Sunday, April 19, 2015

साधु – अनन्य भक्त | Saint – Ardent Devotee


जेव्हा दोन साधु किंवा अनन्य भक्त एकत्र येतात त्यावेळी ते व्यावहारिक, सामाजिक, राजकीय घडामोडींची चर्चा करीत नाहीत.  त्यांना त्यामध्ये मुळीच रस नसतो.  त्यांना खरा आनंद होत असेल तर परमेश्वराचे स्वरूप आठवण्याने, चिंतनाने, त्यांच्या विभूति, माहात्म्य, कल्याणगुण गाण्याने, त्यावेळी ते स्वतःचे राहातच नाहीत.  त्यांचा रोम न् रोम भगवंताचे गुणगान गात असतो.  भावनांचा उद्रेक होऊन गुणगानामध्ये विरघळून गेलेले असतात.

शरीराचे भान विसरून, तहानभूक, देशकाळ विसरून तल्लीन झालेले असतात.  वेडे झालेले असतात.  शरीरावर रोमांच आलेले, कंठ दाटून आलेले, आनंदाश्रूंनी भारावलेले, देववेडे लोक अत्यंत दुर्लभ असतात.  ते परमानंदामध्ये आकंठ डुंबतात.  म्हणून म्हणतात, एकवेळ ईश्वरदर्शन घेतले नाही तरी चालेल परंतु साधूंचे दर्शन मात्र घ्यावे, कारण ‘साधुदर्शन हेच ईश्वरदर्शन होय’.

अनंत आणि अपार परब्रह्मस्वरूप सुखसागरामध्ये ज्याचे चित्त लीन झालेले आहे, त्या अनन्य भक्ताचे कुळ पवित्र होते.  त्याची माता अशा भक्ताला जन्म दिल्याने कृतार्थ होते.  वसुंधरा सनाथ होऊन कृतकृत्य होते.  असा हा अनन्य भक्त आपले मातृकुल आणि पितृकूल दोन्हींचा उद्धार करतो. त्याच्या तपःसामर्थ्याने आणि भक्तीच्या बलाने सर्व पितर पावन, मुक्त होतात.  आपल्या कुलामध्ये अनेक जन्मांच्या पुण्याईने भगवद्भक्त जन्माला आल्यामुळे त्यांना कृतकृत्यतेचा आनंद मिळतो.  तेही आनंदाने तृप्त होतात.  जन्मदात्री माता कृतार्थ होते.

शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एक भगवद्भक्त पुत्र हजारपटीने चांगला आहे, कारण भक्त जन्माला येणे अत्यंत दुर्लभ आहे.  कोट्यावधी पुत्रांच्यामध्ये एखादाच सत्कर्म, सदाचार, सद्विचाराने प्रवृत्त झालेला श्रद्धावान, सर्वगुणसंपन्न भगवद्भक्त जन्माला येतो.  त्याच्या स्पर्शाने वसुंधरा पावन होते.  सनाथ होते.  कृतकृत्य होते.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Friday, April 10, 2015

अवर्णनीय प्रेम | Love is Indescribable


भगवत्प्रेम जरी अवर्णनीय असले, तरीही ते बाहेर जीवनात व्यक्त होत असल्यामुळे अल्पशा प्रमाणात का होईना वर्णन करता येईल असे कोणीतरी म्हणेल.  व्यवहारात प्रेम करणे म्हणजे काय ?  ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीची मी प्रशंसा करतो.  स्तुति करतो. वेळप्रसंगी त्या व्यक्तीची निंदा करून तिच्यावर रागावतो.  म्हणजे या प्रेमात स्तुति आहे, निंदा आहे.  कधी त्या व्यक्तीला खायला-प्यायला देऊन प्रेम व्यक्त करतो.  तर कधी तिच्या आरोग्यासाठी हे खाऊ नकोस म्हणुनही सांगतो.  म्हणजेच व्यवहारातील प्रेम वर्णन करता येईल.

उत्कट प्रेमाचे लक्षण कोणते ?  प्रेम ही एक वस्तु नाही.  प्रेमाचा भाव बाह्य आविष्कारामधून, कर्मामधून, संपूर्ण व्यक्त होईल असे नाही.  खायला घालणे, स्तुति करणे म्हणजे प्रेम नाही.  प्रशंसा केली नाही म्हणजे प्रेम नाही असे म्हणणे योग्य नाही.  प्रेमाचे वर्णन कसे करणार ?  माता आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळावर, तसेच जन्मल्यापासून तिच्या अंतापर्यंत व्यक्त होणारे बहुरंगी प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य वर्णन करता येत नाही.  तर आई होऊन ते अनुभवावे लागते.

म्हणजेच प्रेम शब्दांनी वर्णन करण्याचा विषय नाही.  प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे.  प्रेमाच्या भावात अनुभूति आहे.  तहानेने मन जसे आसुसलेले असते त्याप्रमाणे प्रेमाची तृष्णा कधीही शमत नाही.  तर ती अधिक वाढतच असते.  त्या भावामध्ये प्रियतम परमेश्वरामध्ये तल्लीन होतो.  तन्मय होतो.  त्याच्या चिंतनात देहभान विसरतो.  त्यात अंतरिक शांति आहे.  ते देश, काल, वस्तु, जात, धर्म, पंथ यांनी बद्ध नाही.  ते दाखविता येत नाही.  सांगता येत नाही.  ते अवर्णनीय आहे.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Friday, April 3, 2015

आमचे प्रेम गौण का आहे ? | Why Is Our Love Inferior?


प्रेमाचा उत्कट भाव सर्वांच्या हृदयामध्ये अनुभवण्यास का येत नाही ?  जो भाव मनुष्याला शुद्ध करतो, ईश्वरचरणांवर समर्पण करावयास लावतो, मनुष्याला ईश्वराभिमुख बनवितो, नव्हे ईश्वरस्वरूप बनवून जीवन तृप्त करतो, कृतकृत्य करतो, तो भाव आमच्यात का बरे उदयाला येत नाही ?  याचे उत्तर नारदमहर्षि पुढील सूत्रात देतात –

प्रकाशते क्वापि पात्रे |
एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये (ते प्रेम) प्रकाशित होते.

हे अनिर्वचनीय प्रेम एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये प्रकाशित होते.  याचाच अर्थ हे परमप्रेम सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही.  अनुभवण्यास येत नाही, कारण आम्ही जे प्रेम करतो ते व्यावहारिक प्रेम आहे.  मोहयुक्त प्रेम आहे.  येथे शंका निर्माण होईल की, आमचे प्रेम इतके कामुक का आहे ?  जसा आमच्या प्रेमाचा विषय असतो तसे आमचे प्रेम होते. आमच्या प्रेमाचा विषयच अशुद्ध, जड स्वरूपाचा आहे.  मग ते विषय असोत, लोक असोत, नातेवाईक असोत अगर स्थावर-जंगमादि मालमत्ता असो.  हे सर्व प्रेमाचे अशुद्ध विषय आहेत.  ते प्रेम विकार, वासनांनी ओतप्रोत भरलेले असून उपभोगण्यास प्रवृत्त करणारेच आहे. तेथे परमप्रेम उत्पन्न होणार नाही.

जर प्रेम तात्पुरते, तात्कालिक असेल, काळाच्या ओघात कमी कमी होत असेल, तसेच प्रेमाचा विषय सतत बदलत असेल तर ते प्रेम नाहीच.  ती फक्त कामुकता आहे.  ते अशुद्ध, राग-द्वेषांनी युक्त असलेले प्रेम आहे.  मग शुद्ध, परमप्रेम हवे असेल तर निश्चितपणे प्रेमाचा विषयही तितकाच शुद्ध, पवित्र, मंगलमय हवा.  तो जड, प्राकृत नसून चिन्मय, चैतन्यस्वरूप, अप्राकृत असला पाहिजे.  याप्रमाणे विषय जर शुद्ध असेल तर प्रेम शुद्ध असेल आणि असे शुद्ध प्रेम शुद्ध हृदयामध्येच निर्माण होईल.  हे शुद्ध हृदय अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006




- हरी ॐ

Friday, March 27, 2015

संसाराचा निरास का करावा ? | Why to Ward-off Illusion?


संसाराचा निरास का बरे करावा ?  याचे कारण सांगतात की, संसार हा – दुःखस्वरूपत्वात् | संसार दुःखस्वरूप, अत्यंत दुःख देणारा असल्यामुळे संसाराचा निरास करणेच योग्य आहे.  नदीचा प्रवाह जसा अखंड चाललेला आहे, नित्य अव्याहतपणाने नदी सतत वाहत राहते, तसाच हा संसार जन्मानुजन्मांच्यापासून अखंडपणाने प्रवाहीत आहे.  म्हणून आपला संसार फक्त या शरीरापुरताच मर्यादित नाही, तर एका मृत्युपासून दुसऱ्या मृत्यूकडे प्रवाहीत होतो. याप्रमाणे संसाराला नित्यप्रवाहीत्व आहे.

आज जो संसार, यातना, दुःख, नैराश्य, वैफल्य मी अनुभवतो, तेच कमीजास्त फरकाने उद्या-परवा-जीवनभर अनुभवतो.  यालाच ‘नित्य प्रवाहीतता’ असे म्हणतात.  हे संसार चक्र अविद्येच्या शक्तीमुळे सुव्यवस्थित चालू आहे.  अविद्येचा इतका प्रचंड प्रभाव आहे की, संसार एक जन्म नव्हे, जन्मानुजन्मे अनादि काळापासून अखंडपणे चालू आहे.  अविद्येमधून कर्तृत्व, भोक्तृत्व, त्यामधून कर्म आणि कर्मामधून कर्मफळ आणि त्यामधून सुखदुःखात्मक असणारा हा सर्व संसार निर्माण होतो.  संसारामध्ये अजिबात खंड पडत नाही.  बाकी सर्व ठिकाणी खंड पडेल.  अभ्यास, साधना, उपासना यामध्ये खंड पडेल.  परंतु, संसार मात्र अखंड, अव्याहतपणे चालू आहे.

या संसाराचे स्वरूपच दुःख आहे.  म्हणून कितीही संसार तुम्ही करा, त्यामधून तुम्हाला कधीही शुद्ध, निर्भेळ आनंद मिळू शकत नाही.  जसे, कोळसा कितीही उगाळला, तरी काळा तो काळाच राहतो.  तसेच हा संसार तुम्ही कितीही ठीकठाक करण्याचा प्रयत्न करा, कितीही यथार्थ करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही जितका कराल तितका तो संसार तुम्हाला आनंदवर्धन न करता, तो संसार दुःख, यातना, नैराश्य, वैफल्य, जन्म, मृत्यू यालाच कारण होतो.  सुख आल्यासारखे वाटते, परंतु नियती एकामागे एक असे आघात करते की, हा जीव पुन्हा या सर्व दुःखांनी बद्ध होतो.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Saturday, March 21, 2015

अनादि आणि अनंत संसार | Beginning-less and Endless Illusion


संसाराला अनादि आणि अनंत ही दोन विशेषणे वापरली आहेत.  संसाराला सुरुवातही नाही आणि शेवट सुद्धा नाही.  तो अनादि आहे, त्याला सुरुवात नाही, कारण या संसाराचे उपादान कारण अविद्या आहे.  अविद्या ही अनादि आहे.  म्हणूनच कोणत्याही वस्तूचे अज्ञान केव्हा निर्माण झाले ?  हे सांगता येत नाही.  उदा. माझ्यामध्ये फ्रेंच भाषेचे अज्ञान केव्हापासून निर्माण झाले, हे सांगता येत नाही.  म्हणून अज्ञान हे अनादि आहे.  अज्ञानाला निश्चित सुरुवात नाही.

जसे कारण तसे कार्य, या न्यायाने अज्ञानाचे कार्य असणारा संसार सुद्धा अनादि आहे.  म्हणूनच संसाराला सुरुवात कोठून झाली ?  हे सांगता येत नाही.  जसे, वृक्ष प्रथम की बीज प्रथम ?  हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.  तसेच संसार केव्हा निर्माण झाला ?  हे सांगता येत नाही.

तसेच, येथे संसाराचे दुसरे विशेषण अनंत हे आहे.  ज्याचा अंत, नाश होत नाही, त्याला ‘अनंत’ असे म्हणतात.  संसार हा अनंत आहे.  अनेक शरीरे जन्माला आली आणि मरण पावली, परंतु शरीराचा नाश म्हणजे संसाराचा नाश नव्हे.  आपण मरण पावलो की, सर्व संसारामधून, दुःखांच्यामधून मुक्त होऊ, अशी आपली कल्पना असते.

परंतु जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कर्मांनी, कोणत्याही साधनेने या संसाराचा ध्वंस होणे शक्य नाही.  तोपर्यंत हा संसार अनंत आहे.  अशा या अनादि आणि अनंत संसाराचे हनन करणे, निरास करणे हेच प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007




- हरी ॐ

Saturday, March 14, 2015

विश्वनिर्मिती – अग्नि व ठिणग्या | Creation - Fire and Sparks


ज्याप्रमाणे, प्रज्ज्वलित झालेल्या अग्नीमधून हजारो ठिणग्या निर्माण होऊन बाहेर पडतात.  अग्नीपासून अग्नीच्या ठिणग्या, अग्नीचे अवयव निर्माण होतात.  अग्नीच्या ठिणग्या अग्नीप्रमाणेच आहेत, म्हणजेच अग्नीचे जे जे गुणधर्म आहेत, तेच ठिणग्यांचे गुणधर्म आहेत.  याप्रमाणे अक्षरामधून अनेक प्रकारचे देह, ऊर्ध्व, अधोयोनि वगैरेदि अनेक जीव निर्माण होतात.  अग्नीमधून ठिणग्या निर्माण होतात, तसे अक्षरामधून हे विश्व निर्माण होते.  म्हणजेच प्रत्येक विषय, प्रत्येक जीव हा एकेक ठिणगी झाला.  हा दृष्टांत आहे.

या दृष्टान्तामध्ये विचार केला तर समजते की, जो प्रज्ज्वलित झालेला अग्नि आहे, त्या अग्नीमधून ठिणग्यांची निर्मिती होते.  म्हणजेच यामधून सूचित केले की, अग्नि हा दोन प्रकारचा आहे.  एक अग्नि आहे अव्यक्त अग्नि.  अव्यक्त अग्नि म्हणजेच प्रज्ज्वलित होण्यापूर्वीचा अग्नि होय.  तो अग्नि प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही.  जेथे जेथे लाकूड आहे, तेथे लाकडामध्ये अग्नि आहेच.

परंतु अग्नि लाकडामध्ये दिसत नाही.  याचे कारण तो अग्नि अव्यक्तावस्थेमध्ये, सूक्ष्म अवस्थेमध्ये, रंगरूपरहित अवस्थेमध्ये आहे.  तोच अव्यक्त अग्नि व्यक्त होतो.  त्या अग्नीला नामरुपरंग, अनेक प्रकारचे आकार प्राप्त होतात.  अव्यक्त अग्नीमधून कधीही ठिणग्या निर्माण होत नाहीत.  अव्यक्त अग्नीमधून प्रथम व्यक्त अग्नि आणि व्यक्त अग्नीमधूनच सविशेष, सगुण, सोपाधिक कार्यरूप ठिणग्या निर्माण होतात.

तसेच, निर्गुण, निर्विशेष, अव्यक्त अक्षरामधून एकदम विश्व निर्माण होत नाही.  व्यक्त झालेल्या सगुण, सविशेष, सोपाधिक अक्षरामधून विश्व निर्माण होते.  मायाउपाधियुक्त अक्षरामधून विश्व निर्माण होते.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Saturday, March 7, 2015

विश्वनिर्मितीचे कारण | Cause of Creation of World


जसे, अग्नीमधून ठिणग्यांची निर्मिती होते, त्याचप्रमाणे अक्षरब्रह्मामधून विश्वाची निर्मिती होते.  कारणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊच शकत नाही.  जेथे जेथे कार्य आहे, तेथे तेथे कारण हे असलेच पाहिजे.  तुम्हाला दिसो किंवा न दिसो, समजो किंवा न समजो, कारण हे आहेच.

साधा घट असेल, तर त्याच्यामागे माती आणि कुंभार आहे.  कुंभार जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसेल, तरी आपण मान्य करतो की, घट निर्माण करण्यासाठी कोणीतरी निर्माता-कारण हे असलेच पाहिजे.  तसेच हे जगड्व्याळ विश्व जर निर्माण झाले असेल, तर त्याच्यामागे काहीतरी कारण हे आहेच आणि तेच कारण याठिकाणी श्रुति सांगते की, अक्षरस्वरूप परब्रह्म हेच जगत्कारण आहे.

दृष्टांताप्रमाणे जर क्रमाने पाहिले तर समजते की, अव्यक्त अग्नीमधून निर्मिती होत नाही, तर सविशेष, सोपाधिक अग्नीमधून ठिणग्या निर्माण होतात. तसेच, याठिकाणी अव्यक्त, निर्गुण, निर्विशेष अक्षरामधून एकदम विश्वाची निर्मिती होऊ शकत नाही, कारण – उपादानकारणअभावात्| निर्मितीसाठी दोन करणे आवश्यक आहेत.  निमित्तकारण म्हणजेच कर्ता आणि उपादानकारण म्हणजेच सामग्री होय.  म्हणजेच घटनिर्मितीसाठी माती पाहिजे आणि कुंभार सुद्धा पाहिजे.

तसेच, विश्वनिर्मितीसाठी सचेतन कर्ता तसेच सामग्री म्हणजेच उपादानकारण आवश्यक आहे.  निर्गुण, निर्विशेष परब्रह्म निर्मिती करू शकत नाही, कारण – अविकारीस्वरुपत्वात् |  त्या स्वरूपामध्ये कोणताही विकार, बदल होऊ शकत नाही.  अक्षरस्वरुपापासून विश्व निर्माण व्हावयाचे असेल, तर परब्रह्म सगुण, साकार, सोपाधिक होणे आवश्यक आहे.  निर्गुण, निर्विशेष परब्रह्माला माया ही उपाधि प्राप्त झाल्यावर ते सगुण, सविशेष, सोपाधिक होते.  त्यालाच ‘मायाशबलब्रह्म’ असे म्हणतात. त्या सगुण, सविशेष परब्रह्मामधून संपूर्ण विश्वाची निर्मिती होते.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ