Tuesday, February 16, 2021

जे पूर्वी आणि नंतर नसते | Non-Existent in Past and Future

 



विश्वामधील सर्व दृश्य पदार्थांचे निरीक्षण केले, त्यांची मीमांसा केली तर समजते की, हे सर्व दृश्य पदार्थ निर्मित-कार्य आहेत.  म्हणून त्या प्रत्येक पदार्थाला निश्चितपणे सुरुवात व शेवट, आदि व अंत आहे.  प्रत्येक पदार्थ हा उत्पत्ति-स्थिति-लययुक्त आहे.  त्यामुळे तो पदार्थ त्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी अस्तित्वात नसतो.  तसेच, नाशानंतर सुद्धा अस्तित्वात नसतो. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा, त्याच्या उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर अभाव असतो.

 

आचार्य म्हणतात की – आदौ अन्ते च यन्नास्ति वर्तमाने अपि तत्तथा |  जी वस्तु पूर्वी म्हणजेच तिच्या उत्पत्तीपूर्वी अस्तित्वात नव्हती व – अन्ते | म्हणजे तिच्या नाशानंतरही ती अस्तित्वात नसते.  ती वर्तमानकाळामध्ये, स्थितिकाळामध्ये असूनही, दिसूनही नसल्यासारखीच आहे. त्यामुळे घट डोळ्यांना दिसला तरी वस्तुतः घट ही सत्य वस्तु आहे का ?  यामध्ये विचार केला पाहिजे.  केवळ दिसते म्हणून सत्य म्हणता येणार नाही.  जे काळामध्ये निर्माण होते, ते सर्वच नाशवान आहे.

 

भगवान म्हणतात –        

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः | 

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ||         (गीता अ. २|१६)   

असत् पदार्थांना कधीही अस्तित्व नसते आणि सत् पदार्थांचा कधीही अभाव नसतो. तत्त्वदर्शी, आत्मज्ञानी लोक याप्रकारे सत्असत् या दोन्हीही वस्तूंचे स्वरूप यथार्थ व स्पष्टपणे जाणतात.  नित्यानित्यवस्तुविवेकामुळे त्यांना खरोखरच सत्य व असत्य समजलेले असते. या विश्वामध्ये, दृश्य विषयांच्यामध्ये कधीही तथ्य, सार नाही, हे त्यांना पटते.  म्हणूनच तत्त्वज्ञानी पुरुष दृश्य, अनित्य अनात्मविषयांच्यापासून मनाने पूर्णतः निवृत्त होतात.

 

परंतु आत्मअज्ञानी, अविवेकी लोक मात्र दृश्यालाच सत्य मानतात.  दृश्य विषयांनाच नको इतके महत्त्व देऊन त्यामध्ये आसक्त होतात.  अनित्य, अशाश्वत विषयांच्या उपभोगांच्यामध्ये रात्रंदिवस रममाण होतात.  कामक्रोधादि विकारांच्या आहारी जाऊन सद्गुणांचा, सदाचाराचा, धर्माचरणाचा त्याग करतात.  पापाचारामध्ये, अधर्मामध्ये प्रवृत्त होऊन स्वतःचे अधःपतन करवून घेतात.  या सर्व अनर्थाचे कारण एकच, आणि ते म्हणजे – दृश्य विषयांना दिलेले सत्यत्व !  म्हणूनच साधकाने दृश्य विषयामधील मिथ्यात्व जाणण्याचा श्रुति, युक्ति यांच्या साहाय्याने सर्वतोपरी प्रयत्न करावा.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ