Tuesday, February 16, 2021

जे पूर्वी आणि नंतर नसते | Non-Existent in Past and Future

 



विश्वामधील सर्व दृश्य पदार्थांचे निरीक्षण केले, त्यांची मीमांसा केली तर समजते की, हे सर्व दृश्य पदार्थ निर्मित-कार्य आहेत.  म्हणून त्या प्रत्येक पदार्थाला निश्चितपणे सुरुवात व शेवट, आदि व अंत आहे.  प्रत्येक पदार्थ हा उत्पत्ति-स्थिति-लययुक्त आहे.  त्यामुळे तो पदार्थ त्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी अस्तित्वात नसतो.  तसेच, नाशानंतर सुद्धा अस्तित्वात नसतो. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा, त्याच्या उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर अभाव असतो.

 

आचार्य म्हणतात की – आदौ अन्ते च यन्नास्ति वर्तमाने अपि तत्तथा |  जी वस्तु पूर्वी म्हणजेच तिच्या उत्पत्तीपूर्वी अस्तित्वात नव्हती व – अन्ते | म्हणजे तिच्या नाशानंतरही ती अस्तित्वात नसते.  ती वर्तमानकाळामध्ये, स्थितिकाळामध्ये असूनही, दिसूनही नसल्यासारखीच आहे. त्यामुळे घट डोळ्यांना दिसला तरी वस्तुतः घट ही सत्य वस्तु आहे का ?  यामध्ये विचार केला पाहिजे.  केवळ दिसते म्हणून सत्य म्हणता येणार नाही.  जे काळामध्ये निर्माण होते, ते सर्वच नाशवान आहे.

 

भगवान म्हणतात –        

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः | 

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ||         (गीता अ. २|१६)   

असत् पदार्थांना कधीही अस्तित्व नसते आणि सत् पदार्थांचा कधीही अभाव नसतो. तत्त्वदर्शी, आत्मज्ञानी लोक याप्रकारे सत्असत् या दोन्हीही वस्तूंचे स्वरूप यथार्थ व स्पष्टपणे जाणतात.  नित्यानित्यवस्तुविवेकामुळे त्यांना खरोखरच सत्य व असत्य समजलेले असते. या विश्वामध्ये, दृश्य विषयांच्यामध्ये कधीही तथ्य, सार नाही, हे त्यांना पटते.  म्हणूनच तत्त्वज्ञानी पुरुष दृश्य, अनित्य अनात्मविषयांच्यापासून मनाने पूर्णतः निवृत्त होतात.

 

परंतु आत्मअज्ञानी, अविवेकी लोक मात्र दृश्यालाच सत्य मानतात.  दृश्य विषयांनाच नको इतके महत्त्व देऊन त्यामध्ये आसक्त होतात.  अनित्य, अशाश्वत विषयांच्या उपभोगांच्यामध्ये रात्रंदिवस रममाण होतात.  कामक्रोधादि विकारांच्या आहारी जाऊन सद्गुणांचा, सदाचाराचा, धर्माचरणाचा त्याग करतात.  पापाचारामध्ये, अधर्मामध्ये प्रवृत्त होऊन स्वतःचे अधःपतन करवून घेतात.  या सर्व अनर्थाचे कारण एकच, आणि ते म्हणजे – दृश्य विषयांना दिलेले सत्यत्व !  म्हणूनच साधकाने दृश्य विषयामधील मिथ्यात्व जाणण्याचा श्रुति, युक्ति यांच्या साहाय्याने सर्वतोपरी प्रयत्न करावा.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, February 9, 2021

यत् दृष्टं तत् असत्यम् | All That is Seen is Futile

 



सामान्यतेने द्रष्टा, म्हणजेच सर्व दृश्य पदार्थांना पाहणारा मनुष्य, दृष्यालाच सत्य मानतो.  जे जे दिसते, ते सत्य आहे, असे मानतो.  परंतु या निर्णयामागे विवेक नाही.  दृश्य पदार्थांच्यामध्ये कोणताही निश्चयात्मक योग्य विवेक, विचार न केल्यामुळेच द्रष्टा दृश्य पदार्थांना सत्यत्व देतो.  स्वप्नावस्थेमध्ये आपण अनेक दृश्य पदार्थ पाहतो.  परंतु स्वप्नामधून जागे झाल्यावर आपणच, स्वप्नामधील सर्व दिसलेले – दृश्य पदार्थ खोटे आहेत, असे म्हणतो.  म्हणूनच येथे आचार्य या दृष्टांतानुसार व्याप्ति (युक्ति) सांगतात.  यत् दृष्टं तत् असत्यम् इति |  जे जे दृश्य असते, ते सर्व असत् मिथ्यास्वरूपच असते, हा युक्तिवाद स्वप्नाच्या दृष्टांतावरून सिद्ध होतो.

 

मग याच स्वप्नदृष्टांताने व उपरोक्त युक्तिवादाने जागृतावस्थेमधील पदार्थांचे मिथ्यात्व सिद्ध होते.  जागृतीमधील पदार्थ हे स्वप्नपदार्थांच्याप्रमाणे दृश्य आहेत.  हा पहिला भाग.  जे जे दृश्य असते, ते असत्-मिथ्या असते, या व्याप्तीमुळे जागृत पदार्थ हे दृश्य असून मिथ्या व असत् स्वरूपाचे आहेत, हे सिद्ध होते.  म्हणूनच जागृतपदार्थ व स्वप्नपदार्थ यांच्यामधील दृश्यत्व व मिथ्यात्व हे दोन धर्म समानच आहेत.

 

मग जागृत पदार्थ व स्वप्नपदार्थ हे दोन्हीही दृश्य व मिथ्या असतील तर मग या दोन्हींच्यामध्ये काय फरक आहे ?  आचार्य स्पष्ट करतात की, या दोन्हींच्यामध्ये अन्तःस्थितत्व व संवृतत्व या दोन धर्मांच्यामध्ये भेद आहे.  म्हणजेच स्वप्नामधील पदार्थ हे शरीराच्या आत संकुचित स्थानामध्ये सूक्ष्म वासनांच्या रूपाने विद्यमान असतात, तर जागृतावस्थेमधील पदार्थ हे शरीराच्या बाहेर, स्थूलरूपाने विद्यमान असतात.

 

स्वप्नावस्थेमधील पदार्थ हे स्वप्नपुरुषाला दिसले तरी ते मनोकल्पित असतात.  मुळात कोणत्याही पदार्थांना दिलेले दृश्यत्व हेच मनाने कल्पिलेले असते.  मन असेल, मनाची वृत्ति असेल तरच दृश्य पदार्थ अनुभवायला येतात.  मनाची वृत्ति नसेल तर पदार्थांचा अनुभव देखिल येत नाही.  मनानेच वस्तूंच्या, पदार्थांच्या दृष्यत्वाला सत्ता दिलेली आहे.  म्हणून दृश्यत्व हेच मनोकल्पित आहे, हे प्रथम समजावून घेतले पाहिजे.  हे समजले तर आपोआपच जागृतावस्थेमधील दृश्य पदार्थही मिथ्या, मनोकल्पित आहेत, हे समजण्यास वेळ लागत नाही.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, February 2, 2021

गुरु-शिष्य द्वैताची कल्पना | Master-Disciple Duality is Imagination

 



जर कोणी गुरु-शिष्य या द्वैताची कल्पना केली असेल तर ती निश्चितच निवृत्त होते.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी निर्माण केलेला गुरु-शिष्य हा भेद किंवा विकल्प, हे द्वैतही मिथ्या आहे.  गुरु-शिष्य हा भेद केवळ आत्मज्ञानाच्या उपदेशासाठी निर्माण केलेला आहे.  उपदेशानंतर जेव्हा अद्वैत आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हे द्वैत शिल्लक राहत नाही.

 

येथे आचार्य सांगतात की, गुरु-शिष्य हा भेद केवळ उपदेशासाठी निर्माण केला जातो.  तुरीय आत्मा हा अद्वयस्वरूप आहे.  त्याच्यामध्ये द्वैताचा अत्यंत अभाव आहे.  असे जरी असेल तरी आत्मस्वरूपाचे हे अभेद ज्ञान शिष्याला गुरूंच्याशिवाय प्राप्त होत नाही.  शिष्य कितीही बुद्धिमान असेल तरी त्याने स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून आत्मज्ञान घेऊ नये.  कारण बुद्धीमध्ये व्यक्तिगत रागद्वेष असून बुद्धीला मर्यादा असतात.  श्रुति म्हणते –

आचार्याद्ध वै विद्या विदिता साधिष्ठं प्रापत् |                   (छांदो. उप. ४|९|३)

गुरूंच्याकडून प्राप्त झालेली विद्याच आत्मप्राप्ति करून देते.

 

या श्रुतींच्यामधून या अध्यात्ममार्गामध्ये गुरूंची अनिवार्यता स्पष्ट केली आहे.  गुरूंच्याशिवाय आत्मज्ञान व आत्मज्ञानाची अभेद दृष्टि मिळणे केवळ अशक्य आहे.  परंतु गुरूंच्या मुखामधून वेदांतश्रवण केले की, गुरूंच्याच कृपेने शिष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो.  त्याच्या अंतःकरणामधील विषयासक्ति गळून पडते.  परमेश्वराविषयी उत्कट भक्तीचा भाव उदयाला येतो.  अंतःकरण शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, विषयासक्तिरहित व अंतर्मुख होते.  या शुद्ध अंतःकरणामध्ये वेदांतशास्त्राच्या श्रवणामधून आत्मज्ञान उदयाला येते.

 

शास्त्र, ईश्वर व गुरु यांच्या असीम कृपेने साधकाला तत्त्वाचे ज्ञान, तत्त्वाची दृष्टि व त्या अभेद, अद्वैत तत्त्वामध्ये निष्ठा प्राप्त होते.  या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हा भेदही गळून पडतो.  गुरु-शिष्य दोघेही परब्रह्मस्वरूप होतात.  उपाधिजन्य भेदांचा, विकल्पांचा अत्यंत अभाव होतो.  म्हणुनच उपदेशाचे फळरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर पारमार्थिक तत्त्वामध्ये कोणताही द्वैतविकल्प राहत नाही, असे येथे आचार्यांनी स्पष्ट केले आहे.


 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ




Tuesday, January 26, 2021

द्वैतप्रपंचात अद्वयाची सिद्धि | Seeking Non-Dualism in Manifestation

 



जोपर्यंत द्वैतप्रपंचाची निवृत्ति होत नाही, तोपर्यंत मग “अद्वैत आहे”, असे कसे शक्य आहे ?  म्हणजेच द्वैतप्रपंचाचा अनुभव येत असताना अद्वय आत्म्याची सिद्धि कशी काय होऊ शकेल ?  प्रपंच जर वास्तविक स्वरूपाने सत्य असेल तर ही शंका योग्य आहे.  परंतु प्रपंच हा वस्तुतः अस्तित्वामध्येच नसल्यामुळे ही शंका योग्य नाही.

 

ज्याप्रमाणे दोरीमध्ये दिसणारा साप हा केवळ कल्पित, भासात्मक आहे.  त्याचप्रमाणे हा द्वैतप्रपंच पूर्णतः काल्पनिक आहे.  समजा द्वैतप्रपंच म्हणजेच अनुभवायला येणारा हा संसार वास्तविक अस्तित्वात असला असता, तर तो निश्चितपणे निवृत्त होणारच !  परंतु असे प्रत्यक्षात मात्र नाही.  दोरीमध्ये आपणास सर्पाचा भास होतो.  तो साप विवेकाने नाहीसा होतो, असे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही.  दोरीवरील सापाचे निर्माण होणे व सापाचे निरास होणे, हे दोन्हीही मिथ्याच आहे.  प्रत्यक्षामध्ये साप निर्माणही होत नाही व सापाचा निरासही होत नाही.  जो साप निर्माणच झाला नाही, अशा नसणाऱ्या सापाची निवृत्ति कशी बरे होईल ?

 

याचप्रमाणे प्रपंचाची स्थिति आहे.  जसे वस्तुतः सर्प नाहीच, तसेच वस्तुतः प्रपंच ही नाहीच.  जसे एखादा जादुगार प्रेक्षकांची नजरबंदी करून जादु करतो.  काही मायिक पदार्थ निर्माण करतो.  प्रेक्षकांना ते पदार्थ सत्य वाटतात.  मात्र नजरबंदी सुटल्यावर, जादूचे प्रयोग संपल्यावर ते मायिक पदार्थ दिसत नाहीत.  मग प्रेक्षक असे म्हणत नाहीत की, ते मायिक पदार्थ खरे होते आणि आता ते नाहीसे झाले.

 

त्याचप्रमाणे द्वैतप्रपंच हा दिसला तरीही तो मायामात्र, मायिक आहे.  जसे दोरी हीच सत्य आहे.  किंवा जादुगार मायावी पुरुषाची माया, मायिक पदार्थ हे असत्, भासमान असून मायावी पुरुष मात्र सत्य आहे.  त्यामुळे कोणत्याही प्रपंचाची निर्मिति होत नाही किंवा प्रपंचाची निवृत्ति सुद्धा होत नाही.  केवळ अद्वय परमात्मा हाच पारमार्थिक सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त दिसणारे सर्वच दृश्य द्वैतात्मक जगात हे मायिक, मायाकार्य, भासमान, असत् स्वरूपाचे आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Wednesday, January 20, 2021

तुरीय आत्मा – दुःख निवारक | Transcendental Being – Grief Annihilator

 



तुरीय आत्मा हा सर्व दुःखे निवृत्त करण्यास समर्थ आहे.  म्हणून त्याला ‘ईशान’ असे म्हटले जाते.  ‘ईशान’ म्हणजेच समर्थ होय.  तोच ‘प्रभु’ या शब्दांचाही अर्थ आहे.

 

प्रत्येक जीव जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था अनुभवत असतो.  या अवस्थांच्यामध्ये विश्व-तैजस्-प्राज्ञ यांच्याशी तादात्म्य पावून जीव अनेक प्रकारच्या दुःखांचा अनुभव घेतो.  या तीन्हीही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  जागृत व स्वप्नामध्ये विषय व इंद्रिये यांचा संनिकर्ष होऊन दुःखाची प्राप्ति होत असते.  सतत आपल्यासमोर काहीना काहीतरी दुःख उभे राहते.  ही सर्व दुःखे सुषुप्ति अवस्थेमध्ये बीजरूपाने, कारणरूपाने अस्तित्वात असतात.  थोडक्यात या तीनही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  मात्र तुरीय आत्मा या सर्व दुःखांचे निवारण करतो, म्हणून तो ईशान ‘प्रभु’ आहे.

 

तुरीयस्वरूप आत्म्याचे ज्ञान होताक्षणीच सर्व दुःखांची निवृत्ति होते.  कारण सर्व प्रकारची दुःखे ही अज्ञानामधून निर्माण होतात.  आत्मज्ञानाने अज्ञानाचाच नाश झाल्यामुळे अज्ञानजन्य दुःखांचाही निरास होतो.  तसेच तुरीय आत्मा हा अव्यय, व्ययरहित आहे.  तो स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही.  त्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही.

 

तसेच हा तुरीयस्वरूप आत्मा अद्वयस्वरूप आहे.  जसे रज्जुमधील सर्प हा कल्पित, मिथ्या, अध्यस्त आहे.  सर्प धारा वगैरेदि भासांच्यामध्ये रज्जु जशी अद्वयस्वरूपाने राहते, त्याचप्रमाणे सर्व दृश्य पदार्थांच्यामध्ये तुरीय आत्मा अद्वयरूपाने, अभेदरूपाने स्थित राहतो.  तोच आत्मा ‘देव’ आहे.  द्योतनात्मकः इति देवः |  तुरीय आत्मा सर्व अवस्था, सर्व अध्यासाला प्रकाशमान करीत असल्यामुळे तोच प्रकाशस्वरूप, ‘देव’ आहे.  तो विश्व-तैजस्-प्राज्ञ या तीन चरणांपासून भिन्न असल्यामुळे तोच चतुर्थ म्हणजेच ‘तुरीय’ आत्मा असून तोच ‘विभु’ म्हणजे सर्वव्यापी आहे.  थोडक्यात तुरीय आत्मा हा सर्व दुःखांचे निवारण करणारा असून, अव्यय, अद्वय, प्रकाशस्वरूप, चतुर्थस्वरूप, सर्वव्यापी आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016




हरी ॐ -



Tuesday, January 12, 2021

जागृत-स्वप्न-सुषुपत्यावस्थेचे मिथ्यात्व | Futility of Wake-Dream-Sleep States

 



जागृतपुरुष, स्वप्नपुरुष, सुषुप्तपुरुष हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येत असताना रज्जूमधील सर्प वगैरेदि भासाप्रमाणे यांना असत्, मिथ्या, अध्यस्त का बरे मानावे ?  दोरीमधील सर्पाचा निरास झाल्यावर तो सर्प मिथ्या, असत् हे आम्हास मान्य आहे.  परंतु ‘अन्तःप्रज्ञ’ वगैरे यांना ‘असत्’ का मानावे ?

 

यावर आचार्य उत्तर देतात की, अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांच्या ‘ज्ञ’ स्वरूपामध्ये म्हणजेच ज्ञातृत्वामध्ये भेद नसेल तरी यांच्यामध्ये रज्जुमध्ये भासमान होणाऱ्या साप, जलधारा वगैरेदि विकल्पांच्याप्रमाणेच एकमेकांचा व्यभिचार होत असतो.  दोरीमध्ये ज्याला सापाचा भास होतो त्याला तेथे पाण्याची धार दिसत नाही किंवा ज्याला पाण्याची धार दिसते, त्याला साप दिसत नाही.  येथे व्यभिचार आहे, म्हणजेच एकाचा भास होत असेल, तर तेथे दुसऱ्या भासाचा अभाव असतो.

 

त्याचप्रमाणे एकाच आत्मस्वरूपामध्ये अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांचा भास होतो.  त्यावेळी त्यांच्या परस्परांच्यामध्ये व्यभिचार असतो.  ज्यावेळी आत्म्यामध्ये बहिष्प्रज्ञत्व असते तेव्हा तेथे अन्तःप्रज्ञत्व व प्रज्ञानघनत्व यांचा अभाव असतो.  जेव्हा अन्तःप्रज्ञत्व असते तेव्हा अन्य दोन्हींचा अभाव असतो.  तसेच जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था सुद्धा एकमेकांचा व्यभिचार करूनच उदयाला येतात.  स्वप्न-सुषुप्तीचा अभाव होऊन जागृतावस्था येते.  सुषुप्ति व जागृतीचा अभाव होऊन स्वप्नावस्था येते तर जागृत व स्वप्नाचा अभाव होऊन सुषुप्तिअवस्था येते.  एका अवस्थेचा भाव म्हणजेच दुसऱ्या दोन अवस्थांचा अभाव होय.  त्यामुळेच या सर्व अवस्था आणि अन्तःप्रज्ञ वगैरेदि आत्मे हे सर्व सर्पभ्रांतीप्रमाणेच मिथ्या, असत् स्वरूपाचे आहे, हे सिद्ध होते.

 

मात्र या सर्वांचे अधिष्ठान, तुरीय आत्मस्वरूप अव्यभिचारी असल्यामुळे तेच एकमेव सत्य आहे.  तुरीय आत्मस्वरूपाच्या ‘ज्ञ’ स्वरूपाचा कधीही, कोणत्याही अवस्थेमध्ये व्यभिचार, अभाव होत नाही.  म्हणूनच ते अव्यभिचारी स्वरूप आहे.  जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था येतात आणि जातात.  परंतु या सर्व अवस्थांच्यामध्ये नित्य-निरंतर, अखंडपणे, आत्मचैतन्यस्वरूप अव्यभिचारी स्वरूपाने विद्यमान असते.  तेच चैतन्यस्वरूप तीनही अवस्थांना प्रकाशमान करते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ




Thursday, January 7, 2021

रज्जुसर्पाचा विवेक | Rope-Snake Discrimination

 



ज्ञान हेच संसारनिवृत्तीचे यथायोग्य साधन आहे.  अन्य कोणतेही साधन नाही.  म्हणून जिज्ञासु साधकाने या मार्गामध्ये अन्य प्रमाणांचा विनाकारण शोध घेत बसू नये.  याचे कारण, जसे रज्जुसर्पाचा विवेक झाला की, त्याचवेळी रज्जुमधून सर्पाची निवृत्ति हे फल प्राप्त होताक्षणीच आपणास रज्जूचे ज्ञान होते.  आपण व्यवहारात ही गोष्ट अनेक वेळा अनुभवतो.  अंधुकशा प्रकाशात दोरी पडलेली असते.  ती पाहताक्षणी, हा साप आहे, असे आपल्याला वाटते.  ही कल्पना निर्माण होताक्षणीच आपल्या छातीत धस्स होते.  आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो.  सर्वांगाला घाम येतो.  आपण भीतिग्रस्त होतो.

 

त्यानंतर थोड्यावेळाने आपण त्या सापाचे निरीक्षण करायला लागतो.  खरच तो साप आहे की आणखी काही ?  निरखून काळजीपूर्वक पाहिले की, तो साप नाही.  हाच विवेकाचा उदय आहे.  या विवेकामुळे रज्जुमधील भासमान सर्पाची निवृत्ति होते.  हेच विवेकाचे फळ आहे.  सर्पभ्रमाची निवृत्ति झाली रे झाली की, आपोआपच अधिष्ठानाचे ज्ञान होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.  अध्यस्त वस्तूचा निरास होणे म्हणजेच अधिष्ठानाचे यथार्थ ज्ञान होणे होय.

 

त्याचप्रमाणे येथे अन्तःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, प्रज्ञानघन असे एकाच आत्म्याचे तीन विकल्प सांगितले.  या तिन्हीही अध्यस्त आत्म्यांचा निरास होणे म्हणजेच तुरीय आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे होय.  या अध्यासाचा निरास करण्यासाठी विवेकाची प्रक्रिया आवश्यक आहे.  तसेच ही विवेकप्रक्रिया स्वतःच्या बुद्धीने करावयाची नाही.  कारण आपली बुद्धि ही मर्यादित व रागद्वेषादि दोषांनी युक्त आहे.

 

म्हणून वेदांतशास्त्राच्या प्रमाणाच्या साहाय्यानेच साधकाने हा विवेक करावा.  वेदांतशास्त्रप्रमाणजनित विवेकाच्या साहाय्याने अध्यासाचा निरास केला की, अधिष्ठानभूत असणारे चतुर्थ, तुरीय, निर्विशेष, शुद्ध आत्मचैतन्यस्वरूप प्रकट होते.  

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ