Sunday, April 19, 2015

साधु – अनन्य भक्त | Saint – Ardent Devotee


जेव्हा दोन साधु किंवा अनन्य भक्त एकत्र येतात त्यावेळी ते व्यावहारिक, सामाजिक, राजकीय घडामोडींची चर्चा करीत नाहीत.  त्यांना त्यामध्ये मुळीच रस नसतो.  त्यांना खरा आनंद होत असेल तर परमेश्वराचे स्वरूप आठवण्याने, चिंतनाने, त्यांच्या विभूति, माहात्म्य, कल्याणगुण गाण्याने, त्यावेळी ते स्वतःचे राहातच नाहीत.  त्यांचा रोम न् रोम भगवंताचे गुणगान गात असतो.  भावनांचा उद्रेक होऊन गुणगानामध्ये विरघळून गेलेले असतात.

शरीराचे भान विसरून, तहानभूक, देशकाळ विसरून तल्लीन झालेले असतात.  वेडे झालेले असतात.  शरीरावर रोमांच आलेले, कंठ दाटून आलेले, आनंदाश्रूंनी भारावलेले, देववेडे लोक अत्यंत दुर्लभ असतात.  ते परमानंदामध्ये आकंठ डुंबतात.  म्हणून म्हणतात, एकवेळ ईश्वरदर्शन घेतले नाही तरी चालेल परंतु साधूंचे दर्शन मात्र घ्यावे, कारण ‘साधुदर्शन हेच ईश्वरदर्शन होय’.

अनंत आणि अपार परब्रह्मस्वरूप सुखसागरामध्ये ज्याचे चित्त लीन झालेले आहे, त्या अनन्य भक्ताचे कुळ पवित्र होते.  त्याची माता अशा भक्ताला जन्म दिल्याने कृतार्थ होते.  वसुंधरा सनाथ होऊन कृतकृत्य होते.  असा हा अनन्य भक्त आपले मातृकुल आणि पितृकूल दोन्हींचा उद्धार करतो. त्याच्या तपःसामर्थ्याने आणि भक्तीच्या बलाने सर्व पितर पावन, मुक्त होतात.  आपल्या कुलामध्ये अनेक जन्मांच्या पुण्याईने भगवद्भक्त जन्माला आल्यामुळे त्यांना कृतकृत्यतेचा आनंद मिळतो.  तेही आनंदाने तृप्त होतात.  जन्मदात्री माता कृतार्थ होते.

शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एक भगवद्भक्त पुत्र हजारपटीने चांगला आहे, कारण भक्त जन्माला येणे अत्यंत दुर्लभ आहे.  कोट्यावधी पुत्रांच्यामध्ये एखादाच सत्कर्म, सदाचार, सद्विचाराने प्रवृत्त झालेला श्रद्धावान, सर्वगुणसंपन्न भगवद्भक्त जन्माला येतो.  त्याच्या स्पर्शाने वसुंधरा पावन होते.  सनाथ होते.  कृतकृत्य होते.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

No comments:

Post a Comment