सामान्यतेने द्रष्टा, म्हणजेच सर्व दृश्य पदार्थांना
पाहणारा मनुष्य, दृष्यालाच सत्य मानतो. जे
जे दिसते, ते सत्य आहे, असे मानतो. परंतु
या निर्णयामागे विवेक नाही. दृश्य
पदार्थांच्यामध्ये कोणताही निश्चयात्मक योग्य विवेक, विचार न केल्यामुळेच द्रष्टा
दृश्य पदार्थांना सत्यत्व देतो. स्वप्नावस्थेमध्ये
आपण अनेक दृश्य पदार्थ पाहतो. परंतु स्वप्नामधून
जागे झाल्यावर आपणच, स्वप्नामधील सर्व दिसलेले – दृश्य पदार्थ खोटे आहेत, असे
म्हणतो. म्हणूनच येथे आचार्य या दृष्टांतानुसार
व्याप्ति (युक्ति) सांगतात. यत् दृष्टं
तत् असत्यम् इति | जे जे दृश्य असते,
ते सर्व असत् मिथ्यास्वरूपच असते, हा
युक्तिवाद स्वप्नाच्या दृष्टांतावरून सिद्ध होतो.
मग याच स्वप्नदृष्टांताने व उपरोक्त युक्तिवादाने
जागृतावस्थेमधील पदार्थांचे मिथ्यात्व सिद्ध होते. जागृतीमधील पदार्थ हे स्वप्नपदार्थांच्याप्रमाणे
दृश्य आहेत. हा पहिला भाग. जे जे दृश्य असते, ते असत्-मिथ्या असते, या व्याप्तीमुळे जागृत पदार्थ हे दृश्य असून
मिथ्या व असत् स्वरूपाचे आहेत, हे सिद्ध होते. म्हणूनच जागृतपदार्थ व स्वप्नपदार्थ
यांच्यामधील दृश्यत्व व मिथ्यात्व हे दोन धर्म समानच आहेत.
मग जागृत पदार्थ व स्वप्नपदार्थ हे दोन्हीही
दृश्य व मिथ्या असतील तर मग या दोन्हींच्यामध्ये काय फरक आहे ? आचार्य स्पष्ट करतात की, या दोन्हींच्यामध्ये
अन्तःस्थितत्व व संवृतत्व या दोन धर्मांच्यामध्ये भेद आहे. म्हणजेच स्वप्नामधील पदार्थ हे शरीराच्या आत
संकुचित स्थानामध्ये सूक्ष्म वासनांच्या रूपाने विद्यमान असतात, तर जागृतावस्थेमधील पदार्थ हे शरीराच्या बाहेर, स्थूलरूपाने विद्यमान असतात.
स्वप्नावस्थेमधील पदार्थ हे स्वप्नपुरुषाला दिसले तरी ते मनोकल्पित असतात. मुळात कोणत्याही पदार्थांना दिलेले दृश्यत्व हेच मनाने कल्पिलेले असते. मन असेल, मनाची वृत्ति असेल तरच दृश्य पदार्थ अनुभवायला येतात. मनाची वृत्ति नसेल तर पदार्थांचा अनुभव देखिल येत नाही. मनानेच वस्तूंच्या, पदार्थांच्या दृष्यत्वाला सत्ता दिलेली आहे. म्हणून दृश्यत्व हेच मनोकल्पित आहे, हे प्रथम समजावून घेतले पाहिजे. हे समजले तर आपोआपच जागृतावस्थेमधील दृश्य पदार्थही मिथ्या, मनोकल्पित आहेत, हे समजण्यास वेळ लागत नाही.
- हरी ॐ–