Tuesday, December 16, 2025

प्रसंगांना सामोरे जाण्याची विद्या | The Skill of Facing Situations

 



जीवनात प्रत्येक प्रसंग, नव्हे, प्रत्येक क्षण हा नवीन, वैशिष्ठ्यपूर्ण आहे.  त्यामुळे निराश उद्विग्न, पूर्वग्रहदूषित मानाने प्रसंगांना सामोरे जाण्यापेक्षा स्वच्छ, शुद्ध, प्रसन्न मानाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे.  या सर्व विश्वामध्ये आनंदच भरून उरला आहे.  फक्त तो अनुभवता आला पाहिजे.  इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हटले जाते - Enjoy the sorrows.  अशी आपली प्रसन्न वृत्ति ठेवावी.

 

यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच सर्व प्रसंगांचा आपण साकल्याने विचार करावा.  या सर्व प्रसंगांना कारण मी भूतकाळात केलेले कर्मच आहे.  मी पूर्वी केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे म्हणजेच आजचे जीवन आहे.  माझ्या प्रारब्धानुसारच मी जीवन जगत असतो.  प्रारब्धाचा कधीही त्याग करता येत नाही.  प्रारब्ध हे उपभोगुनच संपविले पाहिजे.  प्रारब्धानुसार जे घडणार नसेल ते कितीही प्रयत्न करूनही घडणार नाही आणि जे घडणार आहे - ते घडणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  यामुळे प्रसंगांना सामोरे जाणे, हाच पुरुषार्थ आहे.

 

तिसरी दृष्टि - जे जे आपल्या जीवनात घडते ते सर्व माझ्या हितासाठीच घडते.  या विश्वनियंत्याच्या योजनेप्रमाणे प्रत्येक घटना घडत असते.  एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी असतो.  आपण साधक असल्यामुळे सतत लक्षात ठेवावे की, परमेश्वरच आपल्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग निर्माण करतो.  आपण कर्तृत्वाने त्यामधून बाहेर येऊ शकत नाही.  त्याचवेळी आपण अत्यंत अगतिक, व्याकुळ होतो.  परमेश्वराचा धावा करतो.  आपला अहंकार परमेश्वराला शरण जातो.  अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येच श्रद्धा, निष्ठा, धैर्य, आत्मविश्वास, त्याग, प्रेम, भक्ती या दैवी गुणांचा उत्कर्ष होतो.  म्हणून साधकाने सर्व प्रसंगांना आनंदाने सामोरे जावे.

 

चौथी दृष्टि - साधकाच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग ही त्याची परीक्षाच आहे.  प्रतिकूल प्रसंगांच्यामध्येच सद्गुणांची, दैवी गुणांची परीक्षा होते.  सर्व सुरळीत (smooth) चालले आहे तोपर्यंत कोणीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, मोठमोठी संकटे येऊन मनावर आघात करतात, तेव्हा परमेश्वरावरील, गुरूंच्यावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  स्वतःच्या जीवनावरील विश्वास सुद्धा उडून जातो.  हीच खरी परीक्षा आहे.  ही परीक्षा हळुहळू अवघड होत जाते.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ