Showing posts with label Divine. Show all posts
Showing posts with label Divine. Show all posts

Tuesday, November 21, 2023

ईश्वराभिमुख वैदिक कर्मे | Divine Vaidik Actions

 



सर्व वैदिक कर्मांच्या अनुष्ठानाने चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने जीव ईश्वरस्वरूपाला प्राप्त होतात.  म्हणून प्रत्येक जीवाने वैदिक कर्मांचे अनुष्ठान केले पाहिजे.  ही कर्मे ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपापर्यंत नेणारी आहेत.

 

अहं यज्ञः – यज्ञ म्हणजे स्मार्त कर्म.  स्मृतींनी प्रतिपादित केलेली कार्ये म्हणजे स्मार्त कर्मे होय.  यांनाच काही वेळेला धार्मिक कर्मे असे म्हटले जाते.

 

अहं स्वधा – पितरांना श्राद्धादि कर्मामध्ये पिंडरूपाने दिलेल्या अन्नाला स्वधा म्हणतात.  पितृयज्ञ केवळ शारीरिक कर्म नसून त्यामागे श्रद्धा आणि प्रेमाचा भाव आहे.  त्यामुळे हेही कर्म चित्तशुद्धीचे साधन होते.

 

अहं औषधम् – औषध तसेच व्रीहियवादि सर्व प्रकारचे अन्न माझेच स्वरूप आहे.  भगवान म्हणतात त्याप्रमाणे चतुर्विध अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे.  म्हणून वेदामध्ये म्हटले आहे – अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |  अन्नं न निन्द्यात् |  तत् व्रतम् |  अन्न हे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे अन्नाची कधीही निंदा, तिरस्कार करू नये.  ते शुद्ध वृत्तीने खावे.  अन्नानेच मनुष्याच्या मनाची जडण-घडण होत असते.  शुद्ध आणि प्रसन्न वृत्तीने खाण्यामध्ये अंतरिक सुख आणि आनंद आहे.  विश्वामधील सर्व प्राणिमात्रांचे पोषण, वर्धन आणि रक्षण करणारे अन्न असल्यामुळे उपभोग म्हणून न खाता परमेश्वरस्वरूप आहे असे जाणून आदरयुक्त भावाने खावे.  ही सुद्धा एक साधना आहे.  स्वधा म्हणजे सर्व प्राणीमात्र जे अन्न खातात ते व्याधींचे नाश करणारे औषध होय, असाही अर्थ घ्यावा.

 

अहं मंत्रः – पितृयज्ञ किंवा देवतायज्ञामध्ये ज्याच्या साहाय्याने हवन करतात, ते मंत्र माझे स्वरूप आहे.  मंत्रांच्या साहाय्याने हवन करून देवांना प्रसन्न करून मनुष्य आपली इच्छा पूर्ण करू शकतो.  देवतांना संतुष्ट करून त्यांची कृपा प्राप्त करता येते.  म्हणून मंत्र हे माझे स्वरूप आहे.

 

तसेच यज्ञामध्ये हवन केले जाते ते तूप आणि ज्याच्यामध्ये हवन केले जाते, तो अग्नि सुद्धा माझे स्वरूप आहे.  थोडक्यात यज्ञामधील अग्नि, हवन करण्यासाठी असलेली सामग्री, मंत्र आणि कर्म सुद्धा माझे स्वरूप आहे.  सर्व ब्रह्मस्वरूप आहे हा भाव ठेवावा.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–




Monday, March 26, 2018

दिव्यत्वाचा मार्ग | Divine Path



खरे युद्ध, संघर्ष बाहेर नसून आपल्या आतच आहे.  भगवंतांनी अर्जुनाला घरामध्ये, अरण्यामध्ये अथवा हिमालयामध्ये उपदेश दिलेला नसून युद्धास सज्ज असणाऱ्या अर्जुनाला रणभूमीवर आत्मज्ञानाचा, श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे.  युद्धभूमीवर अर्जुन भगवंतांना दोन सैन्यांच्यामध्ये रथ नेण्यास सांगतो.  त्यावेळी तो आपल्यासमोर युद्धासाठी आपल्याविरुद्ध उभे असणारे आदरणीय पितामह भीष्माचार्य, पूजनीय कुलगुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, स्वतःचे बांधव, सगे-सोयरे या सर्वांना पाहातो.  त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक भयंकर मोठा संघर्ष निर्माण होतो. त्याची बुद्धि भ्रष्ट होते.  विचारशक्ति कुंठित होते.  

त्यावेळी अर्जुनाचा कर्तुं-अकर्तुं अहंकार भगवंतांना पूर्णपणे शरण जातो.  तो भगवंतांना म्हणतो, “हे भगवन्, आज माझे मन पूर्णतः भ्रमिष्ट झालेले आहे. काय करावे आणि काय करू नये, हे मला समजत नाही.  मी अत्यंत व्याकूळ, अगतिक झालो आहे.  शरण आलेल्या माझ्यावर आपण कृपा करा आणि जे मला श्रेयस्कर, हितकारक असेल ते सांगा.”  

याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रणभूमि आहे.  रणभूमीमध्ये १) कौरव – आसुरीगुणसंपत्ति आणि २) पांडव – दैवीगुणसंपत्ति असे दोन पक्ष आहेत.  कौरव संख्येने जास्त असून पांडव मात्र कमी आहेत.  म्हणजेच जास्त असणारे दुर्गुण आणि कमी असणारे सद्गुण यांच्यामध्ये सतत द्वंद्व, संघर्ष चालू आहे.  या जीवनाच्या संघर्षामधून, सर्व द्वंद्वांच्यामधून मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मज्ञानाची आवश्यकता आहे आणि ज्ञानप्राप्तीसाठी अंतःकरण योग्य व अधिकारी बनविले पाहिजे.  

यासाठी भगवंतांनी येथे क्षेत्रज्ञाचे ज्ञान प्रतिपादन करण्यापूर्वी दैवीगुणसंपत्तीचे वर्णन केलेले आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  या न्यायाने अंतःकरणाच्या शुद्धिशिवाय ज्ञानप्राप्ति होत नाही.  त्यासाठीच प्रत्येक साधकाने प्रथम दैवीगुणसंपत्ति आत्मसात करावी.  दैवी गुण म्हणजेच दिव्य गुण होय.  दिव्य म्हणजेच अत्यंत पवित्र, मंगलकारक होय. किंवा दिव्य म्हणजे अत्यंत कठिण.  म्हणून हे दिव्य गुण प्राप्त करणे हे अत्यंत कठिण आहे.  या मार्गाला “दिव्यत्वाचा मार्ग” (Divine Path) असे म्हणतात.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010


- हरी ॐ –