खरे
युद्ध, संघर्ष बाहेर नसून आपल्या आतच आहे. भगवंतांनी अर्जुनाला घरामध्ये, अरण्यामध्ये अथवा
हिमालयामध्ये उपदेश दिलेला नसून युद्धास सज्ज असणाऱ्या अर्जुनाला रणभूमीवर
आत्मज्ञानाचा, श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे. युद्धभूमीवर अर्जुन भगवंतांना दोन
सैन्यांच्यामध्ये रथ नेण्यास सांगतो. त्यावेळी
तो आपल्यासमोर युद्धासाठी आपल्याविरुद्ध उभे असणारे आदरणीय पितामह भीष्माचार्य,
पूजनीय कुलगुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, स्वतःचे बांधव, सगे-सोयरे या सर्वांना
पाहातो. त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक
भयंकर मोठा संघर्ष निर्माण होतो. त्याची बुद्धि भ्रष्ट होते. विचारशक्ति कुंठित होते.
त्यावेळी
अर्जुनाचा कर्तुं-अकर्तुं अहंकार भगवंतांना पूर्णपणे शरण जातो. तो भगवंतांना म्हणतो, “हे भगवन्, आज माझे मन पूर्णतः भ्रमिष्ट झालेले आहे. काय करावे आणि काय करू
नये, हे मला समजत नाही. मी अत्यंत
व्याकूळ, अगतिक झालो आहे. शरण आलेल्या
माझ्यावर आपण कृपा करा आणि जे मला श्रेयस्कर, हितकारक असेल ते सांगा.”
याचप्रमाणे
प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रणभूमि आहे. रणभूमीमध्ये १) कौरव – आसुरीगुणसंपत्ति आणि २)
पांडव – दैवीगुणसंपत्ति असे दोन पक्ष आहेत. कौरव संख्येने जास्त असून पांडव मात्र कमी आहेत.
म्हणजेच जास्त असणारे दुर्गुण आणि कमी
असणारे सद्गुण यांच्यामध्ये सतत द्वंद्व, संघर्ष चालू आहे. या जीवनाच्या संघर्षामधून, सर्व
द्वंद्वांच्यामधून मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मज्ञानाची आवश्यकता आहे आणि
ज्ञानप्राप्तीसाठी अंतःकरण योग्य व अधिकारी बनविले पाहिजे.
यासाठी
भगवंतांनी येथे क्षेत्रज्ञाचे ज्ञान प्रतिपादन करण्यापूर्वी दैवीगुणसंपत्तीचे
वर्णन केलेले आहे. साधनं विना साध्यं न
सिध्यति | या न्यायाने अंतःकरणाच्या
शुद्धिशिवाय ज्ञानप्राप्ति होत नाही. त्यासाठीच
प्रत्येक साधकाने प्रथम दैवीगुणसंपत्ति आत्मसात करावी. दैवी गुण म्हणजेच दिव्य गुण होय. दिव्य म्हणजेच अत्यंत पवित्र, मंगलकारक होय.
किंवा दिव्य म्हणजे अत्यंत कठिण. म्हणून
हे दिव्य गुण प्राप्त करणे हे अत्यंत कठिण आहे. या मार्गाला “दिव्यत्वाचा मार्ग” (Divine Path) असे म्हणतात.
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment