आपण आपल्या जीवनाचे निरीक्षण केले तर समजते
की, जन्मल्यापासून मृत्युपर्यंत आपण
अनेक विषय पाहातो, त्यांचा यथेच्छ उपभोग
घेतो. त्या उपभोगामधून सुख मिळविण्याचा
आपण प्रयत्न करतो. या विषयामधून मला सुख
मिळेल, अशी खुळी कल्पना करून तो विषय
उपभोगतो. एका विषयामागून दुसरा, तिसरा असे असंख्य अगणित, कोट्यवधी विषय उपभोगतो. विषयसंग्रह करतो. धन, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सत्ता, कीर्ति, मान-सन्मान सर्वकाही प्राप्त करतो. परंतु, खरोखरच या सर्वांच्यामधून आपण सुखी झालो आहोत का ?
विषयोपभोग घेत असताना निश्चितपणे सुखाचा भास
होतो. सुख मिळाल्यासारखे वाटते. पण छे ! दुसऱ्याच क्षणी आपल्या हातून ते सुख निसटून जाऊन
आपण पूर्ववत्, कदाचित्
पूर्वीपेक्षा अधिकच दुःखी (miserable) होतो. हीच जीवनाची शोकांतिका आहे.
विषयांच्या या बाजारामध्ये आपण जीवन जगतो, व्यवहार करतो, हसतो, खेळतो.
परंतु निरागस, निर्भेळ, शाश्वत आनंद मात्र प्राप्त होत नाही. विषयांच्यामधून खरोखरच जर आनंद मिळत असेल तर
जो या विश्वामध्ये सर्वाधिक श्रीमंत मनुष्य आहे, तो सर्वात 'सुखी' झाला असता. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. सुख हे विषयांच्यामध्ये नाही. त्याप्रमाणेच अन्य घटपटादि विषयांच्याप्रमाणे
'सुख' ही बाजारपेठेत पैसे देऊन विकत मिळणारी एखादी वस्तुही नाही. या विश्वात सर्वकाही पैशाने मिळते. परंतु लाखो, कोटयवधी रुपये मोजूनही कोठेही 'सुख' मात्र मिळत नाही.
मग प्रश्न निर्माण होईल की, अंतरिक, शाश्वत
सुख कोठे आहे ? समर्थ रामदास म्हणतात -
जगी सर्वसूखी असा कोण आहे । विचारी मना तूचि शोधूनि पाहे ।। (मनोबोध )
आपल्याला हवे असणारे अंतरिक सुख हे बाहेर
विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये नसून आपल्या
आतच अंतरंगामध्ये आहे. आज ज्याठिकाणी
मला नैराश्य, वैफल्य, दुःख, द्वन्द्व, संघर्ष अनुभवाला येतात त्याच अंतःकरणामध्ये आपण सुखाचा शोध
घेतला पाहिजे. तो आनंद, शाश्वत, चिरंतन सुख प्राप्त करणे, हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

