ज्याप्रमाणे,
प्रज्ज्वलित झालेल्या अग्नीमधून हजारो ठिणग्या निर्माण होऊन बाहेर पडतात. अग्नीपासून अग्नीच्या ठिणग्या, अग्नीचे अवयव
निर्माण होतात. अग्नीच्या ठिणग्या
अग्नीप्रमाणेच आहेत, म्हणजेच अग्नीचे जे जे गुणधर्म आहेत, तेच ठिणग्यांचे गुणधर्म
आहेत. याप्रमाणे अक्षरामधून अनेक प्रकारचे
देह, ऊर्ध्व, अधोयोनि वगैरेदि अनेक जीव निर्माण होतात. अग्नीमधून ठिणग्या निर्माण होतात, तसे
अक्षरामधून हे विश्व निर्माण होते. म्हणजेच
प्रत्येक विषय, प्रत्येक जीव हा एकेक ठिणगी झाला. हा दृष्टांत आहे.
या
दृष्टान्तामध्ये विचार केला तर समजते की, जो प्रज्ज्वलित झालेला अग्नि आहे, त्या
अग्नीमधून ठिणग्यांची निर्मिती होते. म्हणजेच
यामधून सूचित केले की, अग्नि हा दोन प्रकारचा आहे. एक अग्नि आहे अव्यक्त अग्नि. अव्यक्त अग्नि म्हणजेच प्रज्ज्वलित
होण्यापूर्वीचा अग्नि होय. तो अग्नि
प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. जेथे जेथे
लाकूड आहे, तेथे लाकडामध्ये अग्नि आहेच.
परंतु
अग्नि लाकडामध्ये दिसत नाही. याचे कारण तो
अग्नि अव्यक्तावस्थेमध्ये, सूक्ष्म अवस्थेमध्ये, रंगरूपरहित अवस्थेमध्ये आहे. तोच अव्यक्त अग्नि व्यक्त होतो. त्या अग्नीला नामरुपरंग, अनेक प्रकारचे आकार
प्राप्त होतात. अव्यक्त अग्नीमधून कधीही
ठिणग्या निर्माण होत नाहीत. अव्यक्त
अग्नीमधून प्रथम व्यक्त अग्नि आणि व्यक्त अग्नीमधूनच सविशेष, सगुण, सोपाधिक
कार्यरूप ठिणग्या निर्माण होतात.
तसेच,
निर्गुण, निर्विशेष, अव्यक्त अक्षरामधून एकदम विश्व निर्माण होत नाही. व्यक्त झालेल्या सगुण, सविशेष, सोपाधिक
अक्षरामधून विश्व निर्माण होते. मायाउपाधियुक्त अक्षरामधून विश्व निर्माण होते.
- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment