Tuesday, February 2, 2021

गुरु-शिष्य द्वैताची कल्पना | Master-Disciple Duality is Imagination

 



जर कोणी गुरु-शिष्य या द्वैताची कल्पना केली असेल तर ती निश्चितच निवृत्त होते.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी निर्माण केलेला गुरु-शिष्य हा भेद किंवा विकल्प, हे द्वैतही मिथ्या आहे.  गुरु-शिष्य हा भेद केवळ आत्मज्ञानाच्या उपदेशासाठी निर्माण केलेला आहे.  उपदेशानंतर जेव्हा अद्वैत आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हे द्वैत शिल्लक राहत नाही.

 

येथे आचार्य सांगतात की, गुरु-शिष्य हा भेद केवळ उपदेशासाठी निर्माण केला जातो.  तुरीय आत्मा हा अद्वयस्वरूप आहे.  त्याच्यामध्ये द्वैताचा अत्यंत अभाव आहे.  असे जरी असेल तरी आत्मस्वरूपाचे हे अभेद ज्ञान शिष्याला गुरूंच्याशिवाय प्राप्त होत नाही.  शिष्य कितीही बुद्धिमान असेल तरी त्याने स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून आत्मज्ञान घेऊ नये.  कारण बुद्धीमध्ये व्यक्तिगत रागद्वेष असून बुद्धीला मर्यादा असतात.  श्रुति म्हणते –

आचार्याद्ध वै विद्या विदिता साधिष्ठं प्रापत् |                   (छांदो. उप. ४|९|३)

गुरूंच्याकडून प्राप्त झालेली विद्याच आत्मप्राप्ति करून देते.

 

या श्रुतींच्यामधून या अध्यात्ममार्गामध्ये गुरूंची अनिवार्यता स्पष्ट केली आहे.  गुरूंच्याशिवाय आत्मज्ञान व आत्मज्ञानाची अभेद दृष्टि मिळणे केवळ अशक्य आहे.  परंतु गुरूंच्या मुखामधून वेदांतश्रवण केले की, गुरूंच्याच कृपेने शिष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो.  त्याच्या अंतःकरणामधील विषयासक्ति गळून पडते.  परमेश्वराविषयी उत्कट भक्तीचा भाव उदयाला येतो.  अंतःकरण शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, विषयासक्तिरहित व अंतर्मुख होते.  या शुद्ध अंतःकरणामध्ये वेदांतशास्त्राच्या श्रवणामधून आत्मज्ञान उदयाला येते.

 

शास्त्र, ईश्वर व गुरु यांच्या असीम कृपेने साधकाला तत्त्वाचे ज्ञान, तत्त्वाची दृष्टि व त्या अभेद, अद्वैत तत्त्वामध्ये निष्ठा प्राप्त होते.  या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हा भेदही गळून पडतो.  गुरु-शिष्य दोघेही परब्रह्मस्वरूप होतात.  उपाधिजन्य भेदांचा, विकल्पांचा अत्यंत अभाव होतो.  म्हणुनच उपदेशाचे फळरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर पारमार्थिक तत्त्वामध्ये कोणताही द्वैतविकल्प राहत नाही, असे येथे आचार्यांनी स्पष्ट केले आहे.


 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ