, January 15, 2013

गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व | Teacher-Disciple lineage


विश्वाच्या आरंभी असणारे चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सर्व वेद आणि वेदांच्यामधील ज्ञान आज मी अध्ययन करू शकत असेन तर 'हे ज्ञान माझ्यापर्यंत कसे आले?' याचा विचार केला पाहिजे. हे ज्ञान केवळ यंत्रवत् आलेले नाही. या ज्ञानाला 'श्रुति' म्हटले जाते. [आपण नेहमी 'श्रुति स्मृती पुराणोक्त' म्हणतो. आश्रमाच्या नावातही 'श्रुति' आहे, 'श्रुतिसागर आश्रम'. ]  श्रुति याचा अर्थ श्रवण होय. फार प्राचीन काळी, लिहिण्याची कला अवगत नव्हती. अशा वेळी ऋषीमुनींना ध्यानावास्थेमध्ये स्फुरलेले मंत्र त्यांच्या शिष्यांनी श्रवण करून, ते स्मरण करून त्यांनी आपल्या शिष्यांना - प्रशिष्यांना अध्यापन केले.

अशा प्रकारे या गुरुशिष्य परंपरेने आजपर्यंत ही विद्या आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यातील एकही मंत्र विस्मृत न होता, त्या मंत्रामधील काहीही न गाळता आणि त्या मंत्रांच्यामध्ये स्वत:च्या बुद्धीने अधिक न घालता ते मु मंत्र आजपर्यंत आलेले आहत. लाखो-कोट्यावधी वर्षे गेल्यानंतर जर मी आजही ते ज्ञान विधिवत् गुरुशिष्यपरंपरेने घेत असेन तर त्याच्यामागे फार मोठा संप्रदाय आहे. फार मोठी अलौकिक व अपूर्व परंपरा आहे.

म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गुरुशिष्यपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुशिष्य परंपरा हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. म्हणूनच या परंपरेमध्य अनेक शिष्टाचार व श्रेष्ठ अचारसंहिता आहे. वेदान्तशास्त्राचे अध्ययन करावयाचे असेल तर ती [गुरुशिष्य परंपरा ] मान्य केलीच पाहिजे.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya Upanishad" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2009

'ईशावास्योपनिषत्' या पुस्तकामधील आधीचा लेख 'उपनिषदे म्हणजे काय? What are Upanishadas?' हाही आपणास आवडेल. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email  वरही कळवू शकता - धन्यवाद.

- हरी ॐ -

No comments:

Post a Comment